तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

कसोटी क्रिकेटमधील अपमानास्पद विश्वविक्रम         खेळ कोणताही असो त्या खेळाच्या त्या सामन्याच्या दिवशी काय नवीन कारनामा घडतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते आणि तो खेळ क्रिकेटचा असेल तर सर्वांसाठी कुतुहलाचा विषय बनतो. मग त्या सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंचीही आपल्या खेळाविषयी उत्सुकता वाढते. सर्वच खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरतेच असेही नाही. तर काही जण भन्नाट कामगिरी करून विक्रमांच्या पुस्तकात अजरामर ठरतात. तसेच त्यातील एखादा अशी कामगिरी करून जातो की, ती त्याच्यासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरते.
              असेच काही शर्मनाक कारनामे आहेत की, त्या संबंधीत खेळाडूला सुध्दा नकोसा वाटत असतो. आज आपण त्याच लाजिरवाण्या विक्रमांविषयी माहिती करून घेऊया.
               कर्टली अँब्रोस विंडीजचा एक अतिशय प्रभावशाली वेगवान गोलंदाज होता. कसोटीत चारशेच्यावर ( ४१४ ) बळीही त्याच्या नावावर आहेत. त्याच्या भेदक व जबरदस्त गोलंदाजीमुळे तो कोणत्याही संघाच्या कर्णधाराला आपल्या संघात हवा हवासा वाटायचा. परंतु कसोटी सामन्यात त्याच्या नावावर असा एक पराक्रम आहे की तो त्याला कधी आठवण काढावा असा नाही.
               सन १९९३ मध्ये पर्थ येथे जगातल्या सर्वात वेगवान खेळपट्टीवर खेळताना अँब्रोसने एक फार मोठे षटक टाकले होते. त्या १५ चेंडूंच्या खेळात त्याने थोडे थिडके नाही तर तब्बल नऊ चेंडू नोबॉल टाकले होते. त्याचे ते षटक कसोटी क्रिकेटमधले सर्वात मोठे षटक ठरले. आश्चर्याची बाब म्हणजे अँब्रोसच्या या लाजिरवाण्या कारनाम्यानंतरही तो त्या सामन्याचा सामनावीर ठरला. कारण विंडीजने दहा गडी राखून जिंकलेल्या त्या सामन्यात कर्टली अँब्रोसने त्याच डावात पाच बळी घेऊन विंडीजच्या विजयाचा मार्गही सुकर केला होता. परंतु त्याचे "ते षटक " त्याच्या नावाला बट्टा लावणारे ठरले.
              पाकिस्तानचा माजी सलामीवीर व अष्टपैलू खेळाडू मुदस्सर नजर त्याच्या बिजिगुषीवृत्तीसाठी प्रसिध्द होता. संघाच्या गरजेनेनुसार आपला खेळ करण्यात तो वाकबगार होता. त्याच्या बॅटींग व बॉलींगच्या जोरावर त्याने पाकच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. पाकसाठी त्याने ७६ कसोटी व १२० एकदिवसीय सामने खेळले. परंतु त्यानेही आयुष्यभर स्वतःलाच लाज वाटणारी कामगिरी केली आहे.
              सन १९७७ -७८ मध्ये इंग्लंडविरूध्द लाहोरच्या गदाफी़ स्टेडियमवर त्याने एक शतक बनविले. ते शतक बनविताना त्याने प्रेक्षकांच्या सहनशिलतेचा अक्षरशः अंत बघितला होता. शतक गाठण्यासाठी त्याने तब्बल ५५७ मिनिट ( म्हणजे ९ तास २९ मिनिटे ) फलंदाजी केली. ती खेळी कुठल्याही फलंदाजाची कसोटीतील सर्वात धीमी शतकी खेळी ठरली.
              भारताचा आजवरचा सर्वात विश्वसनिय फलंदाज व माजी कर्णधार राहुल द्रविड त्याच्या अभेद्य बचावासाठी जगप्रसिध्द होता. त्याच्या बॅटला चेंडूने नुसता चकमा देणे म्हणजे गोलंदाजाचे मनोबल वाढवून जायचा, नव्हे तर तो त्या गोलंदाजाचा नैतिक विजय ठरायचा. द्रविडने त्याच्या १६४ कसोटींच्या कारकिर्दीत तेरा हजार २८८ धावा बनविल्या आहेत.                 भारताच्या अनेक विजयात त्याने अजरामर डाव खेळलेे. त्याच जोरावर तो. " मिस्टर डिपेंडेबल " ठरला. "चिनच्या भिंती " पेक्षाही मजबूत '' दिवार " बनला. परंतु द्रविडच्या नावावर एक असा काही विश्वविक्रम आहेे की, तो त्याच्या सर्व चांगल्या क्रिया कर्मावर पाणी फेरून गेला. तो विश्वविक्रम म्हणजे राहुल द्रविड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ( एकूण ५४ वेळा ) त्रिफळा बाद झाला आहे.
               विंडीजचा माजी कर्णधार व खराखुरा शिस्तप्रिय खेळाडू ठरलेला जलदगती गोलंदाज कोर्टनी वॉल्श कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा गाठणारा जगातला पहिला गोलंदाज ! त्याने कसोटीत ५१९ बळी मिळवून तत्कालीन विश्वविक्रमही रचला होता. परंतु कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याचा अपमानास्पद विश्वविक्रम कोर्टनी वॉल्शच्या नावावर आहे. कसोटीत त्याने खेळलेल्या १८५ डावात तब्बल ४३ वेळा तो शुन्यावर बाद झाला.
               कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाने सर्वाधिक बळी घेणारा इंग्लंडचा महान जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. धावा देण्यातही तो बराचसा कंजूष आहेे. परंतु त्याच्याही नावावर एक शर्मनाक विश्वविक्रम आहे.
              ऑस्ट्रेलियाच्या टि-२० संघाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने अॅशेस कसोटी मालिकेत अँडरसनच्या एका षटकात तब्बल २८ धावा कुटून कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडं षटक टाकणारा गोलंदाज असं " ब्लॅक लेबल " अँडरसनच्या नावावर चिकटवलं.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
 मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment