तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

डावखुरे सुनिल जोशी उजवी कामगिरी करतील ?


         भारतीय क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या पाच सदस्यांपैकी दोन सदस्य विभागाचे गगन खोडा, दक्षिणेचे एमएसके प्रसाद यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्या जागेवर दोन नवीन सदस्यांची निवड मुंबईत क्रिकेट सल्लागार समितीने केली. माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल, माजी जलदगती गोलंदाज रूद्रपताप सिंग व पूर्व महिला कसोटीपटू सुलक्षणा नाईक यांचा या समितीत समावेश होता.
               एम एस के प्रसाद हे मागील निवड समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या जागेवर दक्षिण विभागातून डावखुरे अष्टपैलू खेळाडू सुनिल जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली तर गगन खोडा यांच्या जागेवर मुळचे पंजाबचे असलेले परंतु मध्य विभाग कर्मभूमी बनलेले हरविंदर सिंग हे निवड समितीत आले. तर पश्चिम विभागाचे जतिन परांजपे, उत्तरेचे शरणदिपसिंग व पूर्वेचे देवांग गांधी आणखी ६ महिने आपला नियोजित कार्यकाळ पुर्ण करतील. नव्या अध्यक्षांचा थोडक्यात परिचय या लेखात आपण करून घेऊ या.
               ६ जून १९७० रोजी कर्नाटकातील गडग येथे सुनिल जोशी यांचा जन्म झाला. डाव्या हाताने फलंदाजी व डावखुरी ऑर्थोडॉक्स फलंदाजी करणारे जोशी सुरुवातीच्या दोन आयपीएल सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळले आहेत.
               आपल्या १५ कसोटींच्या कारकिर्दीत ४२.२१ च्या सरासरीने एका अर्धशतकासह ३५२ धावांचे योगदान त्यांनी भारतीय संघासाठी दिले. कसोटीत ९२ धावांची एक शानदार खेळी त्यांनी साकारली होती. तर ६९ एक दिवशीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना एका अर्धशतकासह ५८४ धावा जमा केल्या. यामध्ये ६१ धावा सर्वोच्य होत्या. गोलंदाजीत कसोटीत ३४५१ चेंडू टाकून १४७० धावा देऊन ६९ बळी त्यांनी घेतले. डावात पाच बळी एकदा घेतले. १४२ धावात ५ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. तर वनडेत ३३८६ चेंडू टाकून २५०९ धावा देत ६९ फलंदाज बाद केले. सहा धावात ५ बळी हि वनडेतील सर्वोत्त कामगिरी होती.
                 सुनिल जोशी यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण दक्षिण आफ्रिकेविरूध्द सन १९९९ रोजी आला. त्या वनडे सामन्यात त्यांनी दहा षटकांच्या आपल्या हप्त्यात सहा षटके निर्धाव टाकत अवघ्या सहा धावा खर्चून बोएटा डिप्पेनार, हर्षल गिब्ज, हॅन्सी क्रोनिए, जाँटी रोडस, व शॉन पोलॉक यांना तंबूचा रस्ता दाखवत द. आफ्रिकेला केवळ ११७ धावात गुंडाळले. भारताने हा सामना ८ गड्यांनी जिंकला. साहजिकच सामनावीर किताब जोशींनाच मिळाला.
                 क्रिकेटमधून सन २०१२ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी विविध स्तरावरील खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणजे सन २०१६ च्या टि-२० विश्वचषकापूर्वी ओमान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. सन २०१७ मध्ये फिरकी गोलंदाजीचा सल्लागार म्हणून बांगलादेश संघाबरोबर जोडले गेले. त्यानंतर सन २०१९ मध्ये त्यांची अमेरिकेच्या ( युएसए ) राष्ट्रीय संघाच्या फिरकी गोलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाली होती.
                  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६० सामन्यात ५००० धावा, ६१५ बळी अशी भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांना भारताच्या संघातही स्थान मिळाले. एक वेळ तर जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे, सुनिल जोशी हे कर्नाटकचे चार प्रमुख गोलंदाज एकाच वेळी भारतीय संघात होते.
                 त्यांच्या क्रिकेट शिकण्याच्या कालखंडात त्यांच्या गडग या खेडेगावात प्रशिक्षणाची सोय नव्हती परंतु क्रिकेटपटू बनण्याच्या महत्वकांक्षेपोटी दररोज ६० किलोमिटरचा प्रवास करून ते हुबळीला जायचे व सराव आटोपून परत आपल्या गडग या गावी येऊन शाळेत जायचे. या कठोर परिश्रमाचे मोठे फळ जोशी यांना मिळाले.  
              त्यांची भारताच्या मुख्य संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी निवड झाली हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असला तरी ते त्यांच्या आजवरच्या कष्टाचे चीज झाल्याचे द्योतक आहे. त्यांच्या या नव्या डावाला आपणा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment