तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 May 2020

जिल्हा पोलिस अधिक्षक रात्री उशीरा आले आणि त्यांच्यासाठी चहा मागवला


चहावाल्याने पैसे मागितल्याने दोन तास पोलिसांनी डांबून ठेवले

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-

अगोदरच लॉकडाऊनमुळे सामान्य जनता आणि व्यवसायीकांचे मोठे हाल झाले आहेत. अर्थव्यवस्था आता कुठे सुरळीत मार्गावर येण्यास सुरूवात झाली आहे. अशातच दररोज नव्या नव्या नियमांची भर पडत असल्याने सर्वजन बुचकळ्यात पडलेले आहेत. कोणाला काहीही समजण्यास तयार नाही. नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आणि पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत कशी राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतू काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे पोलिसांच्या चांगल्या कामाला डाग लागतो की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

दि.२७ मे रोजी परळी शहरात घडलेल्या दगडफेक प्रकरणामुळे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी परळीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात जावून रात्री उशिरा आढावा घेतला. रात्रीच्या या वेळेला बाजीप्रभू नगर, नेहरू चौक येथील एका हॉटेलचालकास पोलिसांनी घरी जावून त्याला    चहा करून देण्यासाठी सांगितले. चहाच्या सामानाची जमवाजमव करून त्या हॉटेल चालकाने रात्री उशिरा पोलिसांना चहा करून नेऊन दिला. रात्री पोलिस अधिक्षक आलेले असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास चहा देणारा हॉटेल चालकाने रात्री दिलेलेल्या चहाच्या पैशांची परळी शहर डिएसबी यांच्याकडे मागणी केली. चहाच्या पैशांची मागणी केल्यामुळे संबंधीत हॉटेल चालकाला दुपारच्या सुमारास उचलून नेऊन तब्बल दोन तास पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्यात आल्याने परळी शहरात पोलिसांबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.


पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालावे

गेल्या दोन महिन्यांपासून परळी शहरातील कायदा आणि सुव्यस्था पुरती बिघडल्याची अनेक उदाहरणे घडत आहेत. परळीत वारंवार हल्ले होत आहेत. दोन महिन्यांपासून दोन वेळेस पत्रकारांवर आणि दि.२८ रोजी नायब तहसिलदार यांच्यावर हल्ला करण्यात आला. या सर्व घटना वेगवेगळ्या असल्या तरी पोलिसांचा वचक राहिला नसल्याने हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अनेकांना धमक्या, राखेची आणि वाळूची अवैध वाहतूक, अवैध  दारूची विक्री, मोठ्या प्रमाणावर गुटख्याची बेकायदेशीर विक्री होत आहे. चहाचे पैसे मागितले म्हणून राग धरणारे पोलिस करोडोंचा अवैध धंदा करणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनीच यात लक्ष घालावे अशी मागणणी नागरीकांतून होत आहे.

No comments:

Post a comment