तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

करोनाविरूध्द सकारात्मकतेने लढा : डॉ.वरुण नागोरी गणेशोत्सव व्याख्यानमाला, सेलू,

सेलू, दि.२९ ( प्रतिनिधी ) : 
सूचना, नियम व प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करत मनोधैर्य खचू न देता,   भीती न बाळगता करोनाविरूध्द सकारात्मक दृष्टीने लढा देत सर्वांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील कर्करोग विशेषज्ञ डॉ.वरुण नागोरी यांनी केले.

सेलू ( जि.परभणी ) येथील हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचे  पहिले ऑनलाईन पुष्प शुक्रवारी ( २८ ऑगस्ट )  गुंफताना ते बोलत होते.  ' माझ्या नजरेतून करोना ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. 
नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते
व्याख्यानमालेचे उद्घाटन  झाले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर , प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी , व्याख्यानमालेचे अध्यक्ष  अनिल कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
गणेशोत्सव व्याख्यानमालेचे हे ५९ वे वर्ष असून कोव्हिड - १९ मुळे व्याख्यानमाला फेसबुक पेजवरून ऑनलाईन होत आहे. 
डॉ.नागोरी म्हणाले, शारीरिक व परिसर स्वच्छतेसह, सकस आहार  , नियमित व्यायाम करावा. कोणत्याही परिस्थितीत मनोधैर्य खचू न देता मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवावे. एकमेकांना सहकार्य करत काळजी घ्यावी. 
पुढे ते म्हणाले, साधारणतः साधी सर्दी, खोकला, अतीताप , ऑक्सिजनलेवल कमी होणे ही करोनाची लक्षणे असतात. माणसांची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर ती लक्षणे काही जणांत दिसतही नाहीत.  मात्र करोना बाबतीतही गाफील राहू नये. तरुणांनी , धडधाकड माणसांनीही गांभीर्याने काळजी घ्यावी. आपले डॉक्टर , पोलिस , स्वच्छता कर्मचारी , प्रशासन आपली काळजी घेत आहे. आपणही विनाकारण घरा बाहेर न पडता , गर्दी टाळून त्यांना सहकार्य करावे. हिच आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. 
करोना हा दैनंदिन जीवनशैली कशी असावी याचा पाठ देणारी शाळा ठरल्याचे नमूद करत लॉकडाउनमुळे शिक्षण बंद असल्याने विशेषतः लहान  मुलांच्या बदलत्या मानसिकतेला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर पुढे असणार आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणूनही डॉ.नागोरी यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रास्ताविक व्याख्यानमालेचे सचिव गिरीश लोडया , सूत्रसंचालन मोहन बोराडे, तर आभार प्रदर्शन अजित मंडलिक यांनी मानले. यशस्वीतेसाठी संयोजक गंगाधर कान्हेकर, प्रा.ए.डी.कुलकर्णी, लता गिल्डा, बाबासाहेब चारठाणकर, डॉ.कल्पना कुलकर्णी, बाबासाहेब हेलसकर, शोभा कोरडे, किरण जोशी, कल्याण पवार, प्रा.देविदास ढेकळे, सुशिल ठोंबरे आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

फोटो ओळी : डॉ.वरुण नागोरी

पूर्ण..‌.

No comments:

Post a comment