तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

सुरक्षित अंतरच कोरोना आजारापासून आपल्याला दुर ठेवेल-संजय केंद्रे


ग्रामपंचायतच्या उपाययोजनाला आपले सहकार्य अपेक्षित-सरपंच सौ.कोकाटे
संगम येथे मास्क सह अन्नधान्य वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना विषाणूचे संक्रमण हा जागतिक आजार असून या आजारापासून दुर राहण्यासाठी एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवणे हाच महत्वाचा उपाय ठरणार आहे. शासन आपल्याला या आजारापासून दुर ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असून प्रशासनाच्या नियमांना प्राधान्य द्या असे आवाहन परळी पं.स.चे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले.
संंगम ता.परळी येथे उमेद अभियान अंतर्गत भरारी महिला ग्रामसंघ संगम यांच्या वतिने व्हीआरएफ निधीमधून विधवा, एकल, गरीब महिलांना एक ग्रामसंघ अध्यक्ष, सीआरपी, कृषि सखी, सर्व केडर व गटातील महिला यांच्या वतिने सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे व गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या उपस्थितीत मास्क वाटप तसेच विधवा व एकल गरीब महिलांना एक महिन्यांचे अन्नधान्य वाटप करण्यात आले. उपसरपंच हनुमंत कामाळे, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक सचिव हरनावळ, तालुका व्यवस्थापक मुंडे, सुरज सोनवणे, वीर गट ग्रामसंघाचे अध्यक्ष, सीआरएफ, कृषी सखी, सर्व केडर व गटातील महिला  तसेच ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे उपस्थित होते. सॅनिटायझरचा वापर, मास्कची आवश्यकता, सुरक्षित अंतर याबाबत गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या गावात कोरोना बाधित असलेल्या रेड झोनमधील गावातून कोणी येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच असा कोणी प्रवासी येत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला दिली जावी असेही आवाहन केंद्रे यांनी केले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर आम्ही आवश्यक असलेल्या उपाययोजना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चितच करीत आहोत परंतू नागरिक म्हणून आपलेही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे असे मत सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी व्यक्त केले. गावकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांसोबत संवाद करावा, घराबाहेर असताना मास्कचा वापर आवर्जुन करावा तसेच आपल्या गावाची काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a comment