तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

स्वतःच्या वनडे कारकिर्दीत शुन्यावर बाद न झालेले खेळाडू


               
                    सध्या जगभर कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जगभरातील सर्व क्रिडा उपक्रम बंद आहेत, परंतु आम्ही आपल्या करमणुकीसाठी क्रिकेटच्या नानाविध विक्रमांची, घटनांची रेलचेल घेऊन येत आहोत. त्या श्रृंखलेचाच एक भाग असलेला एकदम चटपटीत विक्रम प्रस्तुत लेखात सादर करत आहोत. क्रिकेट हा खेळ विक्रमांचा खजिनाच आहे. या खजिन्यात हात घातल्यावर रोज नवनवीन विक्रम हाताला लागतात.
                    जीवनातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात शुन्यातून होते व शेवट होतो तेंव्हा जीवनाच्या फलकावर स्कोअर शुन्यच दाखवितो. जीवंतपणे आपण जे करतो तोच खरा खेळ असतो. असंच काहीसं क्रिकेटच्या बाबत घडतं. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडलेले आहेत, परंतु आपल्या मोठ्या कारकिर्दीत शुन्यावर बाद न होण्यात भलेभले खेळाडू चुकले नाहीत. परंतु या लेखात अशा पाच नशिबवान खेळाडूंचा परिचय आपणास करून देत आहोत की, ज्यांच्या उभ्या कारकिर्दीत शुन्यावर बाद होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नाही.
                   आपल्या वनडे करिअरमध्ये शुन्यावर बाद होण्यात पहिल्या क्रमांकावर असलेला खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार केप्लर वेसेल्स. आपणास माहिती असेलच की, हा केप्लर वेसेल्स त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका या दोन्ही देशांकडून आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळला. सन १९८३ ते १९९४ या कालावधीत १०९ सामने त्याच्या वाट्याला आले. त्यापैकी १०५ डावात एक शतक व २६ अर्थशतकांसह ३३६७ धावा त्याने ठोकल्या. पण या दरम्यान तो एकदाही शुन्यावर बाद झाला नाही.
                   सन २०१४ ते १९ या कालावधीत स्कॉटलंडचा मॅथ्यू क्रॉस हा खेळाडू ५२ एकदिवसीय सामने खेळला. त्यामध्ये ४८ डावात ११३६ त्याने बनविल्या. या दरम्यान पाच अर्धशतके व दोन शतकेही त्याने ठोकली, परंतु शुन्याने त्याच्यावर कधीही वक्रदृष्टी फिरविली नाही.
                  आपल्या संपूर्ण वनडे कारकिर्दीत शुन्यावर बाद न झालेला एकमेव भारतीय खेळाडू आहे यशपाल शर्मा. सन १९८३ मध्ये भारताने विश्वकरंडक जिंकला त्या संघातला हा प्रमुख फलंदाज. सन १९७८ ते ८५ दरम्यान तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या अवधीत ४२ सामन्यात ४० डाव खेळताना ४ अर्धशतकांसह ८८३ धावा त्याने केल्या. त्यामध्ये ८९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून, ती खेळी त्याने १९८३ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडविरूध्द साकारली होती.
                 सन १९९१ ते १९९४ या कालखंडात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराची भूमिका बजावणारा पीटर कर्स्टन ४० सामने खेळला. त्यात ४० डावात १२९३ धावा फटकविल्या. नऊ अर्धशतकेही ठोकली. सर्वोच्च ९७ धावांची खेळीही सजविली. परंतु शुन्यापासून तो अलिप्त राहाण्यात यशस्वी झाला.
                 जॅक्स रुडॉल्फ हा दक्षिण आफ्रिकेचाच फलंदाज. त्याने ४५ वनडेच्या ३९ डावात फलंदाजी करताना सात अर्धशतकांसह ११७४ धावा जमविल्या. ८१ धावांची एक मोठी खेळीही खेळली. परंतु या दरम्यान कोणताही विरोधी संघ त्याला शुन्यावर बाद करू शकला नाही.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment