तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

स्वतः आजारी असतांनाही धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःपेक्षा आमची जास्त काळजी घेतली
पीए सांगत आहेत कोरोना काळातील अनुभव

खरेतर आम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलो तरी आम्हाला कोरोनाची तशी विशेष लक्षणे नव्हती. उलट साहेबांना अनेक लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता होती. मात्र स्वतः गंभीर आजारी असतानाही धनंजय मुंडे साहेबांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या स्वतः पेक्षाही आमची जास्त काळजी घेतली. कदाचित वीस वर्ष त्यांच्या सोबत सावलीसारखे काम केल्याची ही पावती असेल; अशा शब्दात त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी कोरोना काळातील आपले अनुभव फेसबुक वर शेअर करतांना धनंजय मुंडे यांच्या आणखी एका गुणावर प्रकाश टाकला आहे.

-----–----- ---------
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे सात सहकारी असे एकूण आठ जण नुकतेच कोरोना मुक्त झाले. त्यानंतर त्यांचे pa प्रशांत जोशी यांनी एक फेसबुक पोस्ट करून 11 दिवसातला अनुभव शेअर केला आहे काय म्हणतात जोशी आपल्या *मी आणि करोना* या पोस्ट मध्ये ते वाचा
-------------

आज सकाळी सकाळी मोबाईलमधील आरोग्य सेतू अँप मध्ये 'आपण सुरक्षीत आहात' असे नोटिफिकेशन आले आणि 21 दिवसांपासून भीतीच्या दबावाखाली असलेला जीव एकदाचा भांड्यात पडला. हा मेसेज पाहत असतांनाच नकळत डोळ्याच्या कडा ही ओलावल्या होत्या, आणि मागच्या साडेतीन महिन्यांचा आयुष्यात कधी ही न विसरता येणारा काळ आठवला.

करोनाची राज्यात नुकतीच साथ सुरू होताच मार्च चे अधिवेशन गुंडाळण्यात आले आणि मी मुंबई वरून परळीला परतलो. आईचे आजारपण आणि त्यातच तिचे देवाघरी जाणे या दुःखातून सावरत दिड महिन्यानंतर मे च्या सुरुवातीला मी घराबाहेर पडलो, पुन्हा ऑफिसला जाऊ लागलो, कामाला लागलो.

लॉकडाउन सुरू असले तरी जेंव्हा तुम्ही राजकीय किंवा सामाजीक जीवनात काम करत असता तेंव्हा तुम्हाला घरात बसून जमत नसते तर पुढे होऊन काम करावे लागते. लॉक डाउन मध्ये साहेबांचा ( श्री. धनंजय मुंडे ) कामाचा झपाटा सुरूच होता. अडल्या नडल्या प्रत्येकाला मदत करण्यापासून ते बीड जिल्ह्यात करोनाचा प्रवेश होणार नाही यासाठी उपाययोजनांचा धडाका लावला होता, त्याचाच परिणाम म्हणून सुरुवातीच्या दोन महिन्यात बीड जिल्ह्यात करोनाचा एकही पेशंट आढळून आला नाही . साहेबांवर सामाजिक न्याय सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना मुंबईला येणे क्रमप्राप्त होते,  स्वाभाविकच मलाही त्यांच्यासोबत यावे लागले.

प्रत्येक आठवड्याला सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत येऊन दोन, तीन किंवा चार दिवस थांबून पुन्हा मतदार संघात परत जायचे अशी आमची पद्धत झाली होती. मतदारसंघात असो की मुंबईत प्रत्येक वेळी आम्ही सोशल डिस्टन्स असेल किंवा मास्क वापरणे असेल प्रत्येक गोष्टींची काळजी घेत होतो.

 मात्र जेव्हा एखाद्या संकटाने तुम्हाला गाठायचे ठरवले तर त्याला कोणीही रोखू शकत नाही त्याप्रमाणे करोनाने आम्हाला गाठलेच. बुधवार दिनांक दहा जून चा दिवस. नेहमीप्रमाणे मंत्रालयात काम सुरू असताना अचानक साहेबांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची टेस्ट करण्यासाठी आम्ही लॅब मध्ये गेलो.  त्यांच्यासोबत माझीही टेस्ट करण्यात आली त्या दिवशी रात्री साहेबांची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे आणि माझ्या टेस्टचा  निकाल न लागता ती राखीव असल्याचे सांगण्यात आले.
 माझी टेस्ट राखीव असली तरीही त्यापेक्षा साहेबांची टेस्ट निगेटिव्ह आली याचा मला खूप आनंद होता.

साहेबांची टेस्ट निगेटिव्ह निघाल्याने आम्ही दुसऱ्या दिवशीही मंत्रालयात निर्धास्तपणे काम करत होतो आणि साधारण तीन वाजण्याच्या सुमारास मला लॅबमधून तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे असा निरोप आला. क्षणभर माझ्या पायाखालची वाळु घसरली. एखादी वीज कोसळावी तसा मी मनातून हादरलो. स्वतःला सावरत साहेबांशी, आमचे पीएस डॉ  प्रशांत भामरे यांच्याशी चर्चा करून मी तातडीने होम क्वारंटटाईन होण्याचा निर्णय घेतला.

स्वतःची बॅग घेऊन कोणालाही आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत मुंबईत राहत असलेल्या फ्लॅटवर चालतच गेलो. मागील 2 दिवसांत ज्यांच्याशी जवळचा संपर्क आला त्या सर्वांना कल्पना देवून काळजी घेण्यास सांगितले. बिल्डिंग मध्ये सर्वांना कल्पना दिली. आता पर्यंत खंबीर असलेला मी रूम मध्ये पोहचताच आणि आपल्याला करोना झाला आहे या जाणीवेने कोसळलो, डोळ्यातून पाणी येत होते.  त्यावेळी आईची खूप आठवण झाली.

थोड्या वेळाने सावरत घरी बायकोला सर्व कल्पना दिली, मला कोणतीही लक्षणे नाहीत तू काळजी करू नको मी लवकरच परत येईल सर्वांना सांभाळ म्हणून धीर दिला. अभिजित कदम नावाच्या एका डॉक्टर मित्राला फोन करून गोळ्या मागवल्या, हा मित्र म्हणजे कायम हसवणारा आणि  धीर देणारा. जाऊ दे रे काही करोना बिरोना काही नसतय म्हणत त्याने अर्धी भीती उडवून लावली. दिनक्रम कसा असावा, काय गोळ्या घ्याव्या, खावे याचे मार्गदर्शन केले.

आपल्याला आता एकट्याला पुढचे काही दिवस रहायचे आहे आणि लढायचे ठरवून काही मित्रांकडून ( अजित गायकवाड व जयेश ) आवश्यक ते  सामान मागवून घेतले, बिल्डिंग मधील मेस बंद असल्याने आणखी एका मित्राकडून जेवणाचा डब्बा मागवला.

नेहमी प्रमाणे संध्याकाळी खोलीतच 7 km वॉक करून झोपलो असतानाच रात्री 12 च्या सुमारास आणखी एक वीज कोसळली. माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच दिवशी साहेब यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आल्याचे समजले अन माझी झोप उडाली, आदल्या दिवशीचा साहेब यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. आमचे पीएस, दोन ड्राइव्हर, दोन बॉडीगार्ड आणि एक कुक असे सर्वच सर्व पॉझिटिव्ह सापडले होते.

काय करावे काहीच समजेना, इतक्या रात्री कोणाला फोन करावा, बोलावे हे ही कळेना, त्या वेळी स्वतः साहेब यांनी फोन करून धीर दिला, प्रशांत घाबरू नका, मी उद्या ऍडमिट होतो, तुम्हीही ऍडमिट व्हा अशी सूचना केली. इतर स्टाफला ही ऍडमिट करण्याच्या सूचना दिल्या. त्या प्रमाणे रात्रीच आम्ही सर्व स्टाफला ऍडमिट केले. त्यात रात्रीचे 3 वाजले होते. इतक्या रात्री मी पॉझिटिव्ह आल्याची बातमी समजल्या क्षणी आणखी एका मित्राचा फोन आला , तो म्हणजे मंगेश चिवटे, याने फोनच केला नाही तर रात्री 3 वाजता ठाण्यातील एका डॉक्टरला फोन करून मला ऍडमिट करण्याची तयारी केली. पण शेवटी सकाळ पर्यंत थांबायचे ठरले.

रात्रीच एका वेबपोर्टलला न्यूज आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच खळबळ माजली होती. सकाळी आम्ही आधी साहेबांना ब्रीच कॅण्डीला ऍडमिट करून आम्ही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. नियमित चाचण्या आणि उपचार सुरू झाले, एसी बंद असल्याने रूम मध्ये अतिशय दमट वातावरण असायचे, कोणतीही लक्षणे नसली तरी त्या हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड मध्ये व्हायरल लोड जाणवायचा, त्याची भीती वाटायची.

संपूर्ण पीपीई कीट मध्ये तपासणी साठी येणारे डॉक्टर आहेत का नर्स का सफाई कर्मचारी बोलल्याशिवाय समजायचे नाही. जेल मध्ये कैद्याला जसे कैदी नंबर सो अँड सो म्हणून ओळखले जाते तसे आम्ही बेड नंबर वरून ओळखले जात होतो. माझा बेड नंबर 914 होता, तर भामरे साहेब यांचा 913.

भामरे साहेब म्हणजे एक अतिशय सकारात्मक विचार करणारे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व. गुगल पेक्षा जास्त वेगाने कोणत्याही विषयाची सहज सुलभ भाषेत  माहिती देणारे एक गाईड. 10 by 12 च्या खोलीत सकाळी आणि संध्याकाळी 10 ते 14 km चे चालणे असो की प्राणायाम सगळं त्यांच्या कडे पाहून करायला शिकलो, हे शिकवताना एखादे पुस्तक, चित्रपटातील कथा सांगत त्याला ते कसे जगायचे याची जोड द्यायचे. विशेषतः प्रशासनाच्या कामकाजात बाबत या काळात त्यांच्या कडून खुप शिकायला मिळाले. त्यांनी बोलत रहावे आणि आपण ऐकत रहावे यात दिवस कसा संपायचा हे ही समजायचे नाही.

स्वतःची प्रकृती ठीक नसतांनाही साहेब दिवसातून चार वेळा तरी फोनवर चौकशी करायचे , स्वतः पेक्षा आमची जास्त काळजी करायचे. मागच्या 20 वर्षात साहेबांना सलग 11 दिवस सोडून राहण्याची ही माझी पहिलीच वेळ. 43 वर्षात एकदाही रुग्णालयात ऍडमिट न होणारा मी सलग चार  दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो होतो. सतत येणारे चौकशीचे फोन, इतर ऍडमिट कर्मचा-यांची घ्यावी लागणारी काळजी आणि भामरे साहेब यांचा सहवास, तपासणी साठी येणा-या डॉक्टर, स्टाफ सोबतच्या गप्पामध्ये दिवस संपायचा तरीही  कधी तरी एकदा आपण यातून बाहेर पडू का? कुटुंबाचे कसे याची काळजी वाटून जायची.

हॉस्पिटलमध्ये आम्ही कधी त्यांनी दिलेले जेवण, चहा , नास्ता घ्यायचो तर कधी घरून किंवा मित्रांकडून डब्बा यायचा. डॉक्टरांच्या गोळ्या, अनेकांनी पाठवलेले आयुर्वेदिक औषधे, काढे, फळे, ड्राय फ्रुटस, हळदीचे दूध असे जे कोणी जे काही सांगतील ते सर्व घेणे सुरूच होते कारण आम्हाला हा लढा जिंकायचा होता.

चार दिवसांनी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. शक्य असतांनाही महात्मा फुले आरोग्य योजना किंवा 10 % राखीव बेडचा आधार न घेता स्व खर्चाने उपचार घ्यायचे हे आधीच ठरवले होते, मेडिक्लेमचा बिल देताना खूप आधार मिळाला. त्या नंतर आम्ही  7 दिवस एका हॉटेल मध्ये होम qurantine राहिलो.

तिथेही वॉक, प्राणायाम , औषधोपचार असा हॉस्पिटलसारखाच दिनक्रम होता. हॉटेल चांगले असले तरी सर्व कामे स्वतःलाच करावी लागायची.  लिफ्ट च्या समोर जेवण, नास्ता फूड पॅकेट मध्ये ठेवला जायचा. रूमची स्वच्छता असो की बाकी सर्व कामे स्वतःलाच करावी लागायची.

दरम्यानच्या काळात आमची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली तरी खरी काळजी होती ती साहेबांच्या प्रकृतीची... त्यांच्या साठी राज्यात लाखो चाहते प्रार्थना करत होते, ही प्रार्थना अखेर फळाला आली.

सोमवार दि 22 जून रोजी साहेब यांनाही डिस्चार्ज मिळाला. त्यांना ऍडमिट करायला जाताना आणि डिस्चार्ज मिळाल्यावर  ब्रीच कॅण्डी मध्ये घ्यायला गेलो तेव्हाही डोळ्यांत पाणी आले होते मात्र यावेळी आले ते आनंदाश्रू होते.

मंगळवार दि.  23 रोजी आम्ही परळीला आलो, सर्वांनी स्वागत केले, त्यानंतरही आज पर्यंत आम्ही  घरातच होम क्वारंटाइन होतो. आज मोबाइल वर सकाळी तुम्ही सुरक्षित आहात असा मेसेज आला आणि मी घरात ख-या अर्थाने प्रवेश करता झालो....

या 21 दिवसांत खूप काही शिकलो, नीट झाल्यावर कडकडून मिठी मारणारे मित्र ही पाहिले आणि अंतर देणारे ही पाहिले. जीव धोक्यात घालून उपचार करणारे डॉक्टर ही पाहिले आणि अस्पृश्यता सारखे वागणारे ही दिसले. भामरे साहेब यांच्या सारखे सकारात्मक राहून आजाराला नकारात्मक कसे ठेवायचे हे ही शिकलो.... आत्मनिर्भर झाले पाहिजे हे ही शिकलो आणि स्वतः संकटात असतानाही साहेबांसारखी इतरांची काळजी घेतली पाहिजे हे ही शिकलो!

चौकट

साहेब उपचार घेत असताना जिल्ह्यातील व मतदारसंघातील विषयांची रोज चौकशी करायचे - खंडू गोरे

दरम्यान धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असताना परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील विविध विषयांची दररोज माहिती घ्यायचे; जिल्ह्यातील पीक कर्जाचे वाटप, रोजचे पावसाचे प्रमाण, पेरणीची सुरू असलेली कामे, जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाचे दैनंदिन कामकाज, दररोजच्या बीड जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स साहेब फोन करून जाणून घेत असत, तसेच वेळोवेळी सूचनाही देत असत, असे ना. मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील कामकाज पाहणारे स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांनी सांगितले आहे.

धनंजय मुंडे यांच्या कामकाजाची एक विशिष्ट पद्धत आहे, तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या सर्व अधिकाऱ्यांशी विविध विषयी ते स्वतः बोलून बारकाईने लक्ष देतात. कोरोनावर उपचार घेत असताना सुद्धा त्यांनी याच पद्धतीने कामकाज सुरू ठेवले होते.

हजारो लोकांना फोनवरून आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या आरोग्याबाबत माहिती देत ना. मुंडे यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांशीही आपला संपर्क कायम ठेऊन जिल्ह्यातील विविध कामांचा दैनंदिन आढावा घेणे व सूचना देणे सुरूच ठेवले होते, असेही श्री. गोरे म्हणाले.


प्रशांत जोशी
स्वीय सहाय्यक

No comments:

Post a comment