तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

बालकाव्यमहोत्सव" साहित्यसंपदा समूहाकडून मे महिन्याची आगळी भेट


   
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मे महिना म्हटलं की आठवतं ते म्हणजे चिंचा, बोरं, आंबे आणि गोष्टींच्या पुस्तकांसंगे केलेली धमाल मस्ती. चांदोबा, चंपक अश्या अनेक पुस्तकांनी बाल मनावर अधिराज्य गाजवलेली पिढी साहित्याकडे आपसूक ओढली गेली. बालसाहित्यातून बालसंस्कार, संवेदनशील आणि रचनात्मक समाज निर्मिती अशी विविध उध्दीष्टे सफल होताना दिसतात.

सध्या लॉकडाऊनमुळे मुलांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. घरात बसून मोबाइलवर गेम खेळणे असे चित्र घरोघरी दिसत असताना मुलांच्यात साहित्याची आवड निर्माण व्हावी ह्या करता "बालकाव्य महोत्सव " साहित्यसंपदा समूहातर्फे ऑनलाईन स्वरूपात साजरा करण्यात आला. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर विदेशातून देखील ह्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. साहित्यिक, पत्रकार आणि समाजसेवक गुरुदत्त वाकदेकर ह्यांनी सदर उपक्रमाचे औपचारिक उदघाट्न केले. साहित्यसंपदा समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना त्यांनी ३१ मे २०२० होणाऱ्या बालसाहित्य संमेलनास सहभागी होण्याचे आव्हान  केले. समूहातील साहित्यिकांच्या वाटचालीस शुभेच्छा देताना त्यांनी समाजसेवेचा संदेश सुद्धा दिला.

"उजळली सांजवेळ" कादंबरीकार, कवी, पत्रकार संदीप बोडके, "मनातली पाने " काव्यसंग्रहाच्या लेखिका कवयित्री सलोनी बोरकर ह्यांनी आपल्या बालकविता सादर केल्या. अभिमानाची बाब म्हणजे सातासमुद्रापार राहून सुद्धा मराठी भाषेची नाळ टिकवू पाहणाऱ्या गुंजन कोल्हे श्रीवास्तव ह्यांनी देखील भारतीय वेळेनुसार उपस्थित राहून बालकविता सादर केली. कवितांची गोडी लहान वयातच उमगून माधवी सटवे ह्यांची रचना, तनिषा देव ह्या बालिकेने प्रभावीपणे सादर करून बुद्धीची चुणूक दाखवली. वेदांत संजय कदम ह्या बालकवीने आपली बालकविता सादर  केली. वैशाली माळी (पुणे), संध्या जोशी (मुंबई), मंजुळ चौधरी पाटील (नाशिक), वर्षा पटले रहांगडाले (गोंदिया), संध्या महाजन (जळगाव) अशा महाराष्ट्रातील विविध भागांतील आणि स्तरांतील कवी, कवयित्रींनी आपल्या बालकविता सादर केल्या. कविता सादरीकरणाच्या चित्रफिती "साहित्यसंपदा डिजिटल पर्व " या YouToube चॅनेलवर उपलब्ध असल्याने कोणीही, कुठूनही आणि केव्हाही ह्या रचनेचा आस्वाद घेऊ शकतो.

मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि मराठी भाषा संवर्धन ह्या व्यापक दृष्टीकोनातून साहित्यसंपदा समूहातर्फे "बालसाहित्य संमेलन" दिनांक ३१ मे २० रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. चारोळी, कथा, कविता अशा विविध साहित्य प्रकारांची ओळख पुढील पिढीस ह्या माध्यमातून होईल असा विश्वास साहित्यसंपदा समूहाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सहभागी होण्यासाठी १८ वर्षांखालील मुलं, मुलींनी मराठी भाषेतील स्वरचित कथा, कविता, चारोळी साहित्य sahityasampada7nov18@gmail.com ह्या ईमेलवर पाठवावे असे निवेदन करण्यात आले आहे. सदर संमेलनात साहित्यसंपदा समूहातील सदस्यांच्या लिखाणाचा "बालसाहित्य ई-विशेषांक" प्रकाशीत करण्यात येईल.

No comments:

Post a Comment