तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

या संकट काळात धान्याचे नियतन नियमाप्रमाणे करा; कोणताही गैरव्यवहार खपवून घेणार नाही - धनंजय मुंडे यांचा सज्जड इशाराआतापर्यंत जिल्ह्यातील १७ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित

गेवराईच्या 'त्या' दुकानदारावर गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी) :-  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत सुरू असलेल्या धान्य वाटपाचा सविस्तर आढावा घेतला. या संकटकाळात स्वस्त धान्य दुकानदारांनी गोरगरिबांसाठी आलेले धान्य नियमांप्रमाणे वाटप करावे; कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा दिला आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वाटपावर त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नियंत्रण ठेवावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना केल्या होत्या. त्यानंतर आज ना.मुंडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या धान्य वाटपाचा सविस्तर आढावा घेतला. 

एप्रिल महिन्यात मंजूर असलेले धान्य जवळपास पूर्ण वाटप झाले असून वाटपाबाबत विविध तक्रारी आलेल्या १७ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच तक्रारदार ग्राहकाला मारहाण करणाऱ्या गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी दिली.

बीड जिल्हा पुरवठा विभागाकडे पुरेसा धान्य साठा असुन आगामी काळात लागणाऱ्या धान्य पुरवठ्याबद्दल आपण अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा केली असून, जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या ऊसतोड कमगारांनाही धान्य नियतन वाटप करण्यात अडचण येणार नाही. तसेच मे व जून महिन्याचे धान्यही वेळेवर वाटप करण्यात येईल असे ना. मुंडे यावेळी म्हणाले.

निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये बीड तालुक्यातील सर्वाधिक - ५, माजलगाव - ३, गेवराई - ४, केज - २, अंबेजोगाई -२ आणि शिरूर कासार - १ असे एकूण १७ दुकाने समाविष्ट आहेत. मंजूर नियतनापेक्षा धान्य कमी देणे, पावती न देता धान्य कमी देणे अशा विविध तक्रारी या दुकानांविरुद्ध पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. पालकमंत्री ना मुंडे यांच्या सूचनेनुसार या तक्रारींची शहानिशा करून त्यांचे परवाने पुरवठा विभागाने निलंबित केले आहेत. 

गेवराई येथील त्या दुकानदारावर गुन्हा दाखल

दरम्यान मौजे नांदगाव ता. गेवराई येथील स्वस्त धान्य दुकानदार बळीराम राऊत यांनी पात्र कार्डधारकांना धान्य खरेदीसाठी गेले असता हुज्जत घालत मारहाण करण्याचा प्रकार एका व्हिडिओद्वारे उघडकीस आला होता. या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना पुरवठा विभागाने निलंबित केला असून गेवराई तहसीलदार यांच्या आदेशावरून दुकानदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या संकट काळात जे स्वस्त धान्य दुकानदार विहित नियानुसार तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य वाटप करत आहेत त्यांचे नक्कीच कौतुक परंतु धान्य वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या किंवा विनाकारण नागरिकांना वेठीस धरणाऱ्या दुकांदारांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

No comments:

Post a Comment