तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

डॉ. दिलिपराव शिंदे.. अर्थातच बापू : एक अजब रसायन..


सुभाष मुळे..
----------------
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी, पंचायत समितीचे माजी उपसभापती, गेवराई येथील 'बजरंग' या नावाने असलेला ग्रुपचे मार्गदर्शक दिलिप विष्णूपंत शिंदे (बाप्पू) हे आकस्मात आपल्यातून निघून गेले. पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं छप्पर एकाच वेळी कुणीतरी काढून घ्यावं अशी अवस्था कुटुंबियांसह मित्र परिवाराची झालीये. प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जा.. मी तुमच्यामागे भक्कमपणे पाठीशी उभा आहे असा सर्वांना कायम आधार देणाऱ्या 'बाप्पूं' यांना नियती सर्वांपासून खूप दूर घेऊन गेली.

बाप्पू म्हणजे एक अजब रसायन ! 
-----------------------------------------
समोरच्या व्यक्तीशी अगदी सहजतेणे संवाद निर्माण करून त्याच्या काळजाला हात घालून आपलसं करून घेणारा अवलिया ! अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून भरभरून आनंद घेणारे आणि सतत हसतमुख असणारे दिलखुलास व्यक्तीमत्व ! मित्रांसाठी जीव की प्राण ! राजकीय- सामाजिक जीवनात तितकेच प्रामाणिक आणि एकनिष्ठ !
आजवर बाप्पूंनी आयुष्यातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांचा समतोल साधून आयुष्यातील प्रत्येक भुमिका चोख बजावली. मग ते मित्र, मुलगा, भाऊ, पती, जावई, वडील, काका, मामा, सासरे आणि आजोबा ... कुठेही कमी पडले नाहीत उलट प्रत्येकाच्या कठीण प्रसंगात सर्वांना बापाचा आधार देऊन हिंमतीने जगायला शिकविणारे म्हणजे 'बाप्पू' होत ! 
        "समाजातील कितीतरी मोठी माणसं पदवीपेक्षाही मोठी होतात आणि त्यांच्या नावाला पदवीचं ऐश्वर्य प्राप्त होतं." आज डाॕ. दिलीप शिंदे (बाप्पू) हे नाव राहिलं नसून ती आप्तेष्टांसाठी पदवी झालीये असेच म्हणावे लागेल, समाजाचे आपण काही तरी देणे लागतो असे समजून समाजातील दिनदुबळ्यांना, गरजवतांना आणि कठीण प्रसंगाला सामोरे जाणाऱ्यांसाठी बाप्पू स्वतःला पूर्णपणे समर्पित करून शक्यतो साह्य करीत होते. एवढे करूनही कुठलाही 'मीपणा' चा भाव नव्हता. अगदी निस्वार्थीपणे समाजाला भरभरून प्रेम देणारे बप्पू म्हणजे माणसातला देवमाणूसच ! ग्रह- तारे, नशिब, दैव ह्या गोष्टींवर बाप्पू कधीही विसंबून राहिलेले नाहीत, की त्यासाठी थांबलेही नाहीत. आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेला आणि अनेक कठीण प्रसंगांना बाप्पूंनी आपल्या स्वभावातील संयमाने, कणखरतेणे, स्वतः मध्ये असलेल्या हिंमतीने आणि संपूर्ण ताकदीने तोंड देऊन मार्ग काढले. स्वतःच्या दांडग्या इच्छा शक्तीच्या जोरावर आयुष्याला भिडणारे 'बाप्पू' यांच्याकडे पाहिल्यावर म्हणावसं वाटतं.. की, 

"नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची..
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..!"

       आज माणसाची उपयुक्तता पाहून प्रेम करण्याचा काळ आलाय. अशा काळात निखळ आणि निरपेक्ष प्रेम करणारा बाप्पूंसारखा वडीलधारा मायाळू माणूस जाणे ही माझ्यासाठी मोठी वैयक्तिक हानी आहे. कधी कधी आपल्या ध्यानी आणि मनी नसताना आयुष्यात काही कठीण प्रसंग अशा पध्दतीने आपल्यावर ओढावतात की अचानक परिस्थितीत काय करावं काहीच कळत नाही. परंतु हीच वेळ खरी कसोटीची असते. आपल्या आजवरच्या आयुष्यातील प्रत्येक वेळ परीक्षेची असते. आज बाप्पू आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आजवर शून्यातून इथवर येण्यासाठी केलेला संघर्ष, प्रत्येकाला दिलेले संस्कार, सगळ्यांच्या सुखासाठी त्यांनी केलेली धडपड, अडचणीत असणाऱ्यांना मदत करण्याची त्यांची तळमळ, सर्वांना भरभरून प्रेम देण्याचा त्यांचा स्वभाव.. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रचंड ऊर्जा देणाऱ्या आहेत. ही ऊर्जा बरोबर घेऊन बाप्पूंनी दाखवलेल्या मार्गाने जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.  कर्मयोगी माणसं शरीराने जातात, पण पुढच्या पिढीला कर्मयोगाचा आणि निरपेक्षतेचा वारसा देऊन जातात. बाप्पू अगदी असेच जगले अथांग सागराप्रमाणे आणि नकळत आपल्यातून निघून गेले. आम्ही सर्व सदैव त्यांच्या ऋणात राहू ! __भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रासंगिक ----------------
- राहुल अनिल साळुंके_ अहमदनगर
╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment