तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

'त्या' भूकबळी ठरलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांच्या मदतीला धनंजय मुंडे धावले
लॉकडाऊनमुळे पुण्याहून बीडला पायी येताना दिव्यांग तरुणाचा झाला होता मृत्यू

दोन्ही मुलांचे बारावीपर्यंत शिक्षण मोफत; तसेच यशवंत घरकुल योजनेतून मिळणार घरकुल

बीड (प्रतिनिधी) :-  (दि.१२) लॉकडाऊनच्या काळात पुण्याहून बीडला पायी येताना विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या बीड तालुक्यातील काळेगाव तांडा येथील रामेश्वर पवार (वय ३१) या तरुणाच्या कुटुंबियांच्या मदतीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी धाव घेतली आहे.

समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना पवार कुटुंबियांच्या भेटीला पाठवून त्यांना एक महिना पुरेल इतके रेशन देण्यात आले. तसेच रामेश्वर यांच्या एक मुलगा व एक मुलगी अशा दोन्हीही अपत्याचा १२वी पर्यन्तचा शैक्षणिक खर्चही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येणार आहे, तसेच पवार कुटुंबियांना यशवंत घरकुल योजनेअंतर्गत घरकुल घरकुल मंजूर करून देण्यात येईल आणि जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येईल असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी यांनी सांगितले.

राज्यभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी मुळे एका पायाने अधू असताना काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणाऱ्या रामेश्वर ला गावी जाण्याखेरीज पर्याय नव्हता. पुण्याहून पायी चालत बीड तालुक्यातील आपल्या गावी निघालेल्या रामेश्वर पवार या दिव्यांग तरुणाचा पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरला असता बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त करताना ना. मुंडे यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना पवार यांच्या कुटुंबाला आधार व दिलासा देण्यासाठी सूचित केले होते. 

ना. मुंडे यांच्या सूचनेनुसार समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत रामेश्वर पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला एक महिन्याचे रेशन दिले, तसेच दोन्ही मुलांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत होणार असून, यशवंत घरकुल योजनेतून घरासाठी निधी तसेच जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण योजनेतूनही अर्थसहाय्य योजनेचा लाभ या कुटुंबाला मिळवून देण्यात येईल अशी माहिती बीड जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली. यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रमोद सानप, बाळकृष्ण थापडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment