तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 22 August 2020

नाथ प्रतिष्ठानच्या प्रसिद्ध श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात; ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते श्रींची स्थापना

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे; साधेपणाने साजरा करा गणेशोत्सव - धनंजय मुंडे

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-(दि. २२) ---- : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केला जाणारा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात करण्यात आली. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दुपारी ४ वा. विधीवत पूजा करत श्रीगणेशाची स्थापना करून आरती करण्यात आली. 

यावेळी राज्यावरचे कोरोना रूपी संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे घातले असल्याचे ना. मुंडे म्हणाले. तसेच जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व कोरोनाविषयक नियमांची खबरदारी घेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव सिरसाट, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक चंदूलाल बियाणी, दीपक देशमुख, रणजित चाचा लोमटे, शंकर आडेपवार, विजय भाईटे, राजेंद्र सोनी, मार्केट कमिटीचे संचालक माऊली तात्या गडदे, माजी नगरसेवक वैजनाथ अण्णा बागवाले, रवी मुळे, बाळूशेठ लड्डा, मार्केट कमिटीचे सचिव रामदासी, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, युवा नेते रामेश्वर मुंडे, विश्वस्त शंकर कापसे, मंजित सुगरे, संतोष शिंदे, बळीराम नागरगोजे, सुरेश नानवटे, गिरीश भोसले, संकेत दहिवडे, भागवत गित्ते, बालाजी वाघ, सुरेश फड, जावेद कुरेशी, लाला पठाण, जयदत्त नरवटे, बालाजी दहिफळे, सरपंच कांताभाऊ फड, विष्णू चाटे, बंडू गुट्टे, दिलीप कराड, शरद चव्हाण यांसह आदी उपस्थित होते.

नाथ प्रतिष्ठानचा सार्वजनिक गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध असून यामध्ये मोठ्या स्वरूपात श्रीगणेश पूजनाबरोबरच परळीकरांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. परन्तु  यावर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नाथ प्रतिष्ठानच्या वतीने साध्या पद्धतीने आयोजन केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तीन फूट उंचीच्या श्री गणेशाची मूर्ती बसवण्यात आली असून, मंडप परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी  सॅनिटायझर सहित कोविड विषयक अन्य खबरदारीही घेण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन आरती व दर्शनाचीही सोय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

धनंजय मुंडेंच्या घरीही बाप्पाचे आगमन...

तत्पूर्वी दुपारी एकच्या सुमारास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील पंढरी या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले. यावेळी ना. मुंडे यांनी कुटुंबियांसमवेत मनोभावे श्रीगणेशाचे पूजन करत आरती केली व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी कोरोनाचे राज्यावरील संकट दूर होऊन सुख समृद्धी नांदू दे असे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

No comments:

Post a comment