तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

" ऑल टाईम’ असणारा शेक्सपिअर" प्रा. सिद्धार्थ तायडे


         9822836675
........................................

"शेक्सपिअर , 
तू घेतलास मानवी मनाच्या तळाचा ठाव,
तू दिसतोस  मला रंगमंचीय अवकाश व्यापून टाकताना,
उभा असतोस कधी ताटकळत, कण्हत विंगेत..
रंगमंच आणि प्रेक्षागारात सत्याचा जागर करतांना उतरतोस आमच्या मनातील खोल आडात अन्  ढवळुन काढतोस गाळ साचलेला..
माणुसकी मोजण्याची परिमाणं घेऊन सफर घडवतोस जगाची ...
पहायलय तुला ग्रीनरूम मध्ये चाचपडताना,ब्लैकआऊट मध्ये अडखळताना...
श्वास रोखणे,धडधड वाढविणे तुझा हातखंडा..
प्राक्तनाचे फटके खाणारे
कट-कारस्थाने रचणारे
प्रेमाच्या आणा-भाका घेणारे
विष पेरणारे
स्वार्थांध होणारे
भाव-भावनांचे कल्लोळ 
चित्तारलेस मनोमंचावर.....
तुझी स्वगते,
चक्रावुन टाकणारी
भर्मिष्ठ करणारी
स्तिमित करणारी
माणुसपण कोळून पिणारी....
तुझ्या व्यक्तिरेखा,
मनस्वी
कपटी
भाबडया
धिरोधात्त
सौष्ठव....
 तुझा शोध घेणं
अर्थबोध लावणं
तुझी समीक्षा करणं
कृष्णविवरात संचार करणेच ठरेल...
थांब, आरसा आणखी काही सांगतो का ते पाहून येतो ".....

मिश्र-गूढ अनुभव देणारा शेक्सपिअर,
शेक्सपिअर हा खरेतर खोल डोह. तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, नीतिनियम, नातेसंबंध, राजकारण, अर्थकारण....सर्वांचा मिलाफ. प्रत्येकाच्या वकूबानुसार तळ गवसणार, प्रत्येक बुडीत नवे रत्न मिळण्याची शक्यता. एक पकडताना दुसरे निसटते असेही होते.विल्यम शेक्सपिअर एक अचंबित करणारे रसायन...
विल्यम शेक्सपिअर.
विल्यम शेक्सपिअर हा नाटककार आपल्या ५२ वर्षांच्या आयुष्यातील २४ वर्षांच्या काळात ३६ काव्यमय नाटकांना जन्म देऊन जागतिक रंगभूमीवर आपला अमीट ठसा उमटवणारा तसा जगाच्या रंगभूमीवर एकमेवच! जगाच्या रंगभूमीवर सर्व भाषांना स्पर्श केलेला त्याचा गगनभेदी नाट्यपट विलक्षण तेजानं प्रकाशमय झाला, तरी त्याचा जीवनपट रंगभूमीच्या पडद्यामागील गोष्टींसारखा धूसरच राहिला. कारण गेली तीन शतकं लाखो वक्त्यांच्या वैखरीला शब्दांची रसद पुरवणारा हा जीवनाचा महाकवी स्वत:बद्दल बोलायला मात्र विसरला.

जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.आणि त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
Wooden O” या नावानेही शेक्सपिअरची ‘’द ग्लोब थिएटर्स’’ ही नाटककंपनी ओळखली जात असे. शेक्सपिअरकालीन लंडनमधील लाकूड आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून बांधलेल्या उघड्या थिएटर्सचा दुरून दिसणारा आकार. जिथे नाटकातला घनगंभीर कोरस आणि प्रेक्षक यांच्यातून एक संवाद वाहत आहे अशी भारलेली जागा.हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपिअर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपिअर स्वतःची नाटके या नाट्यगृहात करू लागले. आता मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले. इ.स. १६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
त्याच्या ३८ नाटकांपकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्‍री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस अ‍ॅड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्‍यू’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. या सुरुवातीच्या नाटकावर थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या त्या काळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नाटककारांचा प्रभाव दिसून येतो. मात्र लवकरच शेक्सपिअर या प्रभावातून मुक्त झाला.
शेक्सपिअरच्या ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’ या शोकांतिकेपासूनच त्याला नवीन वाट सापडली असे म्हणता येते. कोवळ्या प्रेमाचे हृदयाला हात घालणारे, अत्यंत प्रभावी व उत्कट दर्शन, काव्यसौंदर्य आणि चटका लावणारा दैवदुर्विलास वर्णन करणारी कथा यामुळे हे नाटक अत्यंत लोकप्रिय ठरले. या नाटकाचा प्रभाव एवढा होता, की काही काळानंतर लोक रोमिओ व ज्युलिएट या खऱ्या व्यक्ती आहेत असेच समजू लागले, आणि आजही समजतात.
१५९९च्या सुमारास शेक्सपिअरने लिहिलेली आणखी एक श्रेष्ठ शोकांतिका ‘ज्युलियस सीझर’ ही आहे. नायकाच्या मनातील आंतरिक संघर्षांतच शोकात्मिकेचे बीजारोपण होते हे तत्त्व शेक्सपिअरने याच नाटकात प्रथम मांडले व नंतर त्याचा विस्तार अनेक नाटकांतून केला. ब्रूट्सच्या मनात मित्रप्रेम मोठे की स्वातंत्र्यप्रेम हा संघर्ष निकराला आला होता. यातूनच नाटकामधील पुढील शोकांतिका घडली.‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘अ‍ॅन्टनी ॲन्ड क्लिओपाट्रा’ या नाटकांतून शेक्सपिअरच्या प्रतिभेचे अत्युच्च दर्शन घडते. १६०१
ते १६०८ या दरम्यान लिहिलेल्या या शोकांतिका एकाहून एक अधिक भीषण व यातनांचे वर्णन करणाऱ्या आहेत. विश्वासघात, कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांचे विकराळ दर्शन त्याने या नाटकांतून घडविले आहे. पण त्याबरोबर श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्युचिंतन यांचाही नाटककाराने येथे सूक्ष्म विचार केला आहे असे जाणवते.

शेक्सपिअरने वापरलेले शब्द, वृत्ते, तसेच राज्यशास्त्र, वैद्यक, ज्योतिष, नाट्यशास्त्र, संगीत इ. विषयांचे त्याचे ज्ञान यांचाही अभ्यास झाला आहे. त्याच्या नाटकांतील पात्रांची सूचीही तयार करण्यात आली. त्याच्या लेखनाच्या सवयींचा अंदाज बांधून त्याच्या नाटकांच्या संहितांचे व त्यांतील शैलीचे स्वरूप ठरविण्याचे प्रयत्न झाले आहेत. तत्कालीन मुद्रणकलेचा अभ्यास करून फर्स्ट फोलिओ कसा छापला गेला असेल, याचाही अभ्यास झाला आहे. शेक्सपिअरवर लिहिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची, लेखांची व व्याख्यानांची नोंद करणारे संदर्भग्रंथही प्रसिद्ध झाले आहेत. हे काम नित्य चालूच आहे.
शेक्सपिअर कवी म्हणून श्रेष्ठ की नाटककार म्हणून ? शेक्सपिअरच्या नाटकांची आजची लोकप्रियता त्यांतील नाट्यगुणांमुळे की काव्यगुणांमुळे ? त्याच्या नाटकांतून त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा सुसंगत क्रम दिसतो काय ? त्याच्या नाटकांत उल्लेखिलेल्या व्यक्ती, प्रसंग व घडामोडी त्यावेळच्या प्रत्यक्ष जीवनात झाल्या होत्या का ? त्याच्या कित्येक काव्यपंक्तींचा नक्की अर्थ काय ? त्याच्या कित्येक व्यक्तिचित्रांभोवती असलेले गूढतेचे वलय दूर करून त्या व्यक्तिचित्रांचे निश्चित स्वरूप समजून घेता येईल काय ? त्याच्या सर्जनशील प्रतिभेचे निश्चित स्वरूप कसे आहे ? इत्यादी. या प्रश्नांची उत्तरे समीक्षा शोधत राहील आणि ती शोधताना नवे प्रश्नही निर्माण होतील पण एक गोष्ट खरी, की मॅथ्यू आर्नल्डने म्हटल्याप्रमाणे शेक्सपिअरची वाङ्‌मयीन महानता सदैव वादातीत राहील.तर बेन जॉन्सनचे हे उद्गार चिरंतन राहतील...
He was not of an age, but for all time!

No comments:

Post a Comment