तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

आंतरराष्ट्रीय स्तरावर धावबाद होण्यास बदनाम असलेल्या जोड्या             क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटच्या सामन्यात भले एका वेळी एकच खेळाडू हिरो ठरतो परंतु तो जो कोणी हिरो बनतो त्याच्या मागे संपूर्ण संघाची शक्ती असते हे विसरून चालणार नाही. खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजीच्या जोडीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत.
             भर मैदानात दोन फलंदाजात मोठमोठ्या भागिदाऱ्या झाल्याचे अनेक प्रसंग आपण बघितले आहेत. त्यावेळी त्या दोन जणात परस्पर सामंजस्य व एकमेकांच्या भावनांचा पुरेपूर संगम झालेला असतो. तर अश्या काही जोड्या आहेत की ते अनेकदा एकत्र खेळले, काही प्रसंगी चांगल्या धावाही भागीदारी दरम्यान जोडल्या. परंतु त्यांचे मन काही क्षणासाठी विचलीत होऊन त्यांची जमलेली जोडी तुटल्याचे बऱ्याचदा घडले आहे.
             श्रीलंकेेचे माजी दोन दिग्गज खेळाडू डावखुरा अर्जुना रणतुंगा व उजव्या हाताने खेळणारा अरविंदा डिसिल्व्हा यांनी श्रीलंकन क्रिकेटला आपल्या लाजवाब फलंदाजीने विश्वविजेता बनविले. शिवाय श्रीलंकन क्रिकेटला त्यांनी वेगळ्या उंचीवरही पोहचविले. श्रीलंका संघासाठी त्यांनी व्यक्तीगतरित्या खूप मोलाचे योगदानही दिले आहे.
              श्रीलंकेसाठी त्या दोघांनी अनेक सामन्यात मोठमोठ्या भागीदाऱ्याही केल्या आहेत. मात्र त्यांच्यात धावा पळताना अनेकदा गडबड व्हायची. त्या धावपळीत ते एकत्र फलंदाजी करत असताना तब्बल १४ वेळा त्यांच्यातील एक जण धावबाद झालेला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये भागीदारी दरम्यान धावबाद होण्याचा विश्वविक्रम याच जोडीच्या नावावर आहे.
               भागीदारी दरम्यान आपल्या जोडीदाराला धावबाद करण्यात दुसऱ्या क्रमांकावरील जोडीही श्रीलंकेचीच आहे. सन १९९६ च्या श्रीलंकेच्या विश्वविजयाचे शिल्पकार असलेल्या सनथ जयसुर्या व रोमेश कालुवितरणा या धडाकेबाज जोडीने मुळचे सलामीवीर नसतानाही सलामीस येऊन फलंदाजी कशी करावी याचे पाठच जगातल्या तमाम सलामीवीरांना दिले. ते दोघेही आपल्या कुवतीपेक्षा जोरदार खेळ करायचे. अनेकदा त्यांनी भागीदारीतही भरपूर धावा जमविल्या. मात्र डावखुरा जयसुर्या व उजव्या हाताचा कालुवितरणा यांच्यातील धावा पळण्यातील विसंगती अनेकदा त्यांच्या बाद होण्याचे कारण ठरली. एकूण १३ वेळा यांच्यापैकी एक तरी फलंदाज भागीदारी दरम्यान बाद झाला आहे.
               आपल्याच जोडीदाराच्या मुळावर उठलेली तिसरी सर्वात बदनाम असलेली जोडीही श्रीलंकेचीच आहे.  माजी दोन कर्णधार कुमार संगकारा व दिलशान तिलकरत्ने ही डावी - उजवी फलंदाजांची जोडी. दोघांनीही सरस फलंदाजी, यष्टीरक्षण करून संघाचा बालेकिल्ला सांभाळला आहे. दिलशानने तर गोलंदाजीतही श्रीलंकेला मोठा हात दिला आहे. एवढेच नाही तर श्रीलंकेसाठी वनडे सामन्यात ७४ डावात ३८८२ धावा भागिदारीत करून ही जोडीच  आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्या एवढया मोठया सामंजस्या नंतरही कुठेतरी गडबड व्हायची व यापैकी एक तरी धावबाद होऊन तंबूत परत जायचा. एकंदर आठ वेळा हा प्रकार या दोघांत घडला आहे.
               फाफ ड्यू फ्लेसिस व एबी डिव्हिलर्स हे दक्षिण आफ्रिकेचे सर्वात यशस्वी फलंदाज व माजी कर्णधार. लहानपणापासूनचे जीवलग मित्र. जसे एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे तसे संंघाच्या मदतीला नेहमी धावायचे. फलंदाजीत दोघांनीही नेत्रदिपक कामगिरी केली आहे. एकत्र फलंदाजी करताना त्या दोघांनी २७ डावात १०३४ धावांची भागीदारीही केली आहेे. मात्र एकमेकांना धावबाद करण्याचा कारनामा तब्बल ८ वेळा त्यांच्या दरम्यान घडला आहे.
               भारताच्या फलंदाजीचा कणा असलेली रोहीत शर्मा व विराट कोहली ही काळूबाळूची जोडी एकमेकांना धावबाद करण्यात जगात पाचव्या क्रमांकावर आहे. दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ फलंदाज आहेत. संघासाठीही नेहमी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांच्या सोबतीने त्यांनी अनेकदा भारताचा निव्वळ डोलाराच सांभाळला नाही तर ५६ एकदिवसीय सामन्यात त्यांनी ३४११ धावा भागीदारी करून जोडल्या आहेत.
              मात्र या दरम्यान दोघांच्या विचारसरणी व  खेळण्याच्या शैलीतला फरक स्पष्ट होतो. विराट एकेरी दुहेरी धावा काढून धावा वाढविण्यावर भर देतो तर रोहीत आक्रमक फटकेबाजी करून. विराट धावा धावायला जितका गतिमान वाटतो तितका रोहीत नाही. त्यामुळे त्यांच्यात असामंजस्य होऊन दोघातला एक तरी धावबाद होतो. एकूण आठ वेळा त्यांच्यात या प्रकारे धांदल उडाली आहे.
               आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने वनडेत जी तीन द्विशतके ठोकली त्यातील दोन द्विशतका वेळी या जोडीतला कोहली धावबाद झाला आहे.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment