तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

कोरोनाचा गावात प्रवेश होऊ नये म्हणून आम्ही घेतोय खबरदारी, मरळवाडीत झाले निर्जंतुकीकरण - प्रभू आंधळे
महादेव गित्ते |
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोनाचा गावात प्रवेश होऊ नये म्हणून आम्ही पुर्ण खबरदारी घेत आहोत. गावात नियमीत स्वच्छता केली जात असुन गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती मरळवाडीच्या सरपंचपती प्रभू आंधळे यांनी दिली. बाहेरून आलेल्या नागरीकांच्या क्वारंटाईनची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भर उन्हाळ्यातही प्रभू आंधळे हे स्वखर्चाने संपुर्ण गावाला पाणीपुरवठा करीत आहेत हे विशेष.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्या गावात जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून ग्राम पंचायत आपल्या स्तरावर जोरदार प्रयत्न करीत आहेत. मरळवाडीच्या सरपंच सौ. भिमाबाई प्रभू आंधळे, उपसरपंच व्यंकटी आंधळे, ग्रामसेवक के. के. वाकडे, आशा वर्कर रामकली फड, अंगणवाडी सेविका शिवकांता चाटे आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्या सहकार्याने गावात जोरदार जनजागृती करण्यात आली आहे. कोरोनाची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. गावात चोहीकडे फवारणी करण्यात आली असून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
     गावात बाहेरून ८५ नागरीक आले असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले असुन ग्राम सुरक्षा समितीचे पदाधिकारी आणि सदस्य परिसरातीवर नियंत्रण ठेऊन आहेत. धर्मापुरी आरोग्य केंद्र आहे, त्यामुळे आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत असे सांगून प्रभू आंधळे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने गोरगरीब जनतेची उपासमारी होऊ नये शासनाचे धान्य सर्वांना व्यवस्थित वाटप करण्यात आले आहे. नागरीकांची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी सांगितले.
        बाहेरून आलेल्या नागरीकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे. कारण ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात एवढेच नव्हे तर यामुळे वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रभू आंधळे यांनी सांगितले. 

स्वखर्चाने पाणी पुरवठा 

        मरळवाडीत सर्व गावाला प्रभू आंधळे हे स्वखर्चाने पाणी पुरवठा करीत आहेत. एवढा उन्हाळा असुनही गावात पाणी टंचाई जाणवत नाही. 
      गावाच्या सेवेसाठी ग्राम पंचायत सदैव तत्पर आहे, पण कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असे आवाहन प्रभू आंधळे यांनी केले.

No comments:

Post a Comment