तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

कोरोना कहर आणि जगभर दरारा... संवाद चालू ठेवून.. संतुलन चांगलं राखू !


 🖋 सुभाष मुळे.....
╰════════╯
अरिष्टाची किंवा संकटाची मुख्यत: तीन रूपं आहेत आणि ती सगळी अक्राळविक्राळ आहेत. ती आरोग्यविषयक, आर्थिक आणि मानसिक अरिष्टं आहेत. यातलं कुठलं अरिष्ट जास्त भयानक आहे, हे सांगणं कठीण आहे. यातल्या पहिल्या दोन अरिष्टांविषयी बरीच चर्चा आजवर झाली आणि अजूनही होतेय. पण मानसिक आरोग्याच्या अरिष्टाविषयी खूपच कमी बोललं गेलंय. पहिल्या दोन अरिष्टांचा मानसिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध असल्यानं त्यांचा आढावा घेणं आवश्यक वाटते आहे. सध्या कोविड-१९ या 'विषाणू' च्या संकटानं सगळ्या विश्वालाच घेरून टाकलंय. चीनमधल्या वुहान शहरात 'कोविड'ची २०१९ च्या अखेरीस पहिल्यांदा ओळख झाली. कोविडचा विषाणू हा वुहानमधल्या बाजारात विक्रीला असलेले साप, वटवाघूळ, पँगोलिन आणि झालेल्या प्राणिसंक्रमणा-पासून झाला आणि मग तो जगभर झपाट्यानं पसरला. यात लाखो लोक संक्रमित झाले आणि मृत्युमुखी पडले. या रोगानं संपूर्ण जगभर दहशत निर्माण केली आहे. या काळात आपल्यातली कौशल्यं वाढवणं, वाचन/लिखाण व व्यायाम करणं, चित्रं काढणं, संगीत ऐकणं, चांगले चित्रपट- विशेषत: हास्यपट- बघणं आणि सतत संवाद चालू ठेवणं हे केलं पाहिजे. यामुळेच आपण आपलं संतुलन चांगलं राखू शकू.
       प्रत्येक साथीच्या वेळी कुणाला तरी दोष देण्याचं प्रमाण जास्त वाढतं, असं आढळून आलं आहे. इबोलाच्या वेळी याचा प्रादुर्भाव आफ्रिकन वंशाच्या लोकांमुळे झाला, असं बोललं गेलं. फ्लूच्या साथीच्या वेळी मेक्सिकन आणि स्थलांतरित कामगारांना लक्ष्य बनवण्यात आलं होतं. एन्फ्लूएंझाच्या साथीच्या वेळी आशियाई देशांवर खापर फोडलं गेलं हेातं. रोगाबद्दल नीटशी कल्पना कोणालाच नसल्यानं अफवांना ऊत आला. यात वुहानमधल्या लोकांना- म्हणजेच चिनी लोकांना दोषी धरलं गेलं आणि प्रसारमाध्यमांनी देखील ‘चीनचा विषाणू’ आणि ‘न्यू यलो धोका’ असे शब्द वापरायला सुरुवात केली. त्यातूनच चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी भूमिकेमुळे सध्या जगभर चीनविरोधी भूमिका प्रचंड वाढीला लागलीय. जगभरात १३ जुलैपर्यंत कोविड-१९ च्या १ कोटी ३० लाख ३९ हजार ५३ केसेस आहेत आणि त्यात आजपर्यंत ५७१६५९ मृत्यू झाले आहेत. यामध्ये अमेरिका आणि ब्राझील यांच्या खालोखाल आता भारताचा तिसरा क्रमांक लागतो आहे. अमेरिकेतील एमआयटीमधल्या स्लोन स्कूलच्या एका धक्कादायक अभ्यासानुसार, जगात प्रत्यक्ष केसेस १२ पट आणि प्रत्यक्ष मृत्यू दीडपट असले पाहिजेत. पण अधिकृत आकडेवारीनुसार, आज भारतात नऊ लाखांकडे केसेसची घौडदौड सुरू आहे. तसंच २३१८७ लोकांचे मृत्यू झाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात २५४४२७ केसेस झाल्या आहेत आणि १०२८९ लोक मृत्यू पावले आहेत. त्यात मुंबईमध्येच महाराष्ट्राच्या साधारणपणे २५ ते ३० टक्के केसेस आहेत. ग्लोबल हेल्थचे प्रोफेसर आणि हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आशिश झा यांच्या मतानुसार, भारतात खऱ्या केसेस दररोज ५० हजार इतक्या आहेत आणि ऑगस्ट महिन्यांत हा आकडा दररोज दोन लाखांवर जाईल. कोविडवर लस किंवा औषधं निघाली नाहीत, तर भारतात एकूण २० कोटी लोकांना कोविड-१९ ची लागण होईल. यात दोन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. हे चित्र प्रचंड भयानक आहे. याचं कारण भारताची आरोग्यव्यवस्था याला तोंड देण्याच्या अवस्थेत मुळीच नाही. सध्याच शेकडो लोकांना साधी कोविडची टेस्टही सहजरीत्या करून घेता येत नाहीये, तर आज बेड उपलब्ध होण्यासाठी अनेक हॉस्पिटल्सच्या वारंवार चकरा माराव्या लागताहेत. त्यातच अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागतंय.
      या सगळ्यांची अनेक कारणं आहेत. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, आपली पहिल्यापासून अतिशय कमकुवत असलेली आरोग्यव्यवस्था. जिथे आपण आरोग्यव्यवस्थेवर जीडीपीच्या ५ टक्के खर्च करायला पाहिजेत, तिथे अनेक दशकं फक्त १ ते १.५ टक्का करत आहोत.  त्यामुळे एकूणच हॉस्पिटल्स, बेड्‌स, आयसीयूज, इतर उपकरणं, ॲम्ब्युलन्सेस, डॉक्टर्स आणि नर्सेस यांचा आपल्याकडे कोरोनाच्या आधीपासूनच प्रचंड तुटवडा आहे. आता तर विचारायलाच नको ! त्यामुळे जेव्हा हे आकडे वाढतील, तेव्हा काय अवस्था होईल, याची फक्त कल्पनाच केलेली बरी ! आरोग्य व्यवस्थे प्रमाणेच आपली अर्थव्यवस्थाही प्रचंडच भयानक अशा अरिष्टातून जातेय. कोरोनाच्या अगोदरच आपल्या जीडीपीवाढीचा दर अधिकृतरीत्या ४.५ टक्के असला, तरी तो खरा २ टक्के एवढाच आहे.. असं अरविंद सुब्रह्मण्यम यांचं म्हणणं आहे आणि तो ० टक्का किंवा त्याहीपेक्षा कमी होता, असं जेएनयूचे अरुणकुमार यांचं मत होतं. आता तर कोविडनंतर तो १२ टक्के आणखीन घसरणार आहे. या काळात बडे उद्योग तर गुंतवणूक करायला तयारच नाहीत. लाखो लघु व मध्यम उद्योग बंद पडले आहेत आणि त्यात काम करणारे कोट्यवधी स्थलांतरित कामगार भीषण अवस्थेत आपापल्या गावी पोहोचलेत. यातूनच प्रचंड प्रमाणात बेकारी वाढलीय. कोविडच्या अगोदर ती ८.१ टक्के झाली होती आणि ती गेल्या ४५ वर्षांतली सगळ्यात जास्त होती. आता तर ती ११ ते १२ टक्क्यांवर गेली आहे आणि तरुणांमध्ये तर ती याच्या अनेकपट आहे ! त्यातच १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या कोविडमुळे गेल्या आहेत. अर्थव्यवस्था पुन्हा थोडीफार सुरू झाल्यावर दोन कोटी लोकांना पुन्हा नोकऱ्या मिळाल्या, म्हणजे एकूण १० कोटी नोकऱ्या गेल्या ! याचबरोबर अर्धबेकारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, २० ते ३० वर्षांच्या कोट्यवधी तरुणांना पुढली १-२ वर्षं नोकरी मिळणंच कठीण होणार आहे. हे आपल्याला फक्त आकडे वाटतील, पण त्यामागचं वास्तव प्रचंड भयानक आहे. 
        शेतीतही नोकऱ्यांची बोंबाबोंबच आहे. मनरेगाच्या कामाचे खरं तर दर वर्षी १०० ऐवजी २०० दिवस करायला हवेत, तर आज १०० तर सोडाच, वर्षाचे ५० दिवसही काम मिळवण्याची मारामार आहे. यामुळे कोट्यवधी लोकांच्या समोर गरिबी आणि भूक उभी ठाकली आहे ! कित्येक मध्यमवर्गीय माणसंही भाजी विकण्यापासून काहीही उद्योग करायला तयार होतायेत, पण तेही चालत नाहीयत. कनिष्ठ किंवा मध्यमवर्गातल्या काहींवर जर उद्या चक्क भीक मागायची वेळ आली, तर त्याचे आश्चर्य वाटू नये. त्यातून कोविड आणि इतर आजारपणामुळे कोट्यवधींचे पैसे संपून जाताहेत आणि ते कर्जबाजारी होतायत. त्यातून ज्येष्ठ नागरिक, कॅन्सर-हृदयविकार- पॅरेलिसिस- अल्झायमर यांचे रुग्ण, अपंग, नेत्रहीन, कर्णबधिर व ऑटिस्टिक, गतिमंद, स्किझोफ्रेनिक, टर्मिनली आजारी रुग्ण अशा कोट्यवधींची- विशेषत: या काळात- अवस्था विचारायलाच नको! याचं कारण अशांची सेवा करण्यासाठी त्यांच्या जवळ जाणंही अशक्य होऊन बसलंय. कोविडनंतर शिक्षणावर जे अरिष्ट आलंय, त्यानं तर झोपच उडवलीय. अगोदरच आपली शिक्षणव्यवस्था अत्यंत भयानक अवस्थेत आहे. कोविडच्या या काळात आता सगळंच शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे प्रश्न खूपच वाढले आहेत. याचं कारण इंटरनेट, स्मार्ट फोन्स आणि चांगली बँडविड्‌थ असणं, तसंच ऑनलाईन शिक्षणाची सवय असणं हे फक्त वरच्या १५ ते २० टक्के लोकांनाच शक्य असतं. खालच्या ८५ ते ८० टक्के लोकांना ते आपल्या मुलांना उपलब्ध करून देणं मुळीच शक्य नाहीये. ग्रामीण भागातली परिस्थिती तर विचारूच नका. त्यामुळे मुलांवर आणि पालकांवर अशा शिक्षणाचा प्रचंड ताण वाढतोय. त्याचाही त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय. यातून परत त्यांच्यात नैराश्य वाढतंय. त्याचबरोबर हसण्या-खेळण्याच्या वयात कोट्यवधी मुलं आपापल्या घरात कोंडलेली आहेत. त्यांना मित्रांना भेटताही येत नाहीये. या गळ्यांचा त्यांच्या मानसिकतेवर खूप दूरगामी परिणाम होणार असल्याचं अनेक तज्ज्ञ म्हणतात. त्याचप्रमाणे हजारो/लाखो शिक्षकांना (विशेषत: खासगी संस्थेमध्ये काम करणाऱ्यांना) पगारच मिळत नाहीयेत आणि मिळाला तर तो खूपच कमी मिळतोय. खासगी क्लासेस घेणाऱ्यांचं तर कामच ठप्प झालंय. क्लासेससाठी भाड्याच्या इमारती, वेगवेगळे विषय शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांचे पगार- असे खर्च कुठून करायचे, या विवंचनेत ते आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांमध्ये आत्महत्येचं आणि नैराश्याचं प्रमाण वेगानं वाढतंय. कोरोनामुळे आता आर्थिक अस्थिरतेचा खूप मोठा धोका देशांना असणार आहे आणि तो दीर्घ काळ टिकणारा आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे जी महामंदी ओढवत आहे या काळात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या चिंतेच्या वातावरणात रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याचा संभव असतो, असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. कोरोनाआधीचा काळ, कोरोनात व्यतीत केलेला काळ व कोरोनानंतरचा काळ यात माणसाच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाले आणि होणार आहेत याची डॉक्टरांना विशेष काळजी वाटते आहे. अचानक कोसळलेल्या या आपत्तीमुळे सर्वसामान्य माणसाचं जगणंच उद्‌ध्वस्त झालं आहे. या आपत्तीमुळे कोणीही कोणाला आधार देण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. मार्च महिन्यापासून या साथीनं संपूर्ण जगात भीतीचं सावट निर्माण केलं आणि मृत्यूच्या बातम्या व मृत्यूनंतर त्या देहांची झालेली विटंबना पाहून लोकांच्या जिवाचा थरकाप उडाला. आर्थिक अरिष्टाच्या आक्रमणाबरोबरच चिंतेनं, भीतीनं आणि नैराश्यानं सर्वसामान्यांचं मन पोखरून निघालं. यातूनच मग आत्महत्येचा सिलसिला सुरू झाला. मानानं जगता येत नसेल तर कुटुंबासह हे जगच सोडून जावं- हा विचार मोठ्या प्रमाणात बळावायला लागला.
     संयुक्त राष्ट्र संघानं असं आवाहन केलं आहे की, साथीच्या रोगांशी सामना करताना मानसिक आरोग्याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. या काळात तणाव, दु:ख आणि चिंता यांचा एकत्रित परिणाम होतो. या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, तर कुटुंबच नव्हे तर अख्ख्या समाजावर त्याचे दूरगामी परिणाम होतील. दि.८ मे २०२० रोजी अमेरिकेतले क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट जोनाथन पोर्टेयस यांनी म्हटलं की, सध्या संपूर्ण समाज एका सामूहिक आघाताच्या परिस्थितीतून जात आहे. या काळात पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचं (पीटीएसडी) प्रमाण वाढेल. या सगळ्या काळात माणसाचं एकटेपण वाढू शकतं. कॅन्सर फॅमिली फाउंडेशनच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून निम्म्याहून अधिक, म्हणजे जवळजवळ ५६ टक्के अमेरिकन लोकांनी कॅन्सरमुळे चिंता आणि तणाव वाढून आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. इतरही अनेकांनी खाण्यापिण्याच्या समस्या, दारू पिणं, डोकेदुखी किंवा पोटदुखी वारंवार उद्‌भवणं अशा अनेक समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं. यातच आरोग्यसेवा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातल्या ६४ टक्के लोकांनी आपलं मानसिक आरोग्य बिघडल्याचं सांगितलं. वेल बिल ट्रस्टनं प्रसिद्घ केलेल्या एका अहवालात असं म्हटलं आहे की, कोरोनाच्या साथीमुळे ड्रग्ज आणि दारू यांचं प्रमाण वाढलेलं आहे; तसंच आत्महत्येच्या विचारानं बहुतांश लोकांमध्ये नैराश्याची भावना घर करते आहे. या आपत्तीमधून बाहेर येण्यासाठी सामाजिक आधाराची सर्वांत जास्त गरज आहे. समुपदेशकांना येणाऱ्या कॉल्सवरून लोकांमध्ये भावनिक संकटाची लाटच आल्याचं जाणवतंय. फोनवर बोलणारे, आपल्या समस्यांवर उपाय शोधू पाहणारे अनेक जण आपल्या आरोग्याची भीती, नोकरीवर आलेली गदा, नातेसंबंधांत वाढलेली दरी, वाढतं एकाकीपण यावर बोलताहेत. हॉटलाईन चालवणाऱ्या वेलस्पेस हेल्थच्या सीईओनं फेबुवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या काळात सॅक्रामेंटो संकटरेषेवरच्या कॉल्समध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं. एप्रिलमध्ये हेच कॉल ५८ टक्क्यांनी वाढले होते. येणाऱ्या ८० ते ८५ टक्के कॉल्समध्ये लोक कोविडबद्दलच बोलत असल्याचं लक्षात आलंय. लक्षणं काय, सुरक्षित चाचणी कुठे करता येईल, हे जाणून घेण्याचं प्रमाण या लोकांमध्ये जास्त आहे. तसंच आपल्या घरातील कुठली व्यक्ती ॲडमिट झाली, तर तिच्या खाण्या-पिण्यापासून अनेक गोष्टींची चिंता त्यांना सतावत आहे. भारतात अमेरिकेच्या मानानं खूपच कमी हेल्पलाइन्स आहेत. पण प्रत्यक्षातली परिस्थिती अमेरिकेपेक्षाही भयानक आहे. कारण भारतात तर अमेरिकेच्या मानानं आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था खूपच चिंताजनक आहे. भारतात तरुणांचं प्रमाण जास्त आहे. केवळ या एका गोष्टीमुळे भारतात मृत्यूचं प्रमाण सध्या तरी कमी आह; पण तोही आकडा पुढे वाढत जाईल, अशी भीती सगळ्यांच्या मनात आहे. एवढं असूनही भारतात लोक बोलत नाहीयेत आणि मूकपणे सहन करताहेत, हे जास्तच वाईट आहे. लॅन्सेटच्या अलीकडच्या आकडेवारीप्रमाणे भारतात दरवर्षी जवळजवळ २.२५ लाख  लोक आत्महत्या करतात. म्हणजे दर २.५ मिनिटाला एक. हा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या १४ पट आहे, तरीही आपण त्याकडे लक्ष देत नाही. यामध्ये तरुणांच्या आत्महत्या जवळजवळ दरवर्षी एक लाख आहेत हे महाभयंकर आहे, हे तर कोरोनाच्या अगोदरचे चित्र आहे.  कोरोनानंतर फक्त नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत १२० आत्महत्या झाल्या आहेत. म्हणजे एकूण भारतात याच दरानं विचार केला, तर गेल्या तीन महिन्यांतला हा आकडा ३५००० च्या आसपास असण्याची शक्यता असेल आणि या फक्त रिपोर्ट झालेल्या केसेस असून, प्रत्यक्षात यापेक्षा संख्या खूप जास्त असण्याची शक्यता आहे. जेव्हा एक व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा सुमारे ४० ते ४५ लोक आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत जाऊन परत आलेले असतात. शिवाय लाखो शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या वेगळ्याच. म्हणजे आपण नैराश्य आणि आत्महत्या अशा प्रचंड अरिष्टांशीही सामना करतोय. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात कोरोना व्हायरसमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक विकारांचा इशारा देण्यात आला आहे. त्याप्रमाणेच सामूहिक हिंसा, हल्ले, गोळीबार, गृहकलह, घरगुती हिंसा, व्यसनाधीनता, प्रचंड भीती (फोबिया), अनावर राग, चिडचिड, भांडणं, चिंता यांचं प्रमाण वाढलंय. यातून नैराश्य आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) हे प्रकार वाढू शकतात. सन २००८ मध्ये आलेल्या वादळानंतर ५ टक्के लोकांना तीव्र नैराश्यानं ग्रासलं होतं. तसंच ९/११ च्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्क शहरातल्या १० पैकी १ प्रौढाला नैराश्यानं ग्रासलं होतं. आता तर हे प्रमाण जगभर खूपच वाढलेलं दिसतंय. वाढता चंगळवाद, विषमता, बेकारी, अस्थिरता, खालावलेलं कामाचं स्वरूप यामुळे गेल्या ३० वर्षांत नैराश्य आणि चिंता यांचं प्रमाण खूपच वाढलं होतं. सन २०२५ पर्यंत २० ते २५ टक्के लोकांना नैराश्यानं ग्रासलेलं असेल, असं अनेक जागतिक तज्ज्ञ म्हणत होते. आता कोविडनंतर हे प्रमाण आणखीनच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोविड टेस्टिंगबाबतीतली साशंकता, उपचारांविषयीचा संभ्रम, पीपीई आणि इतर वैद्यकीय सुविधा यांचा तुटवडा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा कामाचा अतिरिक्त ताण, आजाराचा संसर्ग होण्याची भीती- या गोष्टी भीती वाढवताहेत. कोरोनाबाबतची सर्वच बाबतींतली ही भीती कमी होण्यासाठी प्रत्येक देशातल्या सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजेत. प्रसारमाध्यमांचा उपयोग करून मानसिक आरोग्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, याबाबत उपाय केले पाहिजेत. एकटेपण दूर करण्यासाठी किंवा सामाजिक दुरावा दूर करण्यासाठी नियमित संवादाची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण सर्व एक आहोत, ही भावना वाढीला लावून त्यानुसार कृतीची गरज आहे. आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत, हे खरंय; पण समजा- उदास वाटत असेल किंवा चिंता वाढली असेल, तर आपले मित्र-मैत्रिणी, शेजारी व नातेवाईक यांच्याशी सतत बोललं पाहिजे. वातावरण आनंदी ठेवलं पाहिजे. त्यातूनही नैराश्य वाढलंच, तर समुपदेशकाबरोबर बोलावं किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. ‘त्यांच्याशी फक्त वेडेच बोलतात’ अशी (गैर)समजूत पूर्णपणे गेली पाहिजे. या काळात आपल्यातली कौशल्यं वाढवणं, वाचन/लिखाण व व्यायाम करणं, चित्रं काढणं, संगीत ऐकणं, चांगले चित्रपट- विशेषत: हास्यपट- बघणं आणि सतत संवाद चालू ठेवणं हे केलं पाहिजे. यामुळेच आपण आपलं संतुलन चांगलं राखू शकू. आज संयम ठेवून जात-धर्म, पंथ, पक्ष, गरीब-श्रीमंत असे सगळे भेद विसरून एकत्र येण्याची, एकमेकांना समजून घेत मदत करण्याची गरज आहे. कारण कोरोना काही आपल्या आयुष्यात कायम नसेल. आपण त्याच्यावर मात करूच आणि कोरोनाचं संकट दूर झाल्यावर आपलं आयुष्य पुन्हा संयमितपणे व सुरळीतपणे सुरू करू शकू, हे मात्र नक्की ! गरज आहे आज लढण्याची ! सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे आजचा दिवस जाईल आणि पुन्हा नव्याने आपला दिवस येईल.

╭══════════════╮
   सुभाष मुळे, गेवराई 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
       ╰══════════════╯

No comments:

Post a comment