तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 19 August 2020

परळी उपजिल्हा रूग्णालयात मुबलक सुविधा उपलब्ध; कोरोना रूग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू करा

आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना दिले निवेदन
 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 
कोरोना (Covid-19) या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. बीड शहरानंतर परळी वैजनाथ शहरात रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वैद्यकीय साधणं व औषधांची उपलब्धता परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रूग्णालयात शासकीय निधीतून करण्यात आलेली आहे. १०० खाटांच्या रूग्णालयात १५ तज्ञ डॉक्टर्स, ६०-६५ जेष्ठ व अनुभवी परिचारीका, रक्त तपासणी प्रयोगशाळा व अन्य उपयोगी साधनं उपलब्ध आहेत. या गोष्टी लक्षात घेवून परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाग्रस्त असलेल्या व अतिदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या रूग्णांवर येथे उपचार करता येऊ शकतात ही बाब लक्षात आणून देत उपजिल्हा रूग्णालयात एक स्वतंत्र विभाग अतिसंवेदनशिल कोरोनाग्रस्त रूग्णांवर ईलाज करण्यासाठी तयार करावा अशी मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.
            सर्व सुविधा उपलब्ध असूनही १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात एकाही रूग्णावर उपचार केले गेले नाहीत. तथापि, बाहेरच्या काही शासकीय ईमारतींमध्ये विलगीकरण व्यवस्था व कोरोना उपचार केंद्र स्थापित करण्यात आले आहे. खाजगी रूग्णालयांत कोरोना रूग्णांना ईलाजासाठी पैसे मोजावे लागत असल्याने उपजिल्हा रूग्णालयातच कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सर्वत्र शासकीय रूग्णालयांमध्ये सर्वसामान्य रूग्णांवर उपचार केले जात असून, याचीही नोंद घेणे आवश्यक आहे. ऑक्सिजनसह आयसीयुची व्यवस्था व यासह अतिदक्षता विभागाच्या मुबलक प्रमाणातील सुविधा येथे उपलब्ध आहेत ही उपजिल्हा रूग्णालयातच उपलब्ध असल्याने काही अतिसंवेदनशिल रूग्णांवर येथे उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाऊ शकते असा मुद्दा या निवेदनाद्वारे चंदुलाल बियाणी यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a comment