तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे ध्येय : डी.के.देशपांडे यांचे प्रतिपादन


सेलू येथे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांचा सेवागौरव 

सेलू, दि.२ ( प्रतिनिधी ) :
बदलत्या शैक्षणिक  व सामाजिक परिस्थितीत प्रत्येक शिक्षकांनी स्वत:ला सिध्द करत सजगतेने विद्यार्थी हित समोर ठेवून विविध तंत्र व माध्यमांचा अध्यापनात कौशल्यतेने उपयोग करत संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे एकमेव ध्येय असणे गरजेचे आहे, अशा आशयाचे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे यांनी सेलू ( जि.परभणी ) येथे केले. 

नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांचा सेवानिवृत्ती बद्दल सोमवारी ( ३१ ऑगस्ट )  सेवा गौरव करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री.देशपांडे बोलत होते.

संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिताराम मंत्री, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्था व शाळेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन अनिल कुलकर्णी यांचा सपत्नीक सेवा गौरव करण्यात आला. संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नूतन महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,
शाळेतर्फे उपमुख्याध्यापक अशोककुमार वानरे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोन्नेकर, उज्ज्वला लड्डा, शैलजा कऊटकर, नंदकुमार बंगाळे,  तालुका शारिरीक शिक्षक संघटनतर्फे गणेश माळवे, प्रा.नागेश कान्हेकर, पालक शिक्षक संघातर्फे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, नागोराव देशमुख, नूतन कन्या प्रशालेतर्फे मुख्याध्यापिका संगीता खराबे, नूतन विद्यालय विद्यार्थी वस्तू ग्राहक भांडार तर्फे दत्तात्रय मंडलिक, स्वामी, देवकर, शिष्यवृत्ती परीक्षा विभागातर्फे बन्सीधर पद्मावत, सुनील तोडकर, गजानन मुळी, तालुका शिक्षण संवर्धन मंडळातर्फे सुधीर जोशी,
जयंत कण्व, सुरेश कुलकर्णी, के.पी.राठोड, माजी उपमुख्याध्यापक मा.मा.सुर्वे, अशोक गाजरे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह, विद्यार्थी, स्नेही, विविध विभाग व संस्थांतर्फे अनिल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी,
अशोककुमार वानरे, सुनील तोडकर, रघुनाथ सोन्नेकर, श्रीपाद कुलकर्णी, कार्यालयीन अधिक्षक नंदकुमार बंगाळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक रामकिशन मखमले यांनी अनिल कुलकर्णी यांची कन्या सौ.अंजली यांचा शुभेच्छा संदेश वाचला. कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, माजी सचिव प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनीही दूरध्वनीवरून अनिल कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना अनिल कुलकर्णी म्हणाले, " माजी विद्यार्थी म्हणून संस्थेतील गुरूजनांच्या संस्कार जडणघडणीत वाढलो. विद्यार्थीहित केंद्रस्थानी ठेवून सर्व शिक्षकांच्या सहकार्याने गेली ३५ वर्ष शिक्षक म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न केला.  शाळेतील शिक्षक ते मुख्याध्यापक पदाचा सेवा काळ हा अत्यंत समाधानाचा गेला. संस्थेने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व सहकारी शिक्षक मित्रांच्या सहकार्यानेच शाळा गुणवत्तेत पुढे आहे. केवळ दहावीच्या परीक्षेसह विविध  स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर क्रीडा , सांस्कृतिक , कला क्षेत्रातही शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. याचे श्रेय हे सर्व सहकारी शिक्षक मित्रांनाच आहे."

प्रारंभी संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी स्वागत गीत गायले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अशोककुमार वानरे, सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी अनंतकुमार विश्वंभर, तर संतोष मलसटवार यांनी आभार मानले. 

पंच्याहत्तर हजार रूपयांची देणगी

संस्था व सहकार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत अनिल कुलकर्णी यांनी संस्थेसाठी पंच्याहत्तर हजार रूपयांची देणगी जाहीर केली. त्यापैकी अकरा हजार रूपयांचा धनादेश संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केला.

फोटो ओळी : सेलू ( जि.परभणी ) येथील नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती बद्दल सेवा गौरव करण्यात आला.

पूर्ण...

No comments:

Post a comment