तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

यंत्रणांनी समन्वयाने काम करीत कोरोना संकटावर मात करावी


-  विभागीय आयुक्त पियुष सिंग

·  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

बुलडाणा, दि. ९

 जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी  शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी करण्यात आले आहे. या काळात यंत्रणांनी समन्वय साधत काम करावे. नागरिकांना जिवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी काम करावे, कुठेही वस्तूंचा पुरवठा कमी पडू देवू नये, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज दिले.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात नोडल अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांची  उपस्थिती होती.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय ते आरोग्य उपकेंद्र येथे कोणत्याही प्रकारचा ताप असलेले रुग्ण आले तर त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना देत विभागीय आयुक्त म्हणाले,  आरोग्य यंत्रणांनी याकाळात सतर्क राहून काम करावे. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक औषधी, मास्क, उपकरणे व साहित्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखान्यांच्या ओपीडी सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक व्हेंटीलेटर तयार ठेवावे. आणीबाणीच्या परिस्थितीत औषधांचा साठा खाजगी मेडीकल दुकानदारांकडेही तयार ठेवावे.
ते पुढे म्हणाले, संचारबंदी कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित सुरु राहील, याची काळजी घ्यावी.  तसेच कृषि निविष्ठांची वाहतूक सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनचा गैरफायदा घेवून चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होणार नाही, याची खात्री करावी. स्वस्त धान्य दुकानांमधून नियमित अन्नधान्य वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना ५ किलो मोफत तांदूळ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. सदर पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
   राशन कार्ड नसलेल्या दिव्यांग बांधवांना स्वयंसेवी संस्थामार्फत धान्य पुरविण्याचे सूचीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, ज्या दिव्यांग बांधवांकडे रेशन कार्ड आहे, त्यांना प्राधान्याने धान्य पुरवठा करावा. राशन न मिळण्यासंदर्भात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात. दिव्यांग सहाय्यता कक्ष व हेल्पलाईनवरील तक्रारींची नोंद ठेवण्यात यावी. औषध साठ्याबाबत केमीस्टांची नियमित बैठक घ्यावी. त्यांना मे अखेर पुरेल एवढा साठा आताच करण्यास सांगावे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्यास ती तात्काळ मागणीनुसार सुरू करावी. या कामांमध्ये मजूरांना सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या सुचना द्याव्यात. मनरेगाची कामे बंद ठेवू नये.  निवारा केंद्रामध्ये आवश्यक सुविधा पुरवाव्यात. येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांचे नियमित समुपदेशन करावे. तसेच त्यांच्या संपर्कासाठी पीसीओ अथवा त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये रिचार्ज मारून द्यावे. तसेच नियमित आरोग्य तपासणी करावी.
यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्याची कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे,  उपजिल्हाधिकारी ‍भिकाजी घुगे, श्री. माचेवाड,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीराम पानझाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. मेहेर आदी उपस्थित होते.


जमील पठाण
8805381333 /8804935111

No comments:

Post a Comment