तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

संचारबंदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासोबतच शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवण्याचा प्रयत्न राहील - ना. धनंजय मुंडे

कोरोना वरील उपाययोजनांबाबत पालकमंत्र्यांनी घेतली प्रमुख अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची आढावा बैठक


बीड (प्रतिनिधी) :-  कोरोना  विषाणूच्या संसर्गाचे  संकट जगापुढे उभे असून यामुळे संचारबंदी व जमावबंदी या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता होण्याबरोबरच जिल्ह्यातील शेतातील शेतीमाल देखील जनतेपर्यंत पोहोचवता येईल व  शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवता येईल याचा विचार करून निर्णय घेतले जातील असे प्रतिपादन पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

कोविड - 19 जिल्हास्तरीय आढावा बैठक पालकमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या प्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस आमदार प्रकाश सोळंके , सुरेश धस , बाळासाहेब आजबे, संजय दौंड , माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार , पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी  कोरोना संसर्गाच्या  अनुषंगाने  जिल्ह्यात अंमलबजावणी केलेल्या  प्रभावी  उपाययोजनांचे  यावेळी कौतुक केले . प्रशासनाचे अभिनंदन करताना मंत्री श्री.मुंडे म्हणाले, शासकीय यंत्रणेतील जिल्हाधिकार्‍यांपासून ते गावपातळीवरील आशा वर्कर पर्यंत, पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी या संकटाच्या काळात उत्कृष्ट पणे काम केले आहे. आता येथून पुढे देखील आपणास कटाक्षाने वागावे लागेल यासाठी मी स्वतः जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही ; पुढे सुद्धा असेच राहण्यासाठी सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी जनतेने शासन - प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मंत्रीमहोदयांनी केले.
   
याप्रसंगी विविध आमदार महोदयांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी सादर केलेली माहिती व अडचणींच्या अनुषंगाने देखील पालक मंत्री श्री. मुंडे यांनी मार्गदर्शन केले व निर्णय घेतले.

शेतकऱ्याला शेतीमाल विकण्यासाठी आवश्यक त्या सहकार्याचे प्रशासनाचे धोरण राहील. यासाठी ट्रॅक्टर हार्वेस्टर व वाहनांना इंधन दिले जाईल. यामध्ये शेतकऱ्याची अडवणूक होत असेल तर कारवाई केली जाईल असे श्री मुंडे म्हणाले.

नागरिकांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आदी योजनांची रक्कम  नागरिकांपर्यंत  पोहोचण्यासाठी संबंधित बँकांच्या  ग्राहक सेवा केंद्र मार्फत देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून गोर गरिबांचे पैसे वाचतील व रस्त्यावर, बँकांमध्ये गर्दी टाळता येईल. तसेच  महावितरणच्या मार्फत या काळात शेतीचे वीज ट्रांसफार्मर दुरुस्ती व बदल वेळेत होण्यासाठी काळजी घ्यावी याबाबतही सक्तीच्या सूचना दिल्या. कोरोनावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करताना त्यांच्यासाठी आवश्यक व्हेंटिलेटर , डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट आधीची खरेदी चे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

ऊसतोड मजुरांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील

 बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाबाबत या बैठकीत चर्चा झाली. जवळपास 86 हजारापेक्षा जास्त ऊसतोड मजूर विविध जिल्ह्यात कारखान्यांच्या ठिकाणी असून काहीजण परतीच्या  मार्गाला लागले, परंतु लॉकडाऊन मुळे जिल्ह्यापर्यंत आले नाहीत. त्यांची ते जिथे आहेत तेथे व्यवस्था करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून मोठया प्रमाणावर या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे, असे पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले.

एप्रिल महिन्याचे धान्य १३ तारखेच्या आत प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात पोहचेल - जिल्हाधिकारी रेखावार

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत धान्य वितरण , जीवनावश्यक वस्तू ,बँक ग्राहक सेवा केंद्रांच्या सुविधा यासाठी केलेली कार्यवाहीची माहिती दिली. श्री रेखावार म्हणाले , रेशन दुकानदारांना मार्फत प्रत्येक लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय खालील व्यक्तींना धान्य पोहोचवण्यासाठी सक्षमतेने उपाययोजना केल्या जात आहेत.

दिनांक 13 एप्रिल पर्यंत  या महिन्याचे संपूर्ण नियतन  स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचेल त्याच्या वितरण साठी पाॅस मशीनचा उपयोग करतानाच संबंधित लाभार्थीना पावती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जनतेच्या होणाऱ्या धान्याच्या चोरीला अटकाव होईल व पावती न मिळाल्यास आपले धान्य चोरीला जात आहे हेदेखील संबंधितास कळेल; यासाठी शिधापत्रिकेवरील व्यक्तींची माहिती व नावे देखील 15 एप्रिल पर्यंत अद्ययावत करून रेशन दुकानदारा मार्फतच दुरुस्त केली जात आहेत. तसेच उज्वला गॅस सिलेंडर धारकांना सिलेंडरची रक्कम खात्यावर जमा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यासह शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी हातगाडी मार्फत गाव शहरात फिरून विक्री करण्यास प्रशासनाची कोणतीही बंधन नाहीत; फक्त संसर्गाबाबत उपाययोजनांची त्यांनी काळजी घेण्याची गरज राहील असे जिल्हाधिकारी म्हणाले.

     सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवू - पोलीस अधीक्षक पोद्दार

पोलीस अधीक्षक श्री पोद्दार यांनी सांगितले प्रतिबंधात्मक संचार बंदीच्या काळात देखील गंभीर् स्थितीतील रुग्ण व क्रिटिकल वैद्यकीय उपचारांसाठी थेट परवानगी पोलीस प्रशासन तातडीने उपलब्ध करून देत आहे. अत्यावश्यक सेवांसाठी परवानगी व ऑनलाइन पासेस मागण्याची संख्या मोठी असल्याने यंत्रणेस मर्यादा येत असल्या तरीही त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येत आहेत असे श्री पोतदार यांनी सांगितले. त्याचबरोबर पालकमंत्री ना. मुंडे यांच्या सूचनेनुसार सामाजिक तेढ निर्माण करायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कायद्याचा बडगा दाखवू असेही श्री. पोद्दार म्हणाले.

 याप्रसंगी आमदार श्री सोळंके, श्री धस, श्री दौंड, श्री आजबे, श्री विनायक मेटे यांचे प्रतिनिधी काकडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना येत असलेल्या समस्या व अडचणी मांडल्या. आष्टी पाटोदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा, बँकांतील लाॅकडाऊन मुळे आर्थिक व्यवहारांतील अडचणी आदी महत्त्वाच्या प्रश्न मांडले.

दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाने कुठेही गर्दी होऊ नये अन्यथा इतक्या दिवस कोरोनाला जिल्ह्यापासून दूर ठेवत दिलेल्या लढ्याला बळ मिळणार नाही, यासाठी ठिकठिकाणी खरेदीसाठी संचारबंदी शिथिल करण्याच्या वेळेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही ना.मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बैठकीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील ,अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय कबाडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार आदींनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment