तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 21 August 2020

रंगसेवकांसाठी नाट्य निर्मात्यांची सरकार दरबारी तिसरी घंटा


(मुंबई प्रतिनिधी))
      "कोरोना-लॉकडाउन" ठप्प पडलेल्या अर्थचक्र गती देण्यासाठी राज्य सरकार 'सुरक्षिततेच्या नियमावली'नुसार एकेक व्यवसाय क्षेत्र खुले करीत आहे. अश्याच प्रकारे टीव्ही सिरियल आणि सिनेमा शुटींगला परवानगी दिल्यानंतर, सरकारने आता  'सुरक्षितते'च्या नियमावली नुसार नाट्यगृहे खुली करावी, ही अपेक्षा आता नाट्य निर्माता व रंगकर्मींनी व्यक्त केली आहे यासाठी मराठी नाट्य व्यवसायाशी संबंधित घटक संस्था पदाधिकारी  लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री यांना भेटून निवेदन देणार आहेत, अशी माहिती 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ',मुंबई'चे अध्यक्ष *संतोष भरत काणेकर* यांनी दिली. नाट्यगृहे खुली करण्यासाठी कलावंत, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांच्या सुरक्षितते साठी कोणती व्यवस्था- नियमावली असावी, यासाठी 'नाट्य निर्माता संघाच्या पुढाकारने नाट्य व्यावसायाशी संबंधित संघटनांशी नुकतीच बैठक झाली. या बैठकीला 'मराठी नाटक कलाकार संघ-मुंबई'चे अध्यक्ष प्रदीप कबरे व प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार ; 'रंगमंच कामगार संघ-मुंबई,'चे प्रवक्ते रत्नाकर जगताप व कोषाध्यक्ष  संदीप नगरकर; 'नाट्य व्यवस्थापक संघ-मुंबई,'चे अध्यक्ष प्रभाकर (गोट्या) सावंत आणि नाट्य निर्माता संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे, सहकार्यवाह  सुशिल आंबेकर हे उपस्थित होते. बैठकीत या घटक संस्थानी मातृसंस्था असलेल्या 'अ.भा.मराठी नाट्य परिषद'च्यावतीने राज्य सरकारकडे अपेक्षित सुरक्षितता नियमावली सादर करावी आणि मराठी नाट्य व्यवसाय पुन्हा ताकदीने उभा राहावा, यासाठी अर्थसाहाय्याची योजना मांडावी,असे प्राथमिक चर्चेत ठरले.या विषयी अधिक माहिती देताना संतोष काणेकर म्हणाले, "मराठी नाटकाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मोठा भाग व्यापला आहे. तसेच, नाट्य व्यवसायाशी निगडित कलावंत, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ आदि २० हजाराहून अधिक रंगकर्मी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील दीड लाखाहून अधिक लोकं आहेत. 'कोरोना-महामारी'मुळे नाट्यगृह बंद असल्यामुळे या साऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. आजची परिस्थिती बदलण्यास बराच काळ जावा लागेल. पण त्याच बरोबर परिस्थितीला हिमतीने सामोरे जावे लागेल, हेही आता स्पष्ट झालेय. त्यासाठी नाट्य निर्माते म्हणून आम्ही तयारी करतोय. आमच्या हिमतीला मायबाप प्रेक्षक साथ आणि दाद देतील, याची खात्री आहे. सरकारने सुरक्षिततेची नियमावली ठरवावी, सहाय्याचा हात द्यावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. रंगभूमीची ही सेवा केवळ मनोरंजनासाठी नाही. त्यात हजारो रंगसेवकांचा जगण्यासाठी आधार देण्याचाही प्रयत्न करणार आहे.

No comments:

Post a comment