तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

कोरोनाचा परळीकरांना कानमंत्र " मी येणार नाही, कसेही वागा"अख्ख्या बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी, ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग, प्रशासन हतबल

 नो निर्जंतुकीकरण - नो सॅनिटाइझर, सारे काही खुल्लम खुल्ला!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) " मी आता चाललो, परत येणार नाही, तुम्हाला हवे तसे वागा " असा कानमंत्रच जणु काही परळीकरांना दिलाय असे वाटू लागले आहे. मी येणार नाही असा निरोप दिल्याच्या अविर्भावात परळी तालुक्यातील नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी करीत बाजारपेठेत प्रचंड गर्दी केल्याचे दिसत आहे. कुठेही निर्जंतुकीकरण नाही किंवा सॅनिटाइझरचा वापर नाही. पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांना मास्क नाही असे विदारक चित्र आणि यापुढे पोलीस आणि प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र दिसुन आले. नागरीकांनी अतिशय काळजी घेण्याची गरज असतानाच ते जास्त बेफिकीर झाल्याने प्रशासनाचे टेंशन वाढले आहे. " कोरोना गेलेला नाही, नागरीकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी केले आहे.
      कोरोनाचा कहर चोहीकडे सुरूच आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला लाॅक डाऊन शिथील करून अनेक सवलती दिल्या आहेत. नियम, अटींचे पालन करून व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र याचा विपरित परिणाम दिसू लागला आहे. अनलाॅकचा अर्थ वेगळा लावत लोकांनी बाजारात अनावश्यक गर्दी करायला सुरुवात केली आहे. तब्बल दोन महिने ठेवलेला संयम सोडून लोक आता नियम मोडू लागले आहेत. सकाळपासूनच बाजारातील सर्वच दुकानांवर नागरीक सर्व नियम गुंडाळून गर्दी करू लागले आहेत.
    सध्या शेतीची कामे असल्याने शेतकरी बाजारात आले तर हरकत नाही पण ज्यांना घराच्या बाहेर पडण्याची आवश्यकता नाही असे चाकरमानीही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. काहीही किरकोळ निमित्त काढून लोक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. बाजारातील बहुसंख्य दुकाने ही निर्जंतुकीकरण केलेली नाहीत तर बहुसंख्य दुकानात सॅनिटाइझर नाही. सर्व काही नागरीकांच्या भरवशावर सोडल्याचे दिसुन येत आहे.

नो मास्क, नो सोशल डिस्टन्सिंग

       घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क बंधनकारक करण्यात आलेला आहे मात्र बहुतांश नागरीक हे मास्कशिवाय दिसुन येत आहेत. जास्त लोकांनी एकत्र येऊ नये या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत असुन चौकाचौकात नागरीक गटागटाने गप्पा मारत असल्याचे दिसून येत आहे. चहा - नाश्त्याच्या हाॅटेल नावालाच बंद असुन सर्व काही खुल्लम खुल्ला चालू आहे. बरीच दूकाने वेळ संपली तरी चालूच असल्याचे बघावयास मिळत आहे.

पोलीस, प्रशासन हतबल

      दरम्यान शहरात कोरोनाच्या सर्व नायमांचे उघडपणे उल्लंघन केले जात असले तरी पोलीस आणि प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र आहे. कुणीही कुणाला विचारायला तयार नाही. मास्क न वापरणार्‍यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे मात्र कुणीही हे गांभीर्याने घेताना दिसत नाही. विशेषतः सुशिक्षित नागरीक नियमभंग करण्यात आघाडीवर असल्याचे बघावयास मिळत आहे.

कोरोना गेला नाही, नियमांचे पालन करा - डॉ
विपीन पाटील

      कोरोना गेलेला नाही, नागरीकांसाठी लाॅक डाऊन कमी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे आणि स्वतः व कुटुंबाला सुरक्षित ठेवावे असे आवाहन तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, तसेच वृध्द आणि बालकांनीही घराबाहेर पडण्याचे टाळावे. प्रत्येक नागरीकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

व्यापार्‍यांनी काळजी घ्यावी - अरविंद मुंडे

       शहरातील व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून अटी व शर्ती घालून दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. व्यापार्‍यांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा असे आवाहन परळी पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे. प्रत्येक दुकानांमध्ये सॅनिटाइझर आवश्यक आहे तसेच ग्राहकांना मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश देऊ नये. दुकानाचे नियमित निर्जंतुकीकरण करावे आणि आपले दुकान स्वच्छ ठेवावे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी पुर्वीप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवकुमार केदारी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
        प्रशासनाच्या कायदापालनामुळेच कोरोना आला नाही. हे सत्य आहे पण आता नागरीक कोणत्याही नियमांचे पालन करीत नाहीत. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लक्ष घालून नागरीकांना शिस्त लावावी असे निवेदन येथील व्यापारी शिवकुमार केदारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

No comments:

Post a comment