तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

कसोटीत अकराव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


                  क्रिकेट हा मुळातच फलंदाजांशी केंद्रीभूत खेळ आहे. फलंदाज अव्वल दर्जाचा असो की तळाकडचा त्याला संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करावीच लागते. पहिल्या फळीतील फलंदाज जर अपयशी ठरले तर सगळ्यांच्या नजरा शेपटाकडील फलंदाजांकडे जातात. खालच्या क्रमांकावर विशेषज्ञ गोलंदाज फलंदाजी करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवणे योग्य नसतं. तरीही काही गोलंदाज शेवटच्या फळीत खेळूनही आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात.                 संघातील खास गोलंदाज आपल्या गोलंदाजीने संघाला नेहमी मदत करतात परंतु संघाच्या बिकट प्रसंगी त्यांनाही धीरोदात्त पणे खेळपट्टीवर उभे राहून फलंदाजी करून आपले कर्तव्य पार पाडावे लागते. आपल्या नैसर्गिक कुवतीपेक्षाही त्यांना फलंदाज म्हणून आपली योग्यता सिध्द करावी लागते.
             कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज व गोलंदाज या दोघांचाही कस लागतो. कसोटीमध्ये गोलंदाज फलंदाजांच्या तंत्राची परिक्षा घेतात तर फलंदाज गोलंदाजांच्या कौशल्याची ! त्यामुळेच कसोटी क्रिकेट हे वनडे व टि २० च्या तुलनेत अवघड मानले जाते. कसोटीत फलंदाज शतक, द्विशतक, त्रिशतक करून आपली गुणवत्ता दाखवितात तर गोलंदाज जास्तीत जास्त बळी मिळवून आपले कसब पणाला लावतात.
             भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक बळी घेतले आहेत. सर्व साधारणपणे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची व जास्तीत जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांचीच वाहवा केली जाते. मात्र तळाकडच्या फलंदाजांचे कौतुक अभावानेच केले जाते. सदर लेखात आपण तळाच्या म्हणजे अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची माहिती जाणून घेऊ या.
             श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन एक गोलंदाज म्हणून परिचित असून कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम त्याच्याच नावे आहे. एवढेच नाही तर एक फलंदाज म्हणून अकराव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा बनविण्याचा विश्वविकमही मुरलीच्याच नावे आहे. मुरलीने त्याच्या कारकिर्दीत विविध क्रमांकावर खेळून एकूण १२६१ धावा जमविल्या असल्या तरी ११ व्या क्रमांकावर तो ९९ डाव खेळला आहे, त्यात त्याने  सर्वाधिक ६२३ धावा काढल्या आहेत.
               एका संघाच्या शेवटच्या क्रमांकाच्या फलंदाजाने कसोटीत सर्वाधिक धावा काढण्यात दुसरा नंबर पटकविला आहे ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ याने. ग्लेन कसोटीत ११ व्या क्रमांकावर १२८ डाव खेळला, त्यात ६०३ धावा जमविल्या. एकंदर विविध क्रमांकावर खेळून १३८ डावात ६४१ धावा त्याच्या नावे जमा आहेत.                           वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज व माजी कर्णधार कोर्टनी वॉल्श या क्लबमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. कसोटीत ५१९ बळी घेणाऱ्या वॉल्शने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १८५ डावात वेगवेगळ्या क्रमांकावर खेळत ९३६ धावा काढल्या. कसोटीत ११ व्या क्रमांकावर खेळताना ५५३ धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या असून त्या त्याला तिसऱ्या स्थानी बसवून गेल्या.
               इंग्लंडचा माजी कर्णधार व तेजगती गोलंदाज बॉब विलिसचा देखील या क्लबमध्ये समावेश आहे. कसोटीत ३२५ बळी नावे असलेला विलिस त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत वेगवेगळ्या क्रमांकावर मिळून १२८ डाव खेळला त्यात त्याने एकूण ८४० धावा काढल्या. परंतु ११ व्या क्रमांकावर ७८ डावात ४५२ धावा ठोकून या क्लबमध्ये चौथे स्थान मिळविले.
              इंग्लंडच्या विद्यमान कसोटी संघातील वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजात चौथ्या स्थानी असून ५७४ बळी त्याच्या नावावर आहेत. अँडरसन  त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या क्रमांकावर २१२ डाव खेळला, त्यामध्ये ११८५ धावा त्याने जमविल्या तर ११ व्या क्रमांकावर ३७४ धावा फटकवून तो या क्लबमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment