तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे बाप बेटे


             सामाजिक जीवनात अनेक क्षेत्र आहेत जेथे घराणेशाही चालली जाते व बऱ्याच अंशी ती यशस्वीही होते. मात्र क्रिडा हे असे क्षेत्र आहे की जेथे घराणेशाही यशस्वी होईलच याची कुठलीही शाश्वती नाही. त्यातल्या त्यात क्रिकेट तर असे क्षेत्र आहे की, जेथे घराणेशाही चालण्याची पूर्ण हमी कोणी देऊच शकत नाही. क्रिकेट ही अशी बला आहे की येथे ज्याचे नाणे खणखणीतपणे वाजते त्याचीच चलती होते अन्यथा भर मैदानातून चालते व्हायची वेळ येते.
             लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी समस्त क्रिकेट जगताला आपल्या बॅटने व मैदानातील तसेच मैदानाबाहेरील कर्तबगारीने आदर्श घालून दिला मात्र त्यांचा मुलगा रोहन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाणे वाजविण्यात कमजोर ठरला. परिणामत: त्याला आपला गाशा वेळे आधीच गुंडाळावा लागला.
             क्रिकेटचा देव गणला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अनेक विश्वविक्रमासह महापराक्रम केले, मात्र तीच लय सचिनचा मुलगा अर्जुनला न मिळाल्याने त्याची नैय्या अजून वयोगटातील स्पर्धातच गटांगळ्या खात आहे. अर्जुन सध्या ज्या वयाचा आहे त्या वयात सचिन जगभरातील गोलंदाजांच्या काळजाचे तुकडे तुकडे करायचा. शेवटी हा गुणवत्तेचा व नाशिबाचा भाग असतो, येथे मात्र या दोन धुरंधर खेळाडूंचे चिरंजीव कमी पडले हे मात्र नक्की. हे दोन उदाहरणे केवळ नमुना दाखल सांगितले. अशा अजूनही पितापुत्रांच्या जोडया आहेत की त्यांच्यापैकी काही प्रसंगात पित्याची कामगिरी उजवी ठरली काही ठिकाणी मुलांनी बाप से बेटा सवाई हे दाखवून दिले.
                प्रस्तुत लेखात आपण जागतिक कसोटी जगतात शतक ठोकणाऱ्या अकरा पितापुत्रांच्या जोडयांविषयी माहीती जाणून घेणार आहोत.
               भारताचे अमरनाथ हे खऱ्या अर्थाने एक कुटुंब म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये चमकलेच नाही तर विक्रमांच्या पुस्तकात अमर झाले आहेत. लाला अमरनाथ भारताचे पहिले कसोटी शतकवीर ठरले. तर त्यांचा मुलगा सुरींदर व लालाजी स्वतः पदार्पणातच कसोटीत शतक ठोकणारे जगातील एकमेव पितापुत्र ठरले आहे. लालाजींचा मोठा मुलगा मोहींदर अमरनाथनेही कसोटीत अकरा शतके ठोकले आहेत. पिता लाला, पुत्र सुरिंदर, मोहींदर असे एकाच घरातले तीन जण कसोटीत शतक ठोकणारे जगातले पहिले कुटुंब ठरले.
               इंग्लंडचा माजी सलामीवीर व आयसीसीचा विद्यमान सामनाधिकारी असलेल्या ख्रिस ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६ शतके ठोकली तर त्याचा मुलगा स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडचा प्रमुख जलदगती आहे. त्याने इंग्लंडसाठी ४८५ कसोटी बळी घेतले. शिवाय सन २०१० साली पाकिस्तानविरुद्धच्या स्पॉट फिक्सिंग टेस्ट मध्ये १६७ धावांची एक शतकी खेळी साकारली आहे.
               पाकिस्तानचा माजी कर्णधार हनिफ मोहम्मदने त्याच्या कसोटी करिअरमध्ये १२ शतके ठोकली तर त्याचा मुलगा शोएब मोहम्मदने ७ शतके ठोकून आपल्या बापाचे नाव रोशन केले.
               न्यूझिलंडकडून अकरा कसोटीत एक शतक ठोकणाऱ्या वॉल्टर हॅडली यांची पाच पैकी तीन मुले न्यूझिलंडसाठी कसोटी खेळले, मात्र त्यांच्यातील फक्त रिचर्ड हॅडलीलाच कसोटीत शतक ठोकता आले. जगप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडलीने कसोटीत ३१२४ धावा, ४३१ बळी व २ शतके कसोटीत ठोकले.
              इफ्तीखार अली पतौडी व मन्सूर अली खान पतौडी या नवाब पितापुत्रांनीही कसोटीत शतकं ठोकण्याची कामगिरी केली आहे. यात एक विशेष बाब अशी की इफ्तीखार अली पतौडी यांनी स्वातंत्र पूर्व काळात इंग्लंडकडून कसोटी खेळताना पदार्पणातच शतक ( १०२ धावा ) ठोकण्याचा कारनामा केला. नंतर ते भारताकडूनही खेळले, भारताचे नेतृत्वही केले. परंतु भारताकडून खेळताना ते शतक ठोकू शकले नाही. तर त्यांचे चिरंजीव मन्सूर अली खान पतौडी यांनी फक्त भारतासाठी खेळताना सहा कसोटी शतके ठोकली.
                ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जिऑफ मार्शने चार कसोटी शतकं ठोकले. त्याचा मुलगा शॉन मार्श हा सुध्दा ऑस्ट्रेलियासाठी खेळत आहे. शॉन आतापर्यंत दोन कसोटी शतके ठोकण्यात यशस्वी झाला असून तो विद्यमान ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा सदस्य असून त्याला शतकाचा आकडा वाढविण्याची संधी आहे.
               पाकिस्तानच्या पहिल्या कसोटीत सन १९५२-५३ साली लखनौ येथे भारताविरूध्द पदार्पणातच शतक करणाऱ्या मोहम्मद नजरने पाकसाठी ते एकमात्र शतक केले खरे परंतु त्याचा मुलगा मुदस्सर नजरने दहा शतकं ठोकून बापसे बेटा सवाई असल्याचे दाखवून दिले. मुदस्सरने या १० पैकी ६ शतके भारताविरूध्द ठोकले. भारताविरूध्द शतक ठोकणारी ही जगातील एकमात्र पितापुत्रांची जोडी आहे.
              न्यूझिलंडचा माजी कर्णधार व स्टाईलिश फलंदाज केन रूदरफोर्डने तीन कसोटी शतकं ठोकली तर त्याचा मुलगा हामिश एक कसोटी शतक ठोकण्यात यशस्वी झाला.
              भारताचे विजय मांजरेकर ५५ कसोटी खेळले, त्यामध्ये त्यांनी ७ शतके ठोकले. तर त्यांचा मुलगा संजय मांजरेकर भारताकडून ३७ कसोटीत ४ शतके काढू शकला.
              दक्षिण आफ्रिकेकडून नर्स पितापुत्र कसोटी शतकाचे मानकरी ठरले. पिता डेव्ह नर्स याने ४५ कसोटयात एक शतक काढलं तर पुत्र डेडली नर्सने ३४ कसोटयात ९ शतकं काढून बापापेक्षा सरस कामगिरी केली.
                न्यूझिलंडकडून लॅथम पितापुत्रही कसोटीत शतके काढण्यात यशस्वी झाले. पिता रॉड लॅथमने सन १९९२-९३ मध्ये बुलावायो कसोटीत झिंबाब्वेविरूध्द एकमात्र शतक काढले. तर सध्याच्या न्यूझिलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम आतापर्यंत २ शतकं काढण्यात यशस्वी झाला असून त्याची शतकांची संख्या अजून वाढू शकते.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment