तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आजपासून अनेक नियमांत बदल


भाजीपाला, फळे विक्रेते फिरती विक्री करणार; विनाकारण फिरणाऱ्यांना दंड होणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या देशात आणि राज्यात दरदिवस वाढते आहे. महामारीचा हा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करीत असून, मागील आलेल्या अनुभवांवरून गर्दी टाळण्यासाठी नवे नियम बनवले जात आहेत. जिल्हाधिकारी, बीड यांनी दिलेल्या संकेतानुसार आजपासून नव्या नियमांची अमलबजावणी केली जाणार आहे. फळे आणि भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता शेतकऱ्यांना थेट परवाने देण्यात आले असून, दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत गल्लोगल्ली फिरून विक्री करण्याचे आदेशा देण्यात आले आहेत. नविन बनविण्यात आलेल्या सर्व नियमांची माहीती परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक व तहसिलदार डॉ.विपीन पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
नागरीकांना घरपोच भाजीपाला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना गल्लोगल्ली फिरून विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परळी शहरात यासाठी एकूण २० प्रभाग करण्यात आले असून, दोन किंवा तीन अशा शेतकऱ्यांच्या गटाने विक्री केली जाणार आहे. यासाठी फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालया मार्फत परवाने देण्यास सुरूवात झाली आहे. तालुका कृषी कार्यालयाकडे परवाना मिळविण्यासाठी २५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर विक्री करीत असतांना गाड्यावर भाज्यांचा प्रशासनाने ठरवून दिलेला भावफलक लावणे बंधनकारक असून, तो न लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या भावफलकाप्रमाणेच त्याची विक्री करणे अनिवार्य आहे.
सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळले जावेत यासाठी किराणा आणि औषध गोळ्यांच्या दुकानदारांना सुचित केले आहे. त्यांनीही नागरीकांना आवश्यक असलेल्या गोष्टी घरपोच देण्याचे सांगण्यात आले आहे. या वस्तू नागरीकांना घरपोच देणाऱ्या मुलांना पासेसची व्यवस्था करण्यात येणार असून, घरपोच देण्यासाठी कोणतेही अतिरीक्त मुल्य न घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. घरपोच जीवनावश्यक साहीत्य देणाऱ्या सर्वांचे नंबर सोशल मीडियाद्वारे नागरीकांना दिले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. नागरीकांसाठी बनविण्यात आलेले नियम पाळले जावेत यासाठी विशेष उपाययोजना शहरात करण्यात येत असून, त्यामध्ये प्रत्येक ५०० मिटरवर पोलिस बंदोबस्त आणि शहरातील सर्व रस्ते बंद करून बॅरिकेटींग केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.  ग्रामिण भागातील नागरीकांची रेशनच्या धान्यासाठी गैरसोय होऊ नये व तेथे गर्दी होऊ नये यासाठी बँकांप्रमाणे टोकन पध्दतीचा अवलंब करण्यात येणार असून, प्रतिदिवस प्रति दुकानदार ५० टोकनचे धान्य वाटप करणार आहे. यापुढे घरगुती किंवा शेती उपयोगासाठी बोअरवेल घ्यायचा असेल तर त्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांची परवानी लागणार आहे. प्रशासनाने बनविलेले नियम नागरीकांनी पाळून संचारबंदीच्या काळात सहकार्य करावे अन्यथा कायद्यातील तरतूदीप्रमाणे कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a comment