तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

..अन् पंकजाताई व पती अमित पालवे (भाऊजीं )च्या 'त्या' संवादाने ऊसतोड मजूरांना मिळाला धीर !


'मलाही अन्न गोड लागत नाही ' पंकजाताई भावूक!!  आपुलकीच्या संभाषणाने कामगारांसह महिलाही भारावल्या!

मुंबई (प्रतिनिधी) :- दि. ०९ --- ' कसे आहात तुम्ही सगळे, काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी  प्रयत्न करत आहे, मुख्यमंत्र्यांच्या मी सतत संपर्कात आहे, लवकरच यातून मार्ग निघेल अशा शब्दांत पंकजाताई मुंडे व डाॅ. अमित पालवे (भाऊजी) यांनी व्हाॅटस ॲप काॅलवरून साधलेल्या संवादाने बीड जिल्हयातील ऊसतोड कामगारांना मोठा धीर मिळाला, त्यांच्या आपुलकीच्या संभाषणाने कामगारांसह ऊसतोड महिलाही भारावल्या.

 कोरोनामुळे राज्यात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशातच लाॅकडाऊन मुळे   पश्चिम महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात बीड व नगर जिल्हयातील सुमारे पंधरा हजार ऊसतोड कामगार वेगवेगळ्या कॅम्पवर अडकून पडले आहेत. पंकजाताई मुंडे हया सध्या दररोज या कॅम्प वरील कामगार बांधवांशी व्हाॅटस ॲप कॉलद्वारें संपर्क साधून त्यांची विचारपूस व आरोग्य विषयक काळजी घेण्याच्या सूचना करत आहेत. लॉकडाऊन कालावधी रद्द होईपर्यंत संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्या कामगारांना करत आहेत, तसेच त्यांच्या व्यवस्थेसंदर्भात प्रशासन व कारखान्याचे चेअरमन यांच्याशीही संपर्क साधत आहेत.

तुम्हीच आमच्या 'माय-बाप'

कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात अडकलेले जवळपास पंधरा हजार मजूर बीडच्या विविध भागातील आहेत, हे समजताच पंकजाताई मुंडे यांनी त्यातील चंद्रकांत तोंडे, कृष्णा खंदारे, गहिनीनाथ खंदारे यांच्यासह कांही महिलांशी व्हाॅटस ॲप काॅलवरून आज संवाद साधला. 'काईबी करा, ताईसाहेब..आमाला इथून काढा, तुम्हीच आमच्या माय-बाप आणि नेता आहात, तुमच्याशिवाय आमचं कुणी नाही ' अशी व्यथा मांडताच पंकजाताई मुंडे यांनी त्यांना धीर दिला. 'तुमच्या काळजीने मलाही अन्न गोड लागत नाही' ,काळजी करू नका, १४ तारखेला लाॅकडाऊनची मुदत संपत आहे, त्यानंतर दोन दिवसांचा गॅप देऊन तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेन, त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी मी सतत संपर्कात आहे, लवकरच मार्ग निघेल  परंतु तुम्ही स्वतःला जपा असे सांगत त्यांच्या कुटूंबियांचीही चौकशी केली.

लेकीच्या संवादाने मजूर भारावले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनेत्याची लेक घेत असलेली काळजी व करत असलेली आस्थेवाईकपणाची चौकशी कामगारांना कठीण प्रसंगाशी लढण्याची हिंमत व विशेष करून महिला कामगारांना मायेची उब मिळवून देत आहे.आमच्याशी थेट संवाद साधून तुम्ही आम्हाला दिलेला आधार लाख मोलाचा असल्याच्या प्रतिक्रिया महिला भगिनींनी यावेळी   व्यक्त केल्या.

No comments:

Post a comment