तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनावर आवलंबुन न राहता प्रत्येकाने खबरदारी घ्यावी - डॉ. राजाराम मुंडे
टोकवाडी ग्राम पंचायतने कोरोना पार्श्वभूमीवर केल्या विविध उपाययोजना, सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने लागले कामाला

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोनाला गावात येण्यापासून रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनावर आवलंबुन न राहता प्रत्येक नागरीकांनी कोरोना योध्दा म्हणून काम करायला पाहिजे, हे सरपंचानेच करावे, ते ग्रामसेकानेच करावे असे न म्हणता स्वतः पुढे येऊन काम काम करावे असे आवाहन टोकवाडी ग्राम पंचायतचे सरपंचपती, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाराम मुंडे यांनी केले आहे. टोकवाडी ग्राम पंचायतने कोरोना पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या आहेत. डॉ. मुंडे यांच्या पुढाकाराने सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने कामाला सुरुवात केली आहे.
        सध्या कोरोनाने कहर केला आहे. गावागावात आणि वाड्या तांड्यावर एकच चर्चा आहे. मात्र याचवेळी कोरोनाने गावात प्रवेश करू नये म्हणून ग्राम पंचायत विविध उपक्रम राबवित आहेत. टोकवाडी ग्राम पंचायतने तर कोरोनाशी दोन हात करण्यासाठी चांगलीच आघाडी उघडली आहे. सरपंच सौ. गोदावरी मुंडे यांचे पती हे स्वतः डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन अनेक उपाययोजना केल्या आहेत. पंचायत समितीचे उपसभापती बालाजी (पिंटु) मुंडे, उपसरपंच मंदाकिनी काळे, ग्राम सेवक अशोक नागरगोजे या आणि इतर सर्वांच्या सहकार्याने डॉ. राजाराम मुंडे यांनी टोकवाडीत चांगले काम सुरू आहे. कोरोनाची चर्चा सुरू होताच टोकवाडी ग्राम पंचायतने कचरा गोळा करणार्‍या घंटागाडीवरील स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करायला सुरुवात केली. नागरीकांनी काय करावे, काय करू नये याविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले. गावासाठी स्वतंत्र फाॅगींग मशीन घेऊन निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम हाती घेतली. एवढेच नव्हे तर गावात स्वच्छता करण्यासाठी आठ मजूर लावुन काम सुरू केले. या सर्व कामात ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्राम पंचायत कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोराळे, नागापूर आरोग्य केंद्रातील स्टाफ आणि सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगून नागरीकांना शुध्द पाणी मिळावे म्हणून अवघ्या 5 रूपयात 18 लिटर फिल्टर वाॅटर आम्ही उपलब्ध करून दिले आहे. 
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत सर्वांना मोफत धान्य वाटप केले. धान्याची रक्कम उपसभापती पिंटू मुंडे यांनी अदा केली आणि सर्वांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले डॉ. राजाराम मुंडे सांगत होते. लाॅक डाऊन झाल्याने कामासाठी बाहेर गेलेले नागरीक मोठ्या प्रमाणात गावी आले, तसेच ऊसतोड मजूरही परतले. आलेल्या सर्व लोकांची आरोग्य विभागाने आणि मी स्वतः तपासणी केली. काही जणांना होम क्वारंटाईन केले तर काही जणांना गावाबाहेर स्वतंत्र ठेवले आहे. टोकवाडीत एकुण 275 नागरीक आले असुन त्यापैकी 25 जणांना गावाबाहेर ठेवले आहे. सर्वांची मी स्वतः दररोज तपासणी करून योग्य ती खबरदारी घेतो असे त्यांनी सांगितले. 
  
दारू बंद करावी 
      गावात सर्व नागरीक शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करतात मात्र काही लोक अडथळा आणतात. गावात हातभट्टी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्यामुळे दारू पिण्यासाठी लोक मोठय़ा संख्येने जमा होतात. तिथे कसलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही, मास्क बांधले जात नाहीत असे सांगून डॉ. राजाराम मुंडे म्हणाले की, प्रशासनाने कठोर पावले उचलून दारू बंद करावी अशी मागणी त्यांनी केली. 
      कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टोकवाडी ग्राम पंचायत जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांनीही आमच्या आणि प्रशासनावर आवलंबुन न राहता स्वतः पुढे येऊन काम करायला पाहिजे. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment