तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

भीमयुग :भारतीय संविधानाचा यथार्थ गौरव करणारी नाट्यकृती:-
प्रा.सिद्धार्थ तायडे मो.9822836675
............................................................
"भीमयुग"हे नवी अनुभूती देणारे क्रांतिकारी नाटक आहे. बुद्ध-फुले-शाहू -आंबेडकरी चळवळीतील प्रतिभावंत नाटककार रानबा गायकवाड यांच्या आंबेडकरी हुंकाराच्या लेखणीतून व राष्ट्रीय सन्मान प्राप्त सिने नाट्य अभिनेता दिग्दर्शक प्रा. सिद्धार्थ तायडे यांच्या सृजनशील दिग्दर्शनातून
हे नाटक रंगभूमीवर आले आहे.सम्यक थिएटर्स निर्मित व सिने-नाट्य कलावंत संघटना, परळी वै. प्रस्तूत या नाटकातून रानबा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतीदर्शी विचार  सशक्त आणि विस्तृतपणे मांडला आहे. ही कलाकृती समतेचा जागर घालणारी व कोणत्याही
सृजनशील माणसाला अस्वस्थ करणारी नाट्यकृती आहे.26 नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या जीवनात अतिशय मोलाचा दिवस आहे. संविधान दिन म्हणून हा दिवस देशभर साजरा केला जातो.स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या वैचारिक मूल्यांनी युक्त राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस बहाल केली आहे.त्या क्षणापासून देशात नवी क्रांती झाली आणि "भीमयुगास"सुरुवात झाली.
 समाज प्रबोधनासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहे. समाजजागृती आणि आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी "भीमयुग"हे नाटक उपयुक्त ठरते. संविधान स्वीकृतींनंतर आंबेडकरी समाजात परिवर्तनाची लाट आली. शिक्षणपूर्ण करून समाज उभा राहिला आणि सर्व बांधवांनी नेत्रदीपक प्रगती कशी केली यावर या नाटकांतून प्रकाश टाकण्यात आला आहे.पारंपरिक नाटकांपेक्षा या नाटकाचे वेगळेपण आपल्याला जाणवल्याशिवाय रहात नाही. या नाटकाच्या लेखन-निर्मिती-दिग्दर्शन-सादरीकरण या मागच्या प्रेरणा तपासल्यावर असे लक्षात येईल की, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक छळांचे बळी ठरलेल्या, दबलेल्या, अन्याग्रस्त, अत्याचाराच्या आवर्तनात गुरफटलेल्या एका वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे व करीत आहेत याचे चित्रण प्रस्तूत नाटकातून केले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता,आणि न्याय या मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी दलित रंगभूमीने आक्रमक पवित्रा कसा घेतला आहे त्याची पाळंमूळं या नाटकात अनुभवता येतात.दलित रंगभूमी ही काळाची आव्हाने पेलणारे, समर्थ अभिव्यक्तीचे माध्यम आहे. हे आव्हान पेलण्याचे कार्य दिग्दर्शक प्रा. सिद्धार्थ तायडे ग्रामीण भागातील रंगकर्मीना सोबत घेऊन प्रयोगरूपाने करत आहेत. प्रचंड उन्हाची धग सोसून वादळाशी टक्कर देणारे, स्व:ताचे अनूभव घेऊन जगणारे लेखक पत्रकार, संपादक, नाटककार रानबा गायकवाड यांचे लेखन दलित रंगभूमीला अधिक जवळचे वाटते.या नाटाकतील कलावंत हे सामाजिक भान ठेवून आपल्या भूमिका पूर्ण करण्यासाठी तत्पर आहेत.

सामाजिक अंधकार दूर करण्यासाठी बुद्धीवंत आणि कलावंत आपली प्रबोधनाची हत्यारे घेऊन रणात उतरतात.  "भीमयुग"हे  रानबा गायकवाड लिखीत वैचारीक नाटक प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केले आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरील नाटक , चळवळीची नाटकं व्यावसायिक ठेकेदार शक्यतो घेत नाहीत. चळवळीतील प्रत्येकाने  अशा प्रबोधनात्मक  कलाकृती कृृतीप्रवणतेतून जगविल्या पाहिजेत, असे मला वाटते.आद्यनाटककार महात्मा फुले यांचे 'तृतीय रत्न ',म. भि. चिटणीसकृत 'युगयात्रा ,प्रा. दत्ता भगतांचे'आवर्त'वाटापळवाटा,भि.शि.शिंदे यांचे' काळोखाच्या गर्भात',प्रेमानंद गज्वी यांचे किरवंत, घोटभर पाणी, रामनाथ  चव्हाणांचे 'बामनवाडा, टेक्सास गायकवाडांचे' आम्ही देशाचे मारेकरी', प्रकाश त्रिभुवन यांचे 'थांबा,रामराज्य येतंय!,'प्रा.डाॅ. ऋषीकेष कांबळे सरांचे 'भाई तुम्ही कुठे  आहात' ,प्रेमानंद गज्वी सरांचे "हवे पंख नवे" ,राजकुमार तांगडे यांचे "शिवाजी अंडर ग्राउंड ईन भीमनगर मोहल्ला",प्रा. अनिलकुमार साळवे यांचे "कथा खैरलांजी", अरविंद जगताप यांचे " स्टँच्यू ऑफ लिबर्टी"या नाटकांची मांडणीच वेगळी आहे.समाजाला जागृत करण्यासाठी हे लेखन व प्रयोग झाले. आजही बरेचसे प्रयोग आयोजित केले जात आहेत.त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.हे आनंददायी चित्र आहे. असाच प्रतिसाद "भीमयुग" लाही मिळेल असा विश्वास आहेचं.  वैचारिक नाट्यसंहितेवर  तटस्थतेने चर्चा व्हावी ,  साधार वाद-विवाद व्हावेत ,वाद विसंवादी न होता चर्चेतूनच सुसंवाद घडावा, एकारलेपणाऐवजी जे उत्तम आहे, त्याचा स्वीकार व्हावा , हा देखील हेतू या  नाट्यनिर्मिती मागेही निश्चितच आहे.

 भीमयुग  नाटक  निशब्द करणारे , अंतर्मुख करणारे आणि परिवर्तनाची नांदी अधोरेखीत करणारे नाटक आहे.सत्य पचवायची ताकद देणारे नाटक . डॉ. बाबासाहेबांच्या क्रांतीदर्शी विचार कार्यवर  प्रकाश टाकणारे हे वैचारीक नाटक आहे.आता पर्यन्त झालेल्या कलाकृतींमध्ये तोच तोच पारंपारिक संघर्ष दिसतो. वैचारिक संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  कायदा हा सर्वात मोठा आहे.संविधान सगळ्यात महान  आहे. या कलाकृतीत    डॉ. आंबेडकर यांची व्यक्तिरेखा मंचावर आणावी असे कुठे वाटले नाही पण त्यांचा वावर मात्र प्रत्येकक्षणी जाणवेल याचा  प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ह्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाने , डॉ.आंबेडकरांप्रति ऋणी असणाऱ्या प्रत्येक मानवाने हे नाटक अनुभवावे . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यापक विचार -कार्य नव्यापिढी पर्यंत पोहोचवायचे असेल तर हे नाटक निश्चितच प्रेरक ठरेल असा मला विश्वास वाटतो. हे नाटक तुम्हाला धर्म आणि जाती पलिकडचे बाबासाहेब हे किती अद्वीतीय , महान आहेत हे दाखवण्याचा प्रयोग प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शक यांनी केला आहे.मात्र हे भीमकार्य असेच अविरत चालु रहावे यासाठी सर्वांचे सहकार्य हवे .

आज दलित नाटकाच्या आशयाच्या संदर्भात अधिक विचार होणे ही काळाची गरज आहे. विद्रोहाने पेटलेली मने, न्याय-हक्कांसाठी उभारलेला आंबेडकरी बाण्याचा स्वाभिमानी लढा यांचे पडसाद 'भीमयुग'या नाटकातून उमटणे स्वाभाविक आहे. आशय, विषय, अभिव्यक्ती या बाबतीत हे नाटक पारंपरिक नाटकांपेक्षा वेगळे आहे.
माणसांमधला विसंवाद दूर करण्यासाठी,
समाजातील टोळी युद्ध बंद करण्यासाठी,
आपला वर्तमान-भविष्यकाळ पेटवून देणाऱ्यां विरोधात बंडासाठी,

आपली नितळ मनं गढूळ करणाऱ्या कपटी- कारस्थांना विरुद्ध झगडण्यासाठी,
 हुकूमशाही आणु पाहणाऱ्या पडदयामागील विकृत मेंदू विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी,
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बेडया घालू पाहणाऱ्या मुजोर
दलालांना धडा शिकवण्यासाठी,
सनातनी कार्पेट अंथरुन  गुंडांचे उदात्तीकरण करणाऱ्या भ्रष्ट उन्मादाविरुद्ध झुंजण्यासाठी,
इतिहास, संस्कृती ,परंपरा , जाती, धर्म , लिंग, प्रदेश, भाषा यांचे विकृतीकरण करणाऱ्या  प्रतिगामी गेंड्यांची मस्ती जिरवण्यासाठी,शेतकरी- कामगार - वंचितांच्या आत्महत्यांचे आकडे वाढविणाऱ्या व्यवस्थेवर आसूड ओढण्यासाठी"भीमयुग"ही नाट्यकृती सज्ज झाली आहे.दलित रंगभूमीवरील हे नवीन नाटक भोतलाच्या आव्हानांना स्वीकारणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील स्वातंत्र्य,समता, बंधूता आणि न्याय याचे रक्षण करणारे, त्याला तडा देणाऱ्या प्रवृत्तीचा प्रतिकार करणारे, तितकेच सामंजस्याच्या भूमिकेशी जवळ जाणारे आणि भारतीय संविधानाचा यथार्थ गौरव करणारे  नाटक आहे.

No comments:

Post a comment