तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 August 2020

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची प्रलंबित कामे मोहिम राबवून पुर्ण करा- कृषी मंत्री दादाजी भुसे


पीएम किसान योजनेत आणखी लाभार्थी शेतकरी वाढवा

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था करावी

ग्रामपंचायत पातळीवर कृषि विषयक समिती स्थापन करणार

तालुका पातळीपर रोप वाटीका तयार करणार

बुलडाणा,(जमील पठाण ) दि.29

शेतकऱ्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी, आर्थिक पाठबळ देण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीचे काम होत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या कल्याणाचे काम प्रभावीपणे होवू शकते. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. या योजनेतंर्गत प्रलंबित असलेली सर्व कामे विभागाने मोहिम राबवून पुर्ण करावी, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज  दिल्या. ‍

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज कृषी विषयक योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेतना ते बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, आमदार सर्वश्री डॉ संजय रायमूलकर, संजय गायकवाड,  राजेश एकडे, जिल्हाधिकारी षण्मुखराजन, तसेच सभागृहात माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, कृउआस सभापती जालींदर बुधवत आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

   प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचे सांगत कृषी मंत्री म्हणाले, या योजनेचा लाभ न मिळालेल्या किंवा तांत्रिक अडचणीत असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा. त्यासाठी एक विशीष्ट ड्राईव्ह राबवावा. पोकरा योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी नेमून योजनेच्या कामांचा अहवाल तयार करावा. तसेच कामांना गती द्यावी. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांचे एक खाते ‘नील’ झाले असल्यास व दुसरे खाते थकीत असल्यास बँकांनी अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. जिल्हा बँकेने कर्जमाफीचे मिळालेल्या पैशांमधून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.

 ते पुढे म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्याच्या कुटूंबातील सात बारा उताऱ्यावर नोंद असलेल्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये शेतकरी कुटूंबाला लाभ देण्यात यावा. याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. मूंग, उडीद व सोयाबीन पिकाचे सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे पुर्ण करावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी विभागाने रस्त्याच्या कडेला किंवा मोक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. ही जागा तात्पुरत्या स्वरूपात देवून उत्पादक ते थेट ग्राहक या पद्धतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. जे विकेल ते पिकेल या शासनाच्या नवीन उपक्रमानुसार पीक पद्धती ठरवावी. शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. लॉकडाऊन काळात कुणालाही अन्नधान्य, भाजीपाला व फळांची कमतरता जाणवली नाही. तसेच चढ्या भावाने विक्रीही झाली नाही. याचे सर्व श्रेय शेतकरी राजाचे आहे. तसेच कृषि विभागानेही या काळात बांधावर खत बियाणे पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, असे गौरवोद्गारही कृषि मंत्री यांनी यावेळी काढले.

  अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटीका तयार करण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले, यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे यांची रोपे स्थानि‍क स्तरावर उपलब्ध होवून शेतकऱ्यांचे पैसे, वेळ वाचणार आहे. तसेच कृषि विषयक एक समिती ग्रामपंचायत पातळीवर कार्यान्वीत करण्यात येणार आहे. समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ तयार करण्यात येणार आहे. सध्या राज्यात 3500 शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभव, ज्ञानाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कृषि विषयक ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा. आठवड्यातील 3 ते 4 दिवस गावात फिरावे, बांधावर जावे व शेतकऱ्यांना योजना, नवीन माहिती, उपक्रम आदींची माहिती द्यावी.  

  यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, पोकरा योजनेतील कामे गांभीर्याने पुर्ण करावी. सकारात्मकतेने कामे करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा. या योजनेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी. कृउबास सभापती जालींदर बुधवत यांनी बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय उभारण्याची मागणी केली. आमदार सर्वश्री संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे यांनी यावेळी विविध मागण्या करीत आपल्या भागातील प्रश्न मांडले. बैठकीत जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सादरीकरण केले. पोकरा योजनेविषयी अधिकची माहिती मुंबई येथील अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीचे आभार प्रदर्शन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी, संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment