तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

शेतकऱ्यांच्या पत्नीला पेन्शन द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा


दै.मराठवाडा साथी व झक्कास मराठीच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून सौ.मिरा कदम यांची शासनाला मागणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
माझ्या शेतकरी बापाला पेरायची असते हिरवी कवीता............ या कवितेच्या ओळीपासून आजच्या फेसबुक लाईव्हची सुरूवात झाली. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. ७० टक्के अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतीवर आधारीत आहे. त्यामुळे भारत देशातील शेतकरी आणि त्यांच्या समस्या यावर व्यापक काम व्हायला हवं. शासकीय धोरणं निटनेटक्या व्हायला हव्यात. शासकीय उदासिनता आणि नैसर्गीक संकटांमुळे अगोदरच शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकट आहे. दरवर्षी पेरणीच्या वेळी एकतर पाऊस पडत नाही, किंवा पाऊस पडला तर काढणीच्या वेळी पिक पाण्यात जातं अशी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत आहे. डोळ्यातील अश्रु घेवून शेतकरी दरवर्षी हिमतीने काम करतात. संकटातील अशा बळीराजाला उभारी आणि आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. यावर्षी तर कोरोना आजारामुळे शेतकऱ्यांचे अफाट नुकसान झाले आहे. सबंध देशातील सर्वकाही ठप्प असतांना देशवासीयांना अन्नधान्य पुरविण्याचं पुण्यकर्म शेतकऱ्यांकडून झाले आहे असे प्रतिपादन प्रसिध्द प्रबोधनकार व व्याख्यात्या सौ.मिरा धनराज कदम यांनी केले. दै.मराठवाडा साथी व झक्कास मराठीच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्या कोरोना काळातील दशा आणि दिशा या विषयावर बोलत होत्या.
कांदा, द्राक्ष, कलींगड, संत्रा, डाळींब आदी उत्पादक शेतकऱ्यांचे तर यंदा नुकसान झालेच, परंतू भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बाजारपेठेत नेण्याची अडचण असल्यामुळे जनावरांना खाऊ घालावा लागला. कोरोना आजारामुळे वाहतुकीच्या संकटाबरोबरच बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची उत्पादने रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. लॉकडाऊनमध्येच आता खरीपाच्या पेरणीचे दिवस आले आहेत. अगोदरच अडचणीतील बळीराजाला पैशांची निकड भागवण्यासाठी बँकांकडे आशेने पाहवे लागते, परंतु त्यातही हजार अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस वेळेवर पडला आहे. पाऊस वेळेवर पडला परंतू बि-बियाणे आणि खतांसाठी पैशांचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्याचबरोबर जे बियाणे कसेबसे कर्ज काढून विकत आणले आणि शेतात पेरले तेही उगवले नाही. काही कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवाशी मोठा खेळ करीत आहेत. बोगस बियाणांमुळे दुबार नव्हे तर तीबार पेरणीची वेळ बळीराजावर आली आहे. घरातील डागीने मोडून झालेच, कर्ज काढून झालेत अशा स्थितीत आता तीबार पेरणी करावी लागत असेल तर ते कुठून आणणार? असा सवाल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा माल विक्रीच्या वेळेस त्याच्या पिकाला भाव मिळत नाही हीसुध्दा शोकांतीका आहे.
कोरोनाच्या काळात सगळा देश वर्क फ्रॉम होम करतोय... परंतू शेतकरी राजाला ही मुभा नाही. शेतात गेल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. माझी मुलंबाळं शिकली-सवरली पाहीजेत, चांगल्या शाळेत जायला हवीत, कुटूंब सुखी व्हावं अशी त्याची स्वप्नं असतात. परंतू यंदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. शहरातील नोकरदारांची लेकरं ऑनलाईन अभ्यास करत आहेत, पण बळीराजाच्या लेकरांना ही सोय कुठून मिळणार? अनेक अडचणींशी संघर्ष करणाऱ्या बळीराजाची वाईट दशा आजच्या काळात झाली आहे. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुशिक्षीत शेतकरी पुत्रांनी संघटीतपणे काही उपाययोजना पुढे आणून त्यावर दूरगामी काम करण्याची गरज आहे. पेरणीच्या हंगामातच मुलांच्या शाळा प्रवेशांची लगबग असते. एकीकडे पेरणीचा खर्च आणि दुसरीकडे लेकरांचे शाळेतील प्रवेश या दोन्हीही पातळींवर त्यांला संघर्ष करावा लागतो. गांजून, पिचून गेलेल्या आपल्या बापाचे हाल पाहून शेतकऱ्यांच्या लेकरांची पुढची पिढी शेतीकडे वळेल की नाही? हा प्रश्न पडतो. विज्ञानाच्या काळात तंत्रज्ञानाचा आधार घेवून शाश्वत शेतीचे प्रयत्न केले तर खुप मोठा क्रांतीकारी बदल निर्माण होणार आहे. शुन्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले तर बळीराजाला उभारी मिळेल आणि कोणीही बँकेचे कर्ज न चुकवण्याच्या भानगडीत पडणार नाही. येणाऱ्या भविष्यकाळात शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहीजेत, शेतकऱ्यांना चांगले तंत्रज्ञान मिळाले पाहीजे, शासकीय योजनांमध्ये बदल घडवून आणला पाहीजे आणि सर्वांनी खंबीरपणे देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी रहायला हवे असे मत प्रतिपादन प्रसिध्द प्रबोधनकार व व्याख्यात्या सौ.मिरा धनराज कदम यांनी केले. दै.मराठवाडा साथी व झक्कास मराठीच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्या कोरोना काळातील दशा आणि दिशा या विषयावर बोलतांना व्यक्त केले. शेवटी त्या म्हणाल्या की शेतीमालाला योग्य भाव मिळवायचा असेल तर शेतकरी ते ग्राहक हा जो प्रयोग औरंगाबाद येथे केला गेला तो अतिशय उपयोगी आहे. शेतकऱ्याच्या पत्नीला पेन्शन योजना लागू करून स्वामीनाथन आयोगाच्या पूर्ण शिफारशी सरकारने लागू कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
आज डॉ.तुळशिराम महाराज गुट्टे यांच्याशी संवाद
आज आषाढी एकादशीनिमित्त चिंतनात्मक वारी पंढरीची या विषयावर संत साहीत्यीक आणि गौरव महाराष्ट्राचा पुरस्काराने सन्मानित युवा आध्यात्मिक गुरू ह.भ.प.डॉ.तुळशिराम महाराज गुट्टे यांच्याशी संवाद होणार आहे. दै.मराठवाडा साथी आणि झक्कास मराठीच्या फेसबुक पेजवर हा लाईव्ह संवाद कार्यक्रम रात्री ८ वाजता प्रक्षेपीत केला जाणार आहे. याचा सर्व श्रोत्यांनी आणि भाविक भक्तांनी श्रवणलाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment