तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

कृषी विभागाचा कापणी अहवाल ग्राह्य धरून , शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी करावा -पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख


लातूर (प्रतिनिधी) :-  
शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्याकडून हेक्टरी फक्त ६ किंटल ५० किलो हरभरा खरेदी केला जात आहे, प्रत्यक्षात कृषी अधिक्षकांच्या पीक कापणी अहवालानुसार लातूर जिल्ह्यातील सरासरी हेक्ट्री १० क्विंटल ६८ किलो हरभरा उत्पादन झाले आहे. त्यामुळे या अहवालानुसार शेतकऱ्याचे उत्पादन खरेदी केले जावे, अशी विनंती आपण सहकार व पणन  मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. 
यासंदर्भात पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की
 कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वतभूमीवर लातूर जिल्ह्यात हरभरा हमीभाव खरेदी केंद्र अगोदरच उशिराने सुरू झाली आहेत, त्यासाठीही प्रयत्न करावे लागले आहेत. या खरेदी केंद्रावर आता प्रति हेक्टर ६ क्विंटल ५० किलो हरभरा खरेदी करण्याची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे  लातूर जिल्ह्यात यावर्षी प्रारंभी पुरेसा पाऊस न पडल्याने याभागात खरिपाची पेरणी झाली नव्हती. रब्बी हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. शेतकऱ्यांनी वर्षभरात एकच पीक घेतल्याने हे पीक जोमात आले आणि शेतकऱ्यांना चांगला उताराही मिळाला आहे. पेरणीनंतर लगेच डिसेंबर महिन्यात कृषी विभागाने नजर आणेवारीचा अहवाल जाहीर केला होता  त्यात हेक्टरी ६ क्विंटल ५० किलो हरभरा उत्पादन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु वर्षभरात एकच पीक घेतल्याने अंदाजित उत्पादनापेक्षा हा उतारा दुपटीपेक्षा अधिक मिळाला आहे, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लातूर कृषी विभागाने प्रत्यक्ष हरभरा पीक कापणीचा प्रयोग  करून उत्पादनाचा आढावा घेतला आहे. या अहवालानुसार औसा तालुक्यात हेक्टरी सर्वाधिक १५ क्विंटल ७५ किलो उतारा मिळाला आहे, रेणापूर तालुक्यात १३ क्विंटल ९१ किलो, लातूर तालुक्यात १३ क्विंटल ७१ किलो, शिरूर आनंतपाळ तालुक्यात १२ क्विंटल ६२ किलो उत्पादनाचा अंदाज निघाला आहे. जळकोट आणि इतर तालुक्यात हे उत्पादन थोडे कमी आहे . एकंदरीत जिल्ह्यातील हरभरा उत्पादनाचा सरासरी उतारा हेक्टनरी १० क्विंटल ६८ किलो एवढा असल्याचे कृषी विभागाच्या कापणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
या परिस्थितीत हमीभाव केंद्रांवर नजर अंदाजित उत्पादनाच्या आधारे हेक्टरी ६ क्विंटल ५० किलो हरभरा खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादन जास्तीचे झाले असताना हमीभाव केंद्रावर कमी हरभरा खरेदी केला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांनी सदरील तक्रार खरी आहे त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाचा प्रत्यक्ष अहवाल लक्षात घेऊन सहकार व पणन विभागाने शेतकर्यांकडून प्रति हेक्टरी १० क्विंटल ६८ किलो प्रमाणे हरभरा खरेदी करावा, अशी मागणी आम्ही केली असून त्याच भागाकडून लवकर तसा निर्णय होईल असा विश्वास आहे असे वैद्यकीय शिक्षण , सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment