तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 July 2020

अण्णाभाऊ साठेंची लेखणी, ही मुक्या वंचितांचा हुंकार (भिमराव परघरमोल)


              सन १९२० साल हे अनेकांगाने ऐतिहासिक ठरलेले आहे. कारण त्या वर्षामध्ये घडलेल्या घटनांनी भांडवलशाही व  ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या पाठीवर ओढलेल्या आसुडांच्या व्रणांना आज परिपूर्ण एक शतक होत आहे. ते आसुडांचे व्रण  आजही ताजे आणि स्पष्ट दिसतात. ते तमाम बहुजन समाजाला लढण्याची नी जगण्याची प्रेरणा देतात. ते आसुड म्हणजे ३१ जानेवारी १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तोंड असूनही मुक्या  असणाऱ्या समाजाच्या वतीने बोलण्यासाठी  मूकनायक या वृत्तपत्राची केलेली सुरुवात. २१,२२ मार्च १९२० ला ऐतिहासिक माणगाव परिषद भरली होती. त्या परिषदेच्या विचारपीठावरून बोलताना राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचे अखिल भारतीय नेते घोषित करून, तेच पुढे देशाचे नेतृत्व करतील असे भाकीत वर्तविले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना छत्रपती  राजर्षी शाहूंचा जन्मदिवस हा दिवाळी सणा प्रमाणे साजरा करण्याचे आवाहन समाजाला केले होते. अस्पृश्यता हा आमच्या देहावरील कलंक आहे त्याच्या निवारणार्थ ३० मे १९२० रोजी नागपूरला भरलेल्या परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षी शाहूंनी भूषवून त्यामध्ये बरेच निर्णय घेण्यात आले होते.त्याच प्रमाणे १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म व टिळकांचा मृत्यू या घटनांची नोंद घेणे सुद्धा इतिहासाला क्रमप्राप्त ठरले. 
           यावर्षी २०२० ला वरील सर्व घटनांचा शतकपूर्ती महोत्सव आहे. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
          अण्णाभाऊ साठे यांचा जन्म पिढ्यानपिढ्या अनेकांगाने शोषणाला बळी पडलेल्या अस्पृश्य जातींपैकी ' मांग ' जातीत झाला होता. घरात पाचवीला पुजलेले अठराविश्वे दारिद्र्य होते. घरात कोणीही शिक्षित नव्हते. परंतु तरीही आपला मुलगा शिकला पाहिजे ही अपेक्षा ठेवणाऱ्या अनेक मायबापांप्रमाणे  अण्णाभाऊंच्या मायबापांनी त्यांना शाळेत घातले. परंतु दुर्दैव हे कि, ते फक्त दिड दिवसच शाळेत जाऊ शकले. कारण त्यावेळी शाळेमध्ये पंतोजिची (शिक्षक) मनमानी  असायची. शूद्रातिशूद्रांच्या  मुलांनी शिकू नये, अशी त्यांची मनोकामना असायची. परंतु देशात  इंग्रजी शासन व  शिक्षण सर्वांसाठी खुले असल्यामुळे पंतोजी (शिक्षक) कोणालाही  नकार देवू शकत नव्हते. परंतु  शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे अनेक मार्ग त्यांना आत्मसात होते. म्हणून त्यांनी समाजामध्ये एका म्हणीचा प्रचार करून भ्रम निर्माण करण्याचे कपटी कार्य केले होते. ते म्हणजे
   *छडी लागे छमछम*
   *विद्या येई घमघम*
          ज्याप्रमाणे सायकल शिकताना चार-दोन वेळा पडून जखमी झाल्याशिवाय सायकल चालवता येत नाही, त्याप्रमाणे शिक्षकांचा मार खाल्ल्याशिवाय शिक्षण येत नाही. अशी मानसिकता तयार करण्यामध्ये मनुवादी विचारधारा पूर्णपणे यशस्वी झाली होती. परंतु असह्य मारामुळे अनेक मुलांनी शाळा सोडून शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे कित्येकांच्या जीवनाची राखरांगोळी झाल्याचे पुरावे आजही पूर्वजांकडून ऐकायला मिळतात. ही कपटी मखलाशी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी हेरून त्याची नोंद आपल्या एका अखंडात घेतली आहे.तो अखंड असा,
*शूद्र लेकरा मुकामार देऊन पळवीती l*  
*चापट्या  गुद्दे  मारिती जोराने कान पिळती l*
*परंतु स्वाजातीला  शिक्षा बोधाने करिती l*
        शूद्रांना ते स्पर्श करीत असल्यामुळे हाताने मार देत होते. परंतु अतिशूद्रांना (अस्पृश्य- स्पर्श करण्यास योग्य अयोग्य) मारण्याची मोठी विचित्र पद्धत त्यांच्याकडे होती. स्पर्श न करता मारण्यासाठी जोडा, दगड, ढेकुळ जे हातात येईल ते फेकून मारायचे. काही शिक्षक टेबलवर नेहमी मातीची ढेकळे ठेवायची.
          अण्णाभाऊ साठेंची पहिल्याच दिवशी शाळेत माराने प्रताडणा झाली. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी मध्यांनापूर्वीच  शिक्षकांच्या डोक्यात दगड घातला. आणि शाळेकडे कायमची पाठ फिरवली. त्यांनी मारलेला दगड हा शिक्षकांना नसून तो विषमतावादी व्यवस्थेच्या ऊरात घातलेला प्रतिकत्मक पहिला टोला होता. म्हणून त्यांनी शाळेकडे पाठ फिरवली परंतु शिक्षणाकडे नाही!
        काही दिवसानंतर संपूर्ण कुटुंबाने पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेगाव ते मुंबई हा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास पायी केला. मुंबईत आल्यानंतर वडिलांना गिरणी कामगार म्हणून हाताला काम मिळाल्यामुळे कुटुंबाला थोडेफार स्थैर्य मिळाले. अण्णाभाऊ मुंबईच्या सडकांवरून कामाच्या शोधार्थ फिरतांना, दुकानावरील लिहीलेल्या पाट्यावरील अक्षरे, एखाद्या दगडाची किंवा खापराची लेखणी व सडकेची पाटी करून त्यावर गिरवत होते. शिक्षणाची उत्कट इच्छा आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध ह्रदयात असणारी धगधगती आग, यामुळे अण्णाभाऊंनी अल्पावधीतच साक्षरता संपादित केली . स्वकष्टाने संपादेिलेली साक्षरता त्याला वाचनाची जोड, अनुभवांची गाठोडी, मनुवादी व्यवस्थेकडून पिढ्यानपिढ्या सर्वांगाने झालेले शोषण, पावलागणिक अस्पृश्य म्हणून झालेला अपमान, व्यवस्थेने नाकारलेले नैसर्गिक हक्क अधिकार, यामुळे अण्णाभाऊंची प्रतिभा आणि प्रतिमा एवढी उजळली, की त्यामधून जगावेगळी साहित्यसंपदा प्रसवली. या संपदेची दखल अनेक देशांनी घेऊन कित्येक भाषांमध्ये भाषांतरित झाली. त्यामध्ये ३४ कादंबऱ्या, १५ पोवाडे,१३ लोकनाट्य,१७ कथासंग्रह,७ चित्रपट कथा,३ नाटके,१ शाहिरी पुस्तक,१ प्रवास वर्णन (रशियाची भ्रमंती) अशी प्रदीर्घ साहित्यसंपदा आहे.
          अण्णाभाऊंच्या प्रदीर्घ साहित्य संपदेमधून एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांच्या दुःख-कष्टांना, हाल-अपेष्टांना, त्यांच्या किळसवाण्या जगण्याला लेखणीच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. हे जीवन त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं नाही, हेही सांगण्यास ते विसरले नाही.ज्यांनी ज्यांनी त्यांच्या जातीच्या अनेक पिढ्या गढीच्या पायात गडप करून वंश निर्वंशाकडे नेला त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना अण्णाभाऊच्या  लेखणीने थोडीही कच खाल्ली नाही. त्यांचं साहित्य हे बंद खोलीत बसून, मांडीवरच्या खुणा मोजत लिहिलेले नव्हते, तर कष्टामुळे हातापायावरील फोडातून येणाऱ्या रक्ताचे परिमापन तथा झाडाखाली तीन दगडांची चूल मांडून संसार गाडा हाकणाऱ्या, तरीही कुटुंबव्यवस्थेवर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करताना लिहिलेले आहे. दुसऱ्या बाजूने पाहू गेलो असता बहुजन समाजातील अनेक लेखकांनी सुशिक्षितांनी समाजाकडे कायमची पाठ फिरवून व्यवस्थेची गुलामी पत्करण्यात धन्यता मानल्याचेही दिसुन येते.
        २०२० हे वर्ष अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे शतकमहोत्सवी वर्ष असल्यामुळे, अनेक लोक त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना अनेक विशेषणे, बिरुदावली लावताना दिसून येतील. परंतु एक बाब प्रकर्षाने समजून घ्यावी लागेल कि, ते आजन्म आंबेडकरवादी होते. ज्याप्रमाणे आमचे उद्धारकर्ते महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष कधीच सहभागी झाले नाहीत. कारण  ते जाणत होते की, आमचा बहुजन समाज हा गुलामांचा गुलाम आहे. आमच्यावर दुहेरी गुलामी लादलेली आहे. इंग्रजांची गुलामी संपली तरी ब्राह्मण वाद्यांची गुलामी कायमच राहणार आहे. म्हणून अण्णा भाऊंनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत १६ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये  *यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी हैl* अशा घोषणा देत आझाद मैदान ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला होता.
            आज भारतामध्ये त्यांच्या घोषणेचा तंतोतंत प्रत्यय येतना दिसत आहे. देशाचे भूकबळी प्रमाण खूपच वाढलेले आहे. २०१९ च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत ११७ देशांपैकी १०२ व्या स्थानावर आहे. कोरोना   लॉकडाऊन मुळे हा क्रमांक कदाचित आणखीच वाढला असावा. अण्णाभाऊंनी ज्या समाजाच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या त्यापैकी ८३ कोटी लोकांचा समावेश त्यामध्ये आहे. परंतु त्यावर  कुठेही चर्चा होताना दिसत नाही.  म्हणून आम्हाला त्यांचा संदेश लक्षात घ्यावा लागेल, ते म्हणतात
*एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन चलबा पूढती l*
 *मिळवून स्वातंत्र्य या जगती कमवी निज नाव l*
 *मला सांगून गेले भीमराव l*
         अण्णाभाऊ साठे यांच्या मुक्या वंचितांचा हुंकार झालेल्या लेखणीला त्यांच्या जयंती शतक महोत्सवी वर्षात जर खरीखुरी आदरांजली अर्पण करायची असेल, तर बहुजन समाजाला एकोप्याने पेटून उठावे लागेल तरच सुस्तावलेली यंत्रणा जागृत होऊन आमची दखल घेईल, अन्यथा!!.......

                    भिमराव परघरमोल
             व्याख्याता तथा अभ्यासक
            फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
                    तेल्हारा जी. अकोला
                  मो. ९६०४०५६१०४

1 comment:

  1. खुप खुप धन्यवाद संपादक साहेब

    ReplyDelete