तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

कोरोनाच्या काळात साहित्यसंपदा तर्फे ‍१२१ तासांच्या कवितांचा विश्वविक्रममुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोरोनाच्या काळात नैराश्येचे मळभ मनावर दाटलेले असताना, ताणतणाव समाजात वाढत असताना, साहित्यसंपदा तर्फे फेसबूक लाईव्ह विश्वविक्रमी काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १७ जुलै ते २२ जुलै २०२० दरम्यान पार पडलेल्या ह्या संमेलनास जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळून एक आशेचे आणि सकारत्मतेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. साहित्यसंपदा आयोजित विश्वविक्रमी काव्यसंमेलनाचा सांगता सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला. अखंड १२१ तास चाललेल्या ह्या काव्यसंमेलनाची दखल डायमंड बुक ऑफ रेकॉर्डस् ह्यांनी विश्वविक्रम नोंदवहीत केली आहे. संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि गझलकार अे. के शेख ह्यांनी विश्वविक्रमी काव्यसंमेलनात सहभागी सदस्यांचे अभिनंदन करताना माणसाजवळ ध्येयासक्ती असली की कोणतेही कार्य सहज शक्य होते असे मत मांडले. कवी हा संवेदनशील असून, आज समाजास संवेदनशील माणसांची गरज आहे असे सांगून उपस्थित साहित्यिकांना मार्गदर्शन केले. जेष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर ह्यांनी ज्ञान भांडार वाढवा, जेष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचा, ते पुढील पिढीसाठी संग्रही ठेवा, असा सल्ला दिला. आपले साहित्य स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजासमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी नवोदितांना केले.
जेष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे ह्यांनी केशवसुतांनी आधुनिक कवितेची रुजवात केली होती आणि आता तीच कविता सर्वसामान्यांपर्यंत पोहचली असल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांनी आपल्या ऋतू येत आहे पुन्हा पावसाचा या कवितेतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. लवकरच ह्या कोरोनाचा प्रभाव कमी होणार असा सकारात्मक विचार व्यक्त केला. साहित्यिक, पत्रकार, निवेदक व रिलायन्सचे संपर्क अधिकारी रमेश धनावडे ह्यांनी साहित्यसंपदा समूहाच्या लॉकडाऊनच्या काळात राबविलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ह्या काव्यसंमेलनातून लोकांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहचला असे मत व्यक्त केले. दर्जेदार कविता सादर करून साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन देखील करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. योगेश जोशी ह्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित झाल्याची घोषणा केल्यानंतर सर्व सदस्यांना अश्रू आवरणे कठीण गेले. समाजामध्ये साहित्यातून समाजसेवा करता येऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा उपक्रम होता असे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर ह्यांनी साहित्यसंपदाच्या कार्याचा दाखला देताना समूहाच्या कार्यपद्धतीचे कौतूक केले. सदर उपक्रम राबवताना घेण्यात आलेल्या कष्टांची तोंड ओळख त्यांनी आपल्या भाषणातून करून दिली. विश्वविक्रमी काव्यसंमेलनाचे संकल्पना निर्माते आणि समन्वयक कैलास नाईक ह्यांना  अहोरात्र केलेल्या मेहनतीचे वर्णन करताना आनंदाश्रू सांभाळणे कठीण गेले. आभारप्रदर्शन समूह संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी करताना संमेलन अध्यक्ष, प्रमुख निमंत्रित, मार्गदर्शक ह्यांचे आभार मानले. उपक्रमातील  सदस्यांचे अभिनंदन करताना आयोजन समितील सदस्य, विविध समूहांचे संस्थापक, प्रशासक आणि सहभागी सदस्यांचे आभार मानताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.  विश्वविक्रमाची नोंद झालेल्या  काव्यसंमेलनाचा समारोप सोहळा देखील स्वप्नपूर्तीचे आनंदाश्रू आणून डोळ्यांत आसू आणि ओठांवर हसू आणून तन मन रोमांचित करणारा ठरला.
संमेलनामध्ये अनेक नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्या अंतर्गत राजन लाखे, विश्वस्त आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ह्यांनी आपल्या मार्गदर्शनातून कवींना प्रतिभेची ओळख करून दिली. जेष्ठ पत्रकार गझलकार दुर्गेश सोनार, साहित्यिक तसेच नाट्य कलावंत अभय पैर, साहित्यिका, निवेदिका, मुलाखतकार तसेच अभिनेत्री पुजा काळे, साहित्यिका मानसी चिटणीस, कवी पत्रकार अनुज केसरकर, ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य ह्यांनी नवोदित  कवींनी लिहताना कोणती काळजी घ्यावी हे सांगताना आपल्या कविता सुद्धा सादर केल्या. कविता बालंखे, अनिता गुजर, राजश्री बोहरा, गझलकार समीर शेख, वैभव चौगुले, जीविता पाटील, दिलीप मोकल, मानसी नेवगी, रश्मी मयेकर, मनीषा रायजादे, अनिता कळसकर, जगदीश संसारे, मेघना राजे, माधुरी चौधरी, गुंजन श्रीवास्तव, दर्शना क्षीरसागर, श्रेयस रोडे, जुई अतितकर, सुवर्ण कांबळे, सविता कदम, वैशाली जाधव, किसान पेडणेकर आदी निमंत्रित साहित्यिकांनी सदर संमेलनामध्ये आपल्या रचना सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कविता जगायला बळ देतात, हे कोरोना काळात अविरत सेवा देणारे कोरोना योद्धा संजय पाटील ह्यांनी मध्यरात्री आपल्या कविता सादर करून दाखवून दिले. ग्रामीण भाषेतील कवी लालसिंग वैराट ह्यांनी बोलीभाषेची गोडवी लोकांपर्यंत पोहचवली. वय ही फक्त एक संख्या असते हे १० वर्षाच्या बाल कवयित्री अनोमा मालसमींदर आणि ९२ वर्षीय कवयित्री लक्ष्मीबाई जुगधार ह्यांनी दाखवून दिले. तर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कवितांच्या संगतीने सोबतीने शाररिक व्याधींवर मात करता येते हे दिवाकर वैशंपायन ह्यांनी आपल्या उदाहरणातून पटवून दिले. बडोदा, बंगलोर, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली राज्यातील साहित्यिकांनी सदर संमेलनात आपल्या रचना सादर केल्या. विशेष नोंद घेण्यासारखे म्हणजे विकलांगांचा असलेला सहभाग प्रेरणादायी ठरला. केवळ भारतातूनच नव्हे तर दुबई, अमेरिका, सिंगापूर, मॉरिशस, मलेशिया आदी देशांमधील मराठी साहित्यिकांनी सहभाग घेतला.
बोलीभाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न समाजासमोर मांडला जात असताना पोवारी भाषेतील साहित्यिकांनी विशेष सदरात आपल्या कविता सादर केल्या. अहिरणी, खान्देशी, आगरी, कोकणी, मालवणी आणि इतर भाषांमधील साहित्यिकांनी सुद्धा बोलीभाषेत कविता सादर करून बोलीभाषेच्या सेवे करता आपले योगदान दिले.
पल्लवी पतंगे, कैलास नाईक ह्यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.  संमेलनाच्या आयोजन समितीमध्ये  श्रुती कुलकर्णी, सीमा पाटील, अप्पा वाघमारे, स्मिता हर्डीकर, सई मराठे, रवींद्र सोनावणे, वैशाली माळी, स्वप्नाली ढोणुक्षे, श्रीकांत पेटकर, ऋचा नीलिमा, सोनाली शेडे, उत्तम चोरडे, वैशाली झोपे, डॉ. शिवकुमार पवार, डॉ. सुवर्ण पाटील, सलोनी बोरकर ह्यांनी मोलाचे योगदान दिले.
सदर सोहळ्या दरम्यान समूह अध्यक्षा नमिता जोशी, समूह प्रशासक समिती अपेक्षा बिडकर, रसिका लोके, प्रतीक धनावडे, स्मित शिवदास ह्यांनी सहभागी सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागताध्यक्षा वैशाली कदम ह्यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. संमेलनास मीडिया पार्टनर म्हणून मनोमय मीडिया, हेमंत नेहते यांच्या जीएम न्युज तसेच सुरज भोईर यांच्या मी भारतीय न्यूज ह्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली . संमेलनास डॉ. योगेश जोशी आणि साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गुरुदत्त वाकदेकर ह्यांचे मार्गदर्शन लाभले. संमेलनाचा सांगता सोहळा मनामनाला हात घालणारा ठरला असून त्याचे नियोजन सुरेंद्र बालंखे, आरुषी दाते, कल्पना देशमुख ह्यांनी केले. संध्या शिंदे, रसिका डोंगरे, शारदा खेडकर, प्रथमेश कासार, चित्रलेखा पाटील, नीता आंधळे, संध्या महाजन, अमृता देखणे, निशा राऊत, श्रीनिवास गडकरी, संध्या जोशी, रमा जाधव, प्राची कर्वे, स्वरा पतंगे, वर्षा रहांगडाले, रंजना हंबर्डे, अर्चना कुलकर्णी, सीमा हरकरे, सुचित्रा पवार, दिलीप मोकल ह्यांनी आपल्या रचना सादर करून सोहळ्याची शान वाढवली. समूहातर्फे लवकरच कथा महोत्सवाचे आयोजन आणि मराठी संस्कृती, बोलीभाषा संवर्धनासाठी साहित्याच्या माध्यमातून चळवळ सुरु करण्यात येईल असे समूह प्रवक्ते मंजुळ चौधरी ह्यांनी जाहीर केले. कोरोना काळामध्ये सामाजिक उपक्रमांस मर्यादा असताना फेसबूक  लाईव्हच्या माध्यमातून पार पाडलेले विश्वविक्रमी काव्यसंमेलन मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार ह्या सोबतच समाजात साकारात्मता निर्माण करणारा आहे. सद्य परिस्थितीत साहित्य चळवळीला बळ देणाऱ्या अश्या उपक्रमांच्या माध्यमांतून समाजा मधील ताणतणाव कमी करणारा ठरला आहे, अशी साहित्य विश्वात चर्चा होत आहे.

No comments:

Post a comment