तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

सामनावीर ठरूनही शेवटचा सामना ठरलेले क्रिकेटपटू


                              सर्व खेळात क्रिकेट हा अतिशय अनिश्चिततेचा खेळ गणला जातो. या खेळात कोणतीही गोष्ट ग्राह्य धरून चालत नाही. ते वाक्य फक्त निकालाशी निगडीत धरू नका. कारण सर्वात प्रथम खेळाडूचे संघातील स्थान निश्चित राहील का याचीच निश्चितता नसते. त्यातच जर तो भारताचा संघ असेल तर विचारूच नका. येथे संघातील प्रत्येक जागेसाठी भयानक प्रतिस्पर्धा आहे. जर संबधीत खेळाडूला संघात जागा मिळालीच तर ती टिकविण्यासाठी त्या खेळाडूला निरंतर सुंदर प्रदर्शन करावे लागते. अनेक खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक स्तरावरील क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. परंतु मुख्य राष्ट्रीय संघात संधी मिळाल्यावर त्याचे सोने करण्याची अवघड जबाबदारी संबंधीत खेळाडूवर असते. आपल्याला माहीती आहेच की, काही असे खेळाडू आहेत की ज्यांनी संघासाठी बहुमुल्य योगदान दिले तरी संघात आपले आसन पक्के करू शकले नाहीत. भारतीय क्रिकेट मध्ये असे तीन खेळाडू आहेत की, ज्यांनी प्रत्येक वेळी संघासाठी चांगले कार्य केले इतकेच नाही तर त्यांनी खेळलेल्या शेवटच्या सामन्यात सामनावीरही ठरले. परंतु पुढच्या सामन्यात त्यांना संघात स्थान मिळाले नाही. इतकेच नाही तर सामनावीर पुरस्कार मिळालेला तो सामना त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. चला तर जाणून घेऊ या त्या कमनशिबी खेळांडूबद्दल.
                             अमित मिश्रा या दुर्देवी खेळाडूंच्या श्रृंखलेतील पहिला खेळाडू. अतिशय प्रतिभावान लेगस्पिनर असलेला हा खेळाडू अगोदर अनिल कुंबळे, हरभजन सिंग, मध्यंतरी रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा व शेवटी कुलदिप यादव व यजुवेंद्र चहल यांच्याशी प्रतिस्पर्धां करत पुरा थकून गेला. अजूनही तो आयपीएल, प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये उत्कृष्ठ कर्तबगारी बजावत आहे. उजव्या हाताने अतिशय हुकमी लेगस्पिन मारा करणाऱ्या अमित मिश्राने सन २००३ मध्ये दक्षिण आफ्रिके विरूध्द एकदिवसीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ७ वर्षांनी म्हणजे सन २०१० मध्ये त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली, आणि त्यानंतर आणखी तीन वर्षांनी म्हणजे सन २०१३ मध्ये टि- २० त खेळण्यासाठी निवडला गेला. त्याने २२ कसोटीत ७६, छत्तीस वनडेत ६४, तर दहा टि-२० मध्ये १६ बळी चटकावले.
                           सन २०१६ च्या वनडे मालिकेत अमितने अतिशय प्रभावी गोलंदाजी केली. न्यूझिलंडला मालिकेत ३- २ असे हरविण्यास त्याने घेतलेले १५ बळी महत्वाचे ठरले. त्याच्या या कामगिरीची पावती म्हणजे त्याला मालिकावीर ( मॅन ऑफ दि सीरीज ) हा पुरस्कारही मिळाला.एवढेच नाही तर शेवटच्या वनडे सामन्यात १८ धावात पाच बळी घेऊन भारताच्या विजयात चांगलाच चमकला. त्या सामन्याचा मॅन ऑफ दि मॅच पुरस्कारही त्यानेच पटकावला. त्यानंतर घडलेली आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमित मिश्रा भारतीय संघात कधीच निवडला गेला नाही.
                           या कडीतला दुसरा मोहरा आहे प्रग्यान ओझा. ओझा उत्कृष्ठ फिरकी गोलंदाज होता. आपल्या प्रभावी गोलंदाजीने त्याने संघासाठी मोलाचे योगदान देताना २४ कसोटयात ११३ बळी, १८ वनडेत २१ बळी, तर ६ टि- २० मध्ये १० बळी घेतले. तर  १०८ प्रथम श्रेणी सामन्यात ४२४ बळी त्याच्या नावावर आहेत. २४ पैकी २० कसोटया तो भारतीय खेळपट्टयांवर खेळला. त्यात त्याने १०१ बळी मिळविले.
                               डावखुरा ऑर्थो डॉक्स स्पीनर असलेला ओझा ६ फूट उंचीचा होता. २४ नोव्हेंबर २००९ ला श्रीलंकेविरूध्द पदार्पणाची कसोटी खेळला. २८ जून २००८ ला बांगलादेशविरूध्द कसोटी पदार्पण केलं. तर ६ जून २००९ ला बांगलादेशविरूध्दच पहिला टि २० खेळला.
                            सन २०१३ सालची गोष्ट वेस्ट इंडिज विरूध्दच्या कसोटीत त्याने दहा बळी घेतले. भारत सामना जिंकला, तो सामनावीर ठरला, तरीही त्यानंतर प्रग्यान ओझा कधीच भारतीय संघात दिसला नाही. त्यानंतर ७ वर्ष त्याने प्रतिक्षा केली. तरीही निवड समितीला दया आली नाही. अखेर फेबुवारी २०२० मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमधून निवृत्ती पत्करली.
                             या दुर्देवी खेळाडूंच्या मालिकेतला तिसरा दुर्भाग्यशाली क्रिकेटपटू आहे इरफान पठाण. डावखुरा वेगवान गोलंदाज, विश्वसनीय फलंदाज व एकंदर अष्टपैलूत्वाचं पिंड असलेला खेळाडू अकालीच संघाबाहेर फेकला गेला. त्याने खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात सन २०१२ श्रीलंकेविरुद्ध २९ धावात पाच गडी बाद केले. त्यामुळे भारत सामना जिंकल, तो सामनावीरही ठरला खरा, परंतु त्यानंतर इरफान संघातून हरवला तो कायमचा. अखेर वैतागून त्याने जानेवारी २०२० मध्ये क्रिकेटला एक खेळाडू म्हणून रामराम ठोकला.
                          इरफान त्याच्या सन २००३ ते ०८ दरम्यानच्या कारकिर्दीत २९ कसोटी खेळला. त्यात ३१.६ च्या सरासरीने ११०५ धावा जमविल्या. सन २००४ ते १२ या वनडे कालखंडात १२० सामने खेळला. त्यात २३.४ च्या सरासरीने १५४४ धावा काढल्या. तर २४ टि- २० सामन्यात २४.६च्या सरासरीने १७२ धावा काढल्या. सन २००८-१७ या कालावधीत तो १०३ आयपीएल सामने खेळला त्यामध्ये २१.५च्या सरासरीने ११३९ धावा जमविल्या.
                     या डावखुऱ्या खेळाडूने मुळतः जलदगती गोलंदाज असतानाही एक फलंदाज म्हणून चांगलीच छाप पाडली आहे.कसोटीत ९३ ही सर्वोच्य धावसंख्या नोंदविताना ६ अर्धशतकेही फटकविले आहेत तर गोलंदाजीत ७  वेळा डावात पेक्षा अधिक बळी घेतले असून सामन्यात २ वेळा १० किंवा अधिक बळी घेतले आहेत.५९ धावात ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावे १०० बळी आहेत. त्याचबरोबर ८ झेलही त्याने पकडले. तसेच एकदिवसी सामन्यात ५ अर्धशतके नोंदविताना ८३ धावांची सर्वोच्य खेळी साकारली. तर गोलंदाजीत १७३ बळी घेताना १२ झेल घेतले व २७ धावात ५ बळीही सर्वोत्कृष्ठ कामगिरीही बजावली. तर २४ टि २० सामन्यात २८ बळी त्याच्या नावे जमा आहेत.    
                                      गुणवान खेळाडू डावलायची परंपरा अशीच राहीली. तर ते खास करून भारतीय क्रिकेटचा आरोग्यास अपायकारक ठरू शकते.
             
लेखक : - 
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment