तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

रस्त्यावर चित्रे रेखाटून लॉकडाऊन विषयी प्रबोधन

अंबाजोगाईतील चित्रकारांचा अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- गुरुवारी सकाळी अंबाजोगाईकरांना संचारबंदीतून अडीच तासांची सूट मिळाली. यानिमित्ताने नागरिक विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले असता त्यांना चौकाचौकात रस्त्यांवर काढलेली प्रबोधनात्मक आकर्षक चित्रे रेखाटलेली दिसून आली आणि त्या चित्रांची सर्वत्र कौतुकपर चर्चा सुरु झाली. अशी चित्रे रेखाटून लॉकडाऊन विषयी प्रबोधन करण्यासाठी अंबाजोगाईतील तरुण चित्रकार योगेश कडबाने आणि त्यांचे सहकारी पुढे आले आहेत. हे पाचही चित्रकार शहरातील सर्व प्रमुख चौकात अशी चित्रे काढून नागरिकांना घरातच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत आहेत. 
दिवसागणिक देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे लोक रस्त्यावर येतच आहेत. त्यामुळे आपल्याला अवगत असलेल्या चित्रकलेच्या माध्यमातून लॉकडाऊन विषयी लोकांचे प्रबोधन करावे अशी संकल्पना अंबाजोगाई येथील चित्रकार योगेश कडबाने यांना सुचली. याविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी ही संकल्पना केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांच्या समोर मांडली. आ. मुंदडा यांनाही ही संकल्पना अतिशय आवडली आणि प्रमुख चौकात अशी चित्रे काढावीत असे त्यांनी सुचविले. तसेच, यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचीही तयार त्यांनी दाखवली. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी लागलीच कडबाने यांना रंगासहित सर्व साहित्य उपलब्ध करून देत प्रोत्साहित केले  तर, शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे यांनी कलाकारांचा चांगला उद्देश लक्षात घेत त्यांना चित्रे काढण्यास परवानगी दिली. त्यानंतर योगेश कडबाने आणि त्यांचे सहकार राहुल भिसे, मनोज कोकणे, बालाजी चौरे व रंगनाथ गाडेकर यांनी बुधवारपासून चौकातील रस्त्यांवर प्रबोधनात्मक चित्रे काढण्यास सुरुवात केली. आतापर्यत या कलाकारांनी  छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि यशवंतराव चव्हाण चौकात एकूण सात चित्रे आणि संदेश रंगविली आहेत. त्यातून ‘लॉकडाऊनचे नियम पाळा, यम टाळा’, कोरोना म्हणजे कोई रोड पर ना निकले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या गर्भाशया एवढेच आपले घर सुरक्षित आहे त्यामुळे घरातच थांबा असे विविध संदेश देण्यात आले आहेत. संदेश प्रभावी करण्यासाठी यमाच्या रुपात रेड्यावर बसू येणारा कोरोना विषाणू आदी कल्पक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. पोलिसांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ‘वर्दीतला देव तुमच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे' असा संदेशही एका चित्रातून देण्यात आला आहे. गुरुवारी या चौकातून जाणारे नागरिक थांबून ही चित्रे पाहून कलाकारांचे कौतुक करत होते. ही चित्रे सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरू लागली आहेत. 
लवकरच शहरातील इतर प्रमुख चौकातही चित्रांद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे योगेश कडबाने यांनी सांगितले. ही चित्रे पाहून एकवेळ आमचे कौतक करू नका, मात्र चित्रातून दिलेला संदेश अवश्य पाळावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

No comments:

Post a Comment