तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

आठ महिन्यापासून बेपत्ता वैष्णवीच्या अपहरणाचे गुढ उकलले

 पैशाचा मोह आडवा आला, वडीलाच्या आतेबहीणीनेच वैष्णवीचा जिव घेतला

नवर्‍याच्या संगनमताने गुंगीचे औषध दिले व गळा दाबुन प्रेत जाळले

जिपोअ वसंत परदेशी यांची पत्रकार परिषदेत माहिती

फुलचंद भगत/वाशीम
————————————————
शाळा उभारणीसाठी पैशाची मागणी केल्यानंतर पैसे न मिळाल्यामुळे आतेबहीणीने नवर्‍याच्या मदतीने वैष्णवीला कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध देवून गळा दाबला व नंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळून टाकल्याची कबुली वैष्णवीची हत्या करणारे सौ. माधुरी गोटे व बद्रीनारायण गोटे यांनी पोलीसांना दिली. त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या येथील शासकीय कंत्राटदार विजय जाधव यांची १४ वर्षीय मुलगी वैष्णवीच्या बेपत्ता होण्याचे गुढ उकलण्यात पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असले तरी केवळ पैशाच्या मोहापायी खुद्द वडीलाच्या आतेबहीणीनेच वैष्णवीचा जिव घेतल्याचे दुर्देवी वास्तव व नातेसंबंधातील गुन्हेगारी मानसिकतेचा क्रुर चेहरा समोर आला आहे. गेल्या आठ महिन्यापासून बेपत्ता झालेल्या वैष्णवीचा काहीतरी सुगावा लागेल, ती सुखरुप सापडेल अशी आशा असलेल्या तिच्या आईवडीलांच्या आशाही वैष्णवीच्या प्रेतासोबतच मातीत मिसळल्या असून निरागस वैष्णवीचा अशा दुर्देवी हत्येमुळे जिल्हावासी हळहळले आहेत. वैष्णवीचे अपहरण, हत्या आणि पोलीसांच्या तपासानंतर आरोपींना अटक करेपर्यतची सविस्तर माहिती १४ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात झालेल्या एका पत्रपरिषदेत जिपोअ वसंत परदेशी यांनी पत्रकारांना दिली.
             याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, २० जानेवारी २०२० रोजी रा. वसारी हल्ली मुक्काम माधवनगर लाखाळा येथील संदीप मोतीराम जाधव यांनी तोंडी तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांचे मोठे भाऊ विजय जाधव व पत्नी आशा, मुलगा शिवम (१९) मुलगी वैष्णवी (१५) यांच्यासह त्यांचे सासरे शालीग्राम खडसे व सासु हे सर्व लाखाळा येथे एकत्र राहत होते. विजय जाधव यांना किडनीचा त्रास असल्याने ते पत्नीसह गुजरात येथे उपचारासाठी गेले होते. तर पिडीत मुलगी ही स्थानिक हॅप्पी फेसेस शाळेत ९ व्या वर्गात शिकत होती. १९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास संदीप जाधव हे घरी आले असता पिडीत मुलगी घरात दिसली नसल्यामुळे त्यांनी विचारपूस केली व परिसरात शोध घेतला. मुलीच्या मोबाईलही बंद होता. त्यानंतर पोलीसांनी शहर पोलीस ठाण्यात २३/२०२० कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंद करुन जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक पवन बन्सोड यांच्याकडे दिला. प्रारंभी मुलीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करण्यात आला. त्यानंतर वाशीम शहर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखा अशी वेगवेगळी तीन पोलीस पथकेही तयार करुन महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, शिर्डी, नाशिक, अहमदनगर,  महाराष्ट्राबाहेर हैद्राबाद, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील तपास करण्यात आला. परंतु तपासाला योग्य दिशा मिळाली नाही. सायबर टिमच्या वतीनेही याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला. परंतु कोणताही सबळ पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे तपासाची दिशा बदलुन मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे संशयीत महिला सौ. माधुरी बद्रीनारायण गोटे (२२) रा. अमानी ता. मालेगाव हीच्यावर तपास केंद्रीत करुन तीची वारंवार चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तीने तपासात कबुल केले की, तिने व तिचा पती बद्रीनारायण गोटे यांनी पैशाच्या मागणीवरुन अपमानास्पद वागणुक दिल्याचा राग मनात ठेवून संगनमत करुन पिडीत मुलीला १९ जानेवारी रोजी मुलीला तिच्या राहत्या घरातून फिरायला जातो म्हणून घेवून गेले. मुलीचे अपहरण केल्यानंतर कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून चारचाकी वाहनाने तीला ग्राम मोहजा फाट्यावुन शिरपुर मार्गे अकोला रस्त्याने वांगी ते रिधोरा रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदीराजवळ गळा दाबुन जिवे मारले तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली.
पोलीसांनी दोन्ही आरोपींना तपासासाठी ताब्यात घेतले असुन पिडीत मुलीचे हाडांचे अवशेष पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच गुन्हयांत आणखी कोणाचा समावेश आहे का याबाबतही पोलीसांचा तपास सुरु असल्याची माहीती तपासी अधिकारी डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रपरिषदेत दिली. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. पवनकुमार बन्सोड, पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे, सपोनि मोहनकर, वाढवे, नरसाळे, पोउपनि पायघन वाशिम शहर पधक उपविभागीय पोलीस कार्यालय यांचे पथक पोहेकॉ / ७०४ विजय घुगे, नापोकॉ /९१६ सतोष पाईकराव, व पोकॉ / १३२९ अभिजीत बांगर तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक यांनी अथक परीश्रम घेतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment