तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 July 2020

धनंजय मुंडेंसाठी वाढदिवस ठरला स्पेशल!
सुप्रियाताईंनी आणला केक तर पवार साहेबांनी भरवला!

बारामती (प्रतिनिधी) (दि.१६)  :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी यावर्षीचा वाढदिवस स्पेशल ठरला आहे. मुंबईवरून परळीला परतत असताना पवार साहेबांची भेट घ्यायला गेलेल्या मुंडेंना खा. सुप्रियाताई सुळे यांनी केक आणून दस्तुरखुद्द खा. शरद पवार साहेबांनी तो केक भरवून शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनामुक्त झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. त्यावेळी अचानक खा. सुप्रिया ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. 

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक वजनदार नेते आहेत, विशेषतः तरुणाईमध्ये त्यांच्याबद्दल खूप मोठी क्रेझ पाहायला मिळते. सामाजिक न्याय खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामांचा धडाका लावला होता, तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकट काळातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यादरम्यान त्यांना स्वतःलाच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्त होऊन काही दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर ते पुन्हा कामाला लागले.

त्यामुळे यंदा त्यांचा वाढदिवस जोरदार साजरा करण्याचे त्यांच्या समर्थकांचे नियोजन होते, मात्र त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे कार्यकर्त्यांना - समर्थकांना आवाहन केले. 

नुकतेच कोरोनामुक्त होऊन आलेले धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू झाले, त्यानंतर मुंबईवरून परळीकडे परतत असताना त्यांनी आज खा. शरद पवार साहेबांची भेट घेतली, यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांनी वाढदिवसाचे दिलेले हे सरप्राईज पाहून ना. मुंडे भारावून गेले होते. खा. सुप्रियाताई सुळे यांनी केक कापून तो केक स्वतः पवार साहेबांनी धनंजय मुंडे यांना भरवून शुभेच्छा दिल्या, धनंजय मुंडे यांनी यावेळी जाणत्या राजाचे आशीर्वाद घेतले. 

यावेळी खा. पवार साहेब यांच्या समवेत प्रतिभाताई पवार, खा. सुप्रियाताई सुळे, श्री.सदानंद सुळे, रेवतीताई सुळे आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांचा १५ जुलै रोजी झालेला वाढदिवस संपन्न झाला, या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील व इतर पक्षातील नेते मंडळी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा 'आधारवड' कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. अशा शब्दात ना. मुंडेंनी खा. शरद पवार साहेब व खा. सुप्रिया ताईंचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a comment