तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

एकदिवसीय सामन्यातील कमी वयाचे भारतीय शतकवीर


              भारताकडूनच काय तर कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय संघात प्रवेश मिळविण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते खेळाडूही आपापल्या परीने कष्ट उपसत असतात. त्यातील काही जणांना कमी वयात तर काहींना उशीरा संधी मिळते तर काही जण संधीच्या प्रतिक्षेतच राहातात मात्र ती त्यांना कधी मिळतच नाही.
              जर कमी वयात संधी मिळाली तर तो खेळाडू काही तरी वेगळं करून दाखविण्याचा प्रयत्न करतो. याच प्रयत्नात जे यशस्वी होतात ते थेट विक्रमांच्या पुस्तकात दाखल होतात.
               प्रस्तुत लेखात आपण कमी वयात भारताच्या राष्ट्रीय संघात प्रवेश करून एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणाऱ्या काही अव्वल खेळाडूंविषयी जाणून घेऊ या.
               विनोद कांबळी हा भारताला लाभलेला अतिशय प्रतिभावान असा डावखुरा फलंदाज होता. सचिन तेंडुलकरचाच बालमित्र असलेला विनोद कांबळीनेे वयाच्या २१ व्या वर्षी सन १९९३ मध्ये जयपूर येथे इंग्लंड विरूध्द खेळताना नाबाद १०० धावांची शतकी खेळी साकारली होती. गेली २७ वर्षापासून कांबळीचा हा विक्रम अबाधीत आहे. विनोद कांबळीने आपल्या वागण्यावर जर योग्य नियंत्रण ठेवले असते तर कदाचित सचिन इतकीच त्याचीही कामगिरी प्रभावी ठरली असती.
              भारताचा विद्यमान क्रिकेट कर्णधार विराट कोहली धावा काढण्यात आजमितीला अग्रेसर आहेे. परंतु येथे मात्र कमी वयात वनडेे सामन्यात शतक काढणाऱ्या भारतीयात त्याचा दुसरा क्रमांक लागतो. सन २००८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्याने वनडे पदार्पण केले. परंतु पहिले वनडे शतक काढायला त्याला २१ वर्ष ४९ दिवस लागले. बांगलादेशविरूध्द ९५ चेंडूत ११ चौकारांंसह त्याने नाबाद १०२ करून या क्लबमध्ये स्थान मिळविले.
               एकदिवसीय सामन्यात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज म्हणून तिसरा क्रमांक मिळविला तो युवराजसिंगने. वयाच्या १८ व्या वर्षी सन २००० मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या युवराजने सन २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द २१ वर्ष व १३८ व्या दिवशी शतक ठोकले. त्या खेळीत त्याने ८५ चेेंडत नाबाद १०२ धावा फटकविल्या होत्या.
              सचिन तेंडूलकर भारताकडून सर्वात कमी वयात वनडे पदार्पण करणारा खेळाडू आहे. वयाच्या १६ व्या वर्षीच तो भारताकडून प्रथम खेळला. सुरूवातीच्या काळात तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळायचा. तो फलंदाजीला यायचा तेंव्हा कमी चेंडू शिल्लक राहिलेले असायचे, त्यामुळे त्याला शतक करणं मुश्किल जायचं. मात्र सन १९९४ मध्ये न्यूझिलंड दौऱ्यावर तत्कालीन सलामीवीर तंदुरूस्त नसल्याने सचिनला सलामीला जायची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने तडाखेबाज ८४ धावा फटकविल्या. मात्र या खेळीने आत्मविश्वास उंचावलेेल्या सचिनने २१ वर्ष व १३८ दिवसांचा असताना ११० धावांची खेळी करत त्यावेळी कमी वयात शतक करण्याचा विक्रम स्थापीत केला. पुढे जात त्याचाच मित्र विनोद कांबळीने तो मोडला. त्यानंतर सचिनने मागे वळून पाहिलेच नाही व विक्रमी ४९ शतके ठोकली.
               सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजाने सन २००५ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी वनडे पदार्पण केले. त्याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर तो संघात स्थिरावला. मात्र त्याला पहिलं शतक करायला सन २००८ साले उजेडलेे, तेंव्हा त्याचं वय होतं २१ वर्ष व २११ दिवस. हाँगकाँग विरुद्ध शतक ठोकून तो भारताचा कमी वयात शतक करणारा पाचवा फलंदाज बनला.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment